आयपीएलच्या 12 व्या मोसमाला शनिवार, 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे आता सर्वांनाच या आयपीएलचे वेध लागले आहेत. मागीलवर्षी प्रमाणेच याही वर्षी जवळजवळ सर्वच संघानी युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये असे काही युवा खेळाडू आहेत, जे यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहेत.
यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या या खेळाडूंवर असेल लक्ष –
ऍश्टन टर्नर – ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू ऍश्टन टर्नरने भारताविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या वनडे मालिकेत जबरदस्त कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने मोहालीमध्ये झालेल्या सामन्यात तुफानी खेळी करत नाबाद अर्धशतक केले होते आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता.
टर्नर यावर्षी राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सने त्याला 50 लाख रुपयांची बोली लावत संघात सामील करुन घेतले आहे.
प्रयास राय बर्मन – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने यावर्षीच्या लिलावात 1.5 कोटी रुपयांची बोली लावत 16 वर्षीय प्रयास राय बर्मनला संघात सामील करुन घेतले आहे. तो आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे.
बंगालच्या या लेगस्पिनर प्रयासने मागीलवर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण करताना 9 सामन्यात 4.45च्या इकॉनॉमी रेटने 11 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने आत्तापर्यंत 4 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत.
शिवम दुबे – मुंबईच्या 25 वर्षीय शिवम दुबे यावर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याला बेंगलोरने 5 कोटी रुपये देत संघात घेतले आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
त्याने रणजी ट्रॉफी 2018-19 च्या स्पर्धेत मुंबई विरुद्ध बडोदा संघात झालेल्या सामन्यात मुंबईकडून खेळताना दुसऱ्या डावात फिरकी गोलंदाज स्वप्निल सिंगच्या एका षटकात पाच षटकार मारले होते. यानंतर तो प्रकाश झोतात आला होता. त्याने आत्तापर्यंत 15 टी20 सामने खेळले आहेत यात त्याने 14 विकेट्स घेतल्या आहेत, तसेच 202 धावा केल्या आहेत.
शिमरॉन हेटमेयर – विंडिजचा तडाखेबाज फलंदाज हेटमेयरने मागील वर्षी भारताविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत दमदार खेळ केला होता. त्याने भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेत 259 धावा केल्या होत्या. तसेच त्यानंतरही त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा तुफानी खेळ असाच चालू ठेवला आहे.
त्यामुळे यावर्षी रॉयल चॅलेंजर्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या हेटमेयरकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. त्याला बेंगलोरने 4.2 कोटींची बोली लावत संघात सामील करुन घेतले आहे.
सॅम करन – इंग्लंडचा या युवा खेळाडूबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. मागील काही महिन्यात त्याने सर्वांनाच त्याच्या अष्टपैलू खेळाने प्रभावित केले आहे. त्याने भारताविरुद्धही कसोटी मालिकेत मागीलवर्षी चांगली कामगिरी केली होती.
त्याला यावर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबने 7.20 कोटींची बोली लावत संघात घेतले आहे. त्याने आत्तापर्यंत 47 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने 478 धावा आणि 42 विकेट्स घेतल्या आहेत.
वरुण चक्रवर्ती – यावर्षीच्या आयपीएल लिलावात जयदेव उनाडकट बरोबरच सर्वात महागडा ठरलेला खेळाडू म्हणजे वरुण चक्रवर्ती. त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने 8.40 कोटींची बोली लावून संघात सामील करुन घेतले आहे. वरुणला संघात घेण्यासाठी या लिलावात पंजाबसह दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स अशा सर्वांनीच प्रयत्न केले होते.
वरुण तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये(टीएनपीएल) केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे सर्वांच्या समोर आला होता. त्याने या स्पर्धेत 9 विकेट्स घेतल्या होत्या. वरुणने मागीलवर्षी रणजी ट्रॉफीमध्येही पदार्पण केले आहे. त्याने हैद्राबाद विरुद्ध रणजी सामना खेळताना 1 विकेट घेतली होती.
तसेच त्याने अ दर्जाचे 9 सामने खेळले असून यात त्याने 22 विकेट्स घेतल्या आहेत. या सर्व विकेट्स त्याने मागीलवर्षीच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत घेतल्या होत्या. तसेच तो मागीलवर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–असे ५ खेळाडू ज्यांच वय ३७ पेक्षा जास्त आहे परंतु आयपीएलमध्ये करु शकतात धमाका
–आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्याला क्रिकेटर घाबरतात तो खेळाडू आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यवर बाद
–आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूने केलेला तो विक्रम आजही कोणत्याच खेळाडूला मोडता आला नाही