---Advertisement---

अगदी कोणताही खेळाडू खेळला तरी कसोटी क्रिकेटमध्ये हे ५ विक्रम होणे जवळपास अशक्यचं

On: बुधवार, एप्रिल 15, 2020 11:31 PM
---Advertisement---

कसोटी क्रिकेट इतिहासात आत्तापर्यंत ३०१३ खेळाडू किमान एक सामना तरी खेळले आहेत. तसेच तब्बल २००० पेक्षाही अधिक कसोटी सामने खेळले गेले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वीच इंग्लंड हा १००० कसोटी सामने खेळणारा पहिला संघही ठरला. त्यामुळे कसोटीमध्ये आत्तापर्यंत अनेक अविश्वसनीय विक्रम झाले आहेत. पण अजूनही असे काही विक्रम आहेत जे कोणालाही कसोटी क्रिकेटमध्ये करता आलेले नाहीत.

अशा आत्तापर्यंत कसोटीत न झालेल्या ५ विक्रमांचा घेतलेला आढावा (5 feats yet to be achieved in test cricket)

१. ११ व्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूचे शतक – 

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूने शतक केले आहे. मात्र कसोटी क्रिकेेटमध्ये एकदाही ११ व्या क्रमांकाच्या फलंदाजाला शतक करता आलेले नाही. कसोटीमध्ये आत्तापर्यंत १ ते १० क्रमांकाच्या फलंदाजांनी शतक केली आहेत. मात्र ११ व्या क्रमांकाच्या फलंदाजाला हा कारनामा करता आलेला नाही.

११ व्या क्रमांकावर खेळताना सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याचा विश्वविक्रम सध्या ऍश्टन एगरच्या नावावर आहे. त्याने २०१३ ला इंग्लंड विरुद्झ नॉटिंगघममध्ये खेळताना ९८ धावा केल्या होत्या. मात्र त्याला स्टुअर्ट ब्रॉडने बाद केल्याने शतक २ धावांनी हुकले होते.

२. सहाव्या आणि त्याखालील क्रमांकाच्या खेळाडूचे त्रिशतक – 

आत्तापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ३१ वेळा फलंदाजांनी त्रिशतक केले आहे. त्यातील १६ वेळा सलामीवीरांनी त्रिशतके केली आहेत. तर तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाने ८ वेळा, चौथ्या क्रमांच्या फलंदाजाने ३ वेळा आणि पाचव्या क्रमांकाच्या फलंजादाने ४ वेळा त्रिशतके केली आहेत.

मात्र आत्तापर्यंत एकदाही ६ व्या किंवा त्याखालील क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाने कसोटीत त्रिशतक केलेले नाही.

६ व्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याचा विश्वविक्रम दिग्गज क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी १९३६-३७ ला झालेल्या ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना २७० धावांची खेळी केली होती.

३. एकाच गोलंदाजाने एका कसोटी सामन्यातील सर्व २० विकेट्स घेणे – 

कसोटीमध्ये आत्तापर्यंत एकाही गोलंदाजाने एका सामन्यात २० विकेट्स घेतलेल्या नाही. कसोटीच्या एका डावात सर्व १० विकेट्स घेण्याचा कारनामा १९५६ ला इंग्लंडचे माजी गोलंदाज जिम लीकर यांने मॅचेस्टर येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऍशेस मालिकेतील सामना खेळताना सर्वात आधी केला होता.

त्यानंतर १९९९ ला दिल्लीमध्ये भारताचा माजी गोलंदाज अनिल कुंबळेने पाकिस्तान विरुद्ध एका डावातील सर्व १० विकेट्स घेत लीकर यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

लीकर यांनी मँचेस्टर येथे झालेल्या त्या सामन्यात पहिल्या डावात ९ विकेट्स घेतल्या होत्या. तर त्यांनी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सर्व १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांनी त्या सामन्यात एकूण १९ विकेट्स घेतल्या मात्र त्यांना पहिल्या डावात आणखी १ विकेट घेण्यात अपयश आल्याने त्यांना एका सामन्यात २० विकेट्स घेण्याचा कारनामा करता आला नव्हता.

पण त्यांनी त्यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम केला होता, जो आजही त्यांच्या नावावर आहे.

४. एका कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात द्विशतके –

कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यातील दोन्ही डावात द्विशतके करण्याचा विक्रम आत्तापर्यंत कोणालाही करता आलेला नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केवळ २ फलंदाजांनी हा विक्रम केला आहे.

आर्थर फॅग यांनी केंटकडून १९३८ ला एसेक्स विरुद्ध खेळताना पहिल्या डावात २४४ धावा आणि दुसऱ्या डावात नाबाद २०२ धावांची खेळी केली होती. त्यावेळी ते प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका सामन्यात दोन्ही डावात द्विशतकी खेळी करणारे पहिले क्रिकेटपटू ठरले होते.

त्यानंतर २०१९ मध्ये अंगेलो परेराने नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबकडून खेळताना सिंहाली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध पहिल्या डावात २०१ आणि दुसऱ्या डावात २३८ धावा केल्या होत्या. या व्यतिरिक्त कोणालाही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही एका सामन्याच्या दोन्ही डावात द्विशतक करता आलेले नाही.

आत्तापर्यंत कसोटीत ६९ खेळाडूंनी एका सामन्याच्या दोन्ही डावात शतके केली आहेत. मात्र एकाही खेळाडूला दोन्ही डावात द्विशतक करता आलेले नाही.

५. कसोटीत ४ चेंडूत ४ विकेट्स घेण्याची कामगिरी – 

कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत ४५ वेळा खेळाडूंनी ३ चेंडूत ३ फलंदाजांना बाद करत हॅट्रिक घेतली आहे. मात्र आत्तापर्यंत कोणत्याच क्रिकेटपटूला सलग ४ चेंडूत ४ विकेट्स कसोटी क्रिकेटमध्ये घेता आलेले नाही.

वनडे आणि टी२०मध्ये सलग ४ चेंडूत ४ विकेट्स घेण्याचा कारनामा श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाने केला आहे. तसेच अफगाणिस्तानचा युवा गोलंदाज राशिद खानने टी२०मध्ये असा कारनामा केला आहे.

मलिंगाने २००७ च्या वनडे विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ चेंडूत ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर त्यानेच २०१९ ला न्यूझीलंडविरुद्ध टी२० सामना खेळताना ४ चेंडूत ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. राशिदने २०१९ ला आयर्लंडविरुद्ध टी२० सामना खेळताना ४ चेंडूत ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. मात्र कसोटीत सलग ४ चेंडूत ४ विकेट्स घेण्याची कामगिरी आत्तापर्यंत कोणालाही करता आलेली नाही. 

ट्रेंडिंग घडामोडी – 

कसोटीत दोन्ही डावात शतक करणारे ६ भारतीय दिग्गज फलंदाज

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक धावा करणारे ५ कसोटीपटू

निवृत्तीनंतर सर्वाधिक ट्विट करणारे ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---