आपल्या राष्ट्रीय संघाकडून आयसीसी विश्वकप स्पर्धेत भाग घेण्याचे स्वप्न क्रिकेटपटू पाहत असतो. म्हणजेच प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते की एकदा तरी त्याला विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा खेळायला मिळावी. विश्वचषक इतिहासात आतापर्यंत बर्याच खेळाडूंनी एकापेक्षा जास्त विश्वचषकात आपल्या देशाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
असे काही खेळाडू आहेत ज्यांची कारकिर्दच या स्पर्धेतून सुरु झाली. तर असे बरेच खेळाडू आहेत ज्यांना आपला अंतिम सामना विश्वचषक स्पर्धेत खेळायला मिळाला. तसेच, कोणत्याही खेळाडूचा शेवटचा वनडे सामना आणि तोदेखील विश्वचषक विजेतेपदासह पूर्ण झाला असेल तर ती एक विशेष गोष्ट आहे.
आज आपण जाणून घेणार आहोत त्या ५ प्रसिद्ध खेळाडूंबद्दल ज्यांनी त्यांचा कारकिर्दीतील शेवटचा वनडे सामना विश्वचषकात खेळला आहे आणि विश्वचषक जिंकण्यातही यश मिळवले.
विश्वचषकातील अंतिम सामना हा कारकिर्दीतील शेवटचा वनडे सामना ठरलेले ५ क्रिकेटपटू –
१. एस श्रीसंत (S Sreesanth) – भारत २०११
भारतीय क्रिकेट संघाने २०११ साली एमएस धोनीच्या नेतृत्वात २८ वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकून पुन्हा इतिहास घडविला. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीसंत देखील खेळला होता. एस श्रीसंत त्या विजेत्या संघाचा एक भाग होता.
पण या सामन्यानंतर एस श्रीसंतने त्याच्या कारकिर्दीत एकही वनडे सामना खेळला नाही. श्रीसंत निवृत्त झालेला नसला तरी २०१२ मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये नाव आल्यानंतर त्यांच्यावर बीसीसीआयने बंदी घातली होती. ही बंदी सप्टेंबर २०२० मध्ये संपणार आहे.
२. ग्लेन मॅकग्रा(Glenn McGrath) – ऑस्ट्रेलिया २००७
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा हा जागतिक क्रिकेटमधील एक महान वेगवान गोलंदाज आहे. ग्लेन मॅकग्राने बरीच वर्ष ऑस्ट्रेलिया संघासाठी उत्कृष्ठ योगदान दिले आहे. त्याच्या कारकिर्दीत तो ऑस्ट्रेलियाकडून ४ विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला आणि त्याने तीन विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.
मॅकग्राने १९९६ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी पहिला विश्वचषक खेळला होता. तर २००७ मध्ये तो ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा विश्वचषक खेळला आणि हा विश्वचषक ऑस्ट्रेलियाचा संघ जिंकला होता. त्यानंतर त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला निरोप दिला.
३. इम्रान खान (Imran Khan) – पाकिस्तान १९९२
पाकिस्तान क्रिकेट संघाने एकदा विश्वचषक स्पर्धा आपल्या नावावर केली. १९९२ मध्ये पाकिस्तान संघाला इम्रान खान यांच्या नेतृत्वात विश्वचषक जिंकण्यात यश आले. तो विश्वचषक पाकिस्तानचे महान अष्टपैलू इम्रान खानचा शेवटचा विश्वचषक होता.
त्याने त्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करून संघाला जिंकवण्यात मोठा हातभार लावला. त्याने पाकिस्तानला विश्वविजेतेपद मिळवून दिल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
४. ब्रॅड हॅडिन (Brad Haddin) – ऑस्ट्रेलिया २०१५
२०१५ मध्ये न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पराभूत करुन ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. मायकेल क्लार्कच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकात माजी यष्टिरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडिन ऑस्ट्रेलियाच्या संघाची यष्टिरक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत होता.
त्या स्पर्धेत हॅडिन ऑस्ट्रेलियाचा महत्वाचा खेळाडू होता. न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळल्यानंतर हॅडिनने वनडे कारकिर्दीतून निरोप घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे २०१५ च्या विश्वचषकातील अंतिम सामना हॅडिनचा शेवटचा वनडे सामना ठरला.
५. मायकेल क्लार्क (Michael Clarke) – ऑस्ट्रेलिया २०१५
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ हा विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक वेळा विश्वचषक जिंकणारा संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे. माजी कर्णधार मायकेल क्लार्कच्या नेतृत्वात २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियन संघाने ५ व्यांदा विश्वचषक जिंकला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या महान फलंदाजांमध्ये स्थान मिळविणाऱ्या मायकेल क्लार्कने अखेरचा वनडे सामना त्याच २०१५ च्या विश्वचषकामध्ये खेळला होता. त्यानंतर त्याने आपल्या वनडे कारकीर्दीतून निवृत्ती घेतली. त्यामुळे २०१५ च्या विश्वचषकातील अंतिम सामना क्लार्कचा शेवटचा वनडे सामना ठरला.
वाचनीय लेख –
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
विक्रम जरी मोडण्यासाठी असले तरी हे ३ विक्रम मोडणे केवळ अशक्य
भारतीय संघाचे आश्विन- जडेजा होण्याची क्षमता ठेवणारे ३ फिरकीपटू