---Advertisement---

सुरेश रैनाने खेळलेल्या ५ महत्त्वाच्या खेळी, ज्यामुळे त्याला भारतीय क्रिकेटमध्ये विशेष ओळख…

On: गुरूवार, ऑगस्ट 20, 2020 8:48 PM
---Advertisement---

भारताच्या स्वातंत्र्य दिनी भारतीय क्रिकेटच्या दोन खेळाडूंनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने आपली निवृत्ती जाहीर केल्यानंतर, काही वेळातच त्याच्याबरोबर खेळलेल्या सुरेश रैनानेही अचानक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

सुरेश रैनाने २२६ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी ५ शतकांसह ३५.३१ च्या सरासरीने ५६१५ धावा केल्या. त्याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये सुरेश रैनाला जास्त संधी मिळाली नाही. त्याने १८ कसोटी सामन्यात एका शतकासह ७८६ धावा केल्या. टी-२० मध्ये रैनाने ७८ सामन्यांत १६०५ धावा केल्या आणि एक शतकही ठोकले.

पण एमएस धोनीबरोबर निवृत्त झालेल्या सुरेश रैनाच्या भारतीय क्रिकेट संघातील योगदानाबद्दलची जास्त चर्चा कोणी केली नाही, परंतु त्याने अनेक वेळा भारतीय संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे. या लेखात सुरेश रैनाने खेळलेल्या ५ महत्त्वाच्या खेळींचा आढावा घेतला आहे, ज्यामुळे त्याला भारतीय क्रिकेटमध्ये विशेष ओळख मिळाली…

सुरेश रैनाने खेळलेल्या ५ महत्त्वाच्या खेळी – 

७१ धावा वि. ऑस्ट्रेलिया – २०१० (विशाखापट्टनम)

भारतीय क्रिकेट संघाने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. या वनडे मालिकेत पहिला आणि तिसरा वनडे सामना पावसामुळे धुऊन गेला. पण दुसरा वनडे सामना विशाखापट्टणममध्ये खेळला गेला. त्या सामन्यात भारताने जबरदस्त कामगिरी करत २९० धावांचे लक्ष्य गाठले.

या सामन्यात विराट कोहली आणि युवराज सिंग यांनी ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येचा पाठलाग करताना शानदार फलंदाजी केली. अखेर सुरेश रैनाने अतिशय तुफानी डाव खेळला. रैनाने केवळ ४७ चेंडूत ७१ धावा ठोकून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

१२० धावा वि. श्रीलंका – २०१० (कोलंबो)

२०१० मध्ये भारतीय कसोटी संघात श्रीलंके विरुद्ध सुरेश रैनाचे पदार्पण झाले. सुरुवातीला रैना हा भारतासाठी मर्यादित षटकांचा फलंदाज मानला जात होता पण अखेर कसोटीत त्याला संधी मिळाली. पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करून सर्वांना प्रभावित केले.

श्रीलंकेविरुद्धच्या या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सुरेश रैनाने शानदार १२० धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये स्वत: ला सिद्ध करण्यासाठी त्याच्यावर खूप दबाव होता, परंतु त्याने जबरदस्त खेळी करून कसोटी कारकिर्दीची सुरुवात उत्तमरित्या केली होती.

८२ धावा वि वेस्ट इंडीज – २०११ (किंग्स्टन)

सुरेश रैनाने आपल्या कारकिर्दीत काही असे खेळी खेळले ज्यात त्याने आपली एक प्रचंड छाप सोडली. २०११ मध्ये वेस्ट इंडिज दौर्‍यावरील कसोटी मालिकेत रैनाला संधी मिळाली. येथे किंग्सटन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात रैनाला संघात घेतले. या सामन्यात रैनाने आपली छाप सोडली.

या सामन्यात रैना भारताच्या पहिल्या डावातील ८५ धावांत ६ गडी बाद झाल्यानंतर खेळण्यास आला होता. त्याने हरभजन सिंग सोबत डाव सांभाळला आणि भारताला सन्माननीय धावसंख्या गाठून दिली. रैनाने स्वत: उत्कृष्ट फलंदाजी करत ११५ चेंडूत ८२ धावांची खेळी केली. रैनाच्या खेळीच्या मदतीने भारताने त्या डावात २४६ धावा केल्या.

३४ धावा वि.ऑस्ट्रेलिया २०११ – (विश्वचषक उपांत्यपूर्व फेरी)

२०११ चे विश्वचषक भारतीय क्रिकेट संघाने जिंकला. हा विश्वचषक जिंकून भारताने २८ वर्षांनंतर इतिहास पुन्हा घडविला होता. पण या अंतिम विजयापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला उपांत्यपूर्व सामना खूप महत्वाचा ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या उपांत्यपूर्व सामन्यात भारताला २६० धावांचे लक्ष्य होते, या सामन्यात भारताची सुरुवात काही खास नव्हती. १८७ धावांमध्ये ५ बळी गमावले होते, परंतु येथून सुरेश रैनाने खूप चांगला डाव सांभाळला.

रैनाने ३४ धावांची अत्यंत महत्वपूर्ण खेळी साकारली. युवराज सिंगसह त्याने नाबाद ७४ धावांची भागीदारी करत भारताला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचविले. या खेळीनंतर सुरेश रैनाला फिनिशर म्हणून ओळखले गेले.

३६ धावा वि. पाकिस्तान – २०११ (विश्वचषक उपांत्य सामना)

२०११ मधील विश्वचषक भारतीय संघाने आपल्या नावे करून दुसर्‍यांदा विजेतेपद जिंकले. भारतीय क्रिकेट संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वात विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले होते, परंतु आधी भारताने पाकिस्तानला उपांत्य सामन्यात पराभूत करून अंतिम सामन्यातील आपला मार्ग निश्चित केला होता.

भारतीय फलंदाज आणि पाकिस्तानी गोलंदाज यांच्यात चांगली स्पर्धा झाली. एकवेळ भारत १८७ धावांवर असताना ५ विकेट्स अशा अवस्थेत होता. त्यावेळी रैना फलंदाजीला आला.  एका बाजूने विकेट्स जात असताना रैना धैर्याने उभा राहिला आणि त्याने छोटेखानी पण महत्त्वपूर्ण नाबाद ३६ धावांची खेळी केली. अखेर भारताने ५० षटकांत २६० धावा केल्या. पुढे या सामन्यात पाकिस्तानचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर २३१ धावांवर सर्वबाद झाला आणि या सामन्यात भारताने पाकिस्तानला २९ धावांनी पराभूत केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---