कसोटी क्रिकेट म्हटलं की नेहमीच फलंदाजांच्या संयमाची परिक्षा पाहिली जाते. त्यातही प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात बऱ्याचदा २ डाव खेळावे लागतात. अशा वेळी प्रत्येक डावात प्रत्येक खेळाडूला नव्याने सुरुवात करावी लागते.
अशावेळी काहीवेळेस एखादा खेळाडू दोन्ही डावात चांगली कामगिरी करुन चमकून जातो. तर काहीवेळेस पहिल्या डावात अतिशय चांगला खेळलेला खेळाडू दुसऱ्या डावात अपयशीही ठरु शकतो. तर पहिल्या डावात चांगली कामगिरी करता न आलेल्या खेळाडूला दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करण्याची संधी असते.
कसोटीमध्ये अनेकदा तर असेही झाले आहे की एखादा फलंदाज एका डावात शतक तर एका डावात शून्यावर बाद झाला आहे. असा अनोखा कारनामा करणाऱ्या ५ भारतीय फलंदाजांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
५. शिखर धवन – विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड, २०१४
२०१४ च्या न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना ऑकलंडला झाला होता. त्या सामन्यातील पहिल्या डावात शिखर धवन शुन्यावर बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात त्याने शतक केले होते. त्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पण केन विलियम्सनच्या शतकी आणि ब्रेंडन मॅक्यूलमच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात ५०३ धावा केल्या.
त्याच्या प्रतिउत्तरादाखल भारताला पहिल्या डावात केवळ २०२ धावा करता आल्या. भारताकडून या डावातच्या तिसऱ्याच चेंडूवर शिखर ट्रेंट बोल्टने टाकलेल्या आऊट स्विंगरवर झेलबाद झाला. स्लिपमध्ये उभ्या असणाऱ्या विलियम्सनने त्याचा झेल घेतला.
यानंतर मात्र न्यूझीलंडचा दुसरा डाव केवळ १०५ धावांवर संपुष्टात आला. परंतू पहिल्या डावात घेतलेल्या ३०१ धावांच्या आघाडीसह न्यूझीलंडने भारताला ४०७ धावांचे लक्ष दिले. त्यावेळी सामन्याचे अडीच दिवस बाकी होते. दुसऱ्या डावातही शिखर बोल्टच्याच गोलंदाजीवर लवकर बाद होता होता वाचला. त्याचा झेल सुटला होता. या जीवदानाचा फायदा घेत शिखरने ११५ धावांची शतकी खेळी केली. मात्र त्याच्या शतकी खेळीनंतरही भारताला या सामन्यात ४० धावांनी पराभव स्विकारावा लागला.
४. राहुल द्रविड – विरुद्ध इंग्लंड, मोहाली, २००८
‘द वॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने आत्तापर्यंत अनेक संयमी खेळी केली आहे. तसेच अनेक विक्रमही केले आहेत. यात २००८ ला मोहालीत झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने एका डावात शतक तर एका डावात शून्यावर बाद होण्याच्या विक्रमाचाही समावेश आहे. पण यापेक्षाही हा सामना त्यावेळीचा भारताचा कर्णधार एमएस धोनीने भारताचा दुसरा डाव एवढ्या उशीरा घोषित का केला म्हणून चर्चेचा विषय ठरला होता.
या अनिर्णित राहिलेल्या सामन्यात द्रविडने पहिल्या डावात शानदार शतकी खेळी करताना गौतम गंभीरबरोबर दुसऱ्या विकेटसाठी ३१४ धावांची त्रिशतकी भागीदारी रचली होती. यावेळी द्रविडने १३६ धावा केल्या होत्या तर गंभीरने १७९ धावा केल्या होत्या.
पण दुसऱ्या डावात द्रविड अशीच शानदार कामगिरी करण्यात अपयशी ठरला. तो दुसऱ्या डावात १९ चेंडू खेळल्यानंतर शुन्यावर स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला होता.
३. विरेंद्र सेहवाग – विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, २०१०
भारताचा माजी स्फोटक सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागचेही एकाच कसोटीत शतकी खेळी आणि शुन्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत नाव आहे. तो २०१० ला श्रीलंका दौऱ्यात कसोटी मालिकेतील कोलंबो येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत एका डावात शुन्यावर बाद झाला होता, तर एका डावात शतकी खेळी त्याने केली होती.
त्या सामन्यात श्रीलंकेने पहिल्या डावात ४२५ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरादाखल पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून सेहवागने चांगली सुरुवात दिली. त्याने आक्रमक खेळताना ८९ चेंडूतच शतक केले. त्याने १०९ धावा केल्या होत्या. त्याच्या या शतकी खेळीमुळे भारताला या सामन्यात ११ धावांची आघाडी घेता आली. भारताने पहिल्या डावात ४३६ धावा केल्या. श्रीलंकेचा दुसरा डाव २६७ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे त्यांनी भारताला २५५ धावांचे आव्हान दिले.
या आव्हानाचा पाठलाग करताना मात्र सेहवागला पहिल्या डावात केला तसा कारनामा करण्यात अपयश आले. तो सुरज रणदिवने टाकलेल्या डावातच्या तिसऱ्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला. पण तरी भारताला या सामन्यात विजय मिळवून देण्यात व्हीव्हीएस लक्ष्मणने महत्त्वाचा वाटा उचलला.
सेहवाग त्याआधी २००२ ला इंग्लंड विरुद्ध नॉटिंगघमला झालेल्या सामन्यातही पहिल्या डावात १०६ धावांवर आणि दुसऱ्या डावात शुन्यावर बाद झाला होता.
२. विराट कोहली – विरुद्ध श्रीलंका, कोलकाता, २०१७
२०१७ ला श्रीलंकाने केलेल्या भारत दौऱ्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर झाला होता. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत होता. मात्र या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचा व्यत्यय आल्याने केवळ ११.५ षटकांचा खेळ झाला.
पण या ११ षटकातही सुरंगा लकमलला भारताच्या ३ विकेट्स घेण्यात यश आले. त्याने या ३ विकेट्समध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीचीही विकेट घेतली होती. विराट शुन्यावर पायचीत झाला होता.
त्यावेळी भारताने पहिल्या डावात १७२ धावा केल्या होत्या. तर श्रीलंकेला पहिल्या डावात धावा करता आल्या २९४ होत्या. त्यामुळे त्यांनी १२२ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या होत्या. पण एका बाजूने विराट खेळपट्टीवर स्थिरावला होता. त्याने खेळपट्टीवर स्थिरावत त्याचे शतक पूर्ण केले. हे विराटचे इडन गार्डनवरील पहिले कसोटी शतक ठरले होते. त्याने १९९ चेंडूत नाबाद १०४ धावा केल्या होत्या.
त्याच्या या शतकामुळे आणि शिखर धवन आणि केएल राहुलच्या अर्धशकांमुळे भारताने ३५२ धावा करत श्रीलंकेला २३१ धावांचे आव्हान दिले. श्रीलंकेने दुसऱ्या डावात ७ बाद ७५ धावा केलेल्या असताना सामन्याचा पाचवा दिवस संपल्याने हा सामना अनिर्णित राहिला.
१. सचिन तेंडुलकर – विरुद्ध वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन, २००२
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचेही एकाच कसोटीत शतकी खेळी आणि शुन्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत नाव आहे. सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या सचिनने असा अनोखा कारनामा पोर्ट ऑफ स्पेनला २००२ ला झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यात केला होता.
त्याने या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून ११७ धावांची खेळी केली. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३३९ धावा केल्या. त्यानंतर प्रतिउत्तरादाखल उतरलेल्या वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४५ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे भारताला ९४ धावांची आघाडी मिळाली.
पण भारताचा दुसरा डाव २१८ धावांवरच उरकला. या डावात सचिनही ४ चेंडू खेळून ऍडम स्टॅनफॉर्डने टाकलेल्या चेंडूवर शुन्यावर पायचीत झाला. दुसऱ्या डावात ३१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला २७५ धावांच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना ३७ धावांनी जिंकला.
या सामन्याआधी १९९९ ला चेन्नई येथे पाकिस्तान विरुद्ध झालेल्या कसोटीतही सचिन पहिल्या डावात शुन्यावर बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात सचिनने १३६ धावांची शतकी खेळी केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी –
अंडर १९ विश्वचषकात प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार जिंकणारे ५ भारतीय दिग्गज
फक्त महाराष्ट्रीय खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची वनडे ड्रीम ११
कोहलीसोडून टीम इंडियाचे कर्णधार होण्यासाठी तयार असलेले ३ खेळाडू