क्रिकेट आणि बॉलिवूड यामधील नातं फार जुन आहे. भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहे, तर त्यांच्यातील काही प्रेमकथा अधुऱ्या देखील राहिलेल्या आहेत. तसेच भारतीय संघातील असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. आपण या लेखात बघणार आहोत असे 5 भारतीय क्रिकेटपटू ज्यांनी क्रिकेटचे मैदान गाजवण्याबरोबरच चित्रपट क्षेत्रात देखील काम केले.
1) हरभजन सिंग –
भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने भारताकडून 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. तसेच हरभजनने तमिळ चित्रपट “फ्रेंडशिप” मध्ये देखील काम केले आहे. या सिनेमात तो प्रमुख भूमिका साकारत आहे आणि विशेष म्हणजे यात तो जबरदस्त अॅक्शन करताना देखील दिसत आहे. अर्जुन, लोसलिया यांनीही या तामिळ चित्रपटात काम केले आहे. तो यापूर्वी ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटातही छोट्या भूमिकेत दिसला होता.
2) इरफान पठाण –
माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आपला मोर्चा चित्रपट क्षेत्राकडे वळवला आहे. इरफानने ‘कोब्रा’ या तमिळ चित्रपटात काम केले आहे. अजय ज्ञानमुथु दिग्दर्शित हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही.
3) कपिल देव –
भारतीय संघाला आपल्या नेतृत्वात 1983 साली पहिल्यांदा विश्वचषक जिंकवणारे दिग्गज अष्टपैलू कपिल देव हे देखील चित्रपटात दिसले आहेत. ‘इक्बाल’ आणि ‘आर्यन’ यासारख्या काही चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केलेली आहे.
4) सुनील गावसकर –
क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळख असणारे लिटल मास्टर सुनील गावसकर यांनीही खेळाच्या मैदानावर ताकद दाखवल्यानंतर चित्रपटांमध्ये काम केले आहे. गावसकर यांनी ” सावली प्रेमाची ” या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. ते विनोदी हिंदी चित्रपट मालामालमध्ये देखील दिसलेले आहेत.
5) विनोद कांबळी –
भारताचे दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यांचे जिवलग मित्र व माजी खेळाडू विनोद कांबळी यांनीही चित्रपटात काम केले आहे. त्यांनी 2002 साली रिलीज झालेल्या ‘अनर्थ’ चित्रपटात अभिनय केला होता. त्या चित्रपटात त्यांच्यासमवेत संजय दत्त आणि सुनील शेट्टी देखील होते.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहलीची प्रशंसा करणार्या पोस्टवर डेव्हिड वॉर्नरने दिला ‘हा’ भन्नाट रिप्लाय