विश्वचषक ही क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. त्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे एकदातरी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न असते. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे आणि टी२० असे २ विश्वचषक खेळवण्यात येतात.
भारतीय संघाने आत्तापर्यंत १९८३ आणि २०११ असे २ वनडे विश्वचषक जिंकले आहेत. तसेच २००७ ला टी२० विश्वचषक जिंकला आहे. पण वनडे विश्वचषकांचा विचार करता भारताने जिंकलेल्या २ विश्वचषकांमध्ये २८ वर्षांचे अतंर आहे. त्यामुळे कोणत्याच भारतीय संघाला २ वनडे विश्वचषक जिंकता आलेले नाही.
पण २००७ चा टी२० विश्वचषक आणि २०११ च्या वनडे विश्वचषकामध्ये केवळ ४ वर्षांचे अंतर असल्याने २००७ च्या टी२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाकडून खेळलेले काही क्रिकेटपटू २०११ च्या वनडे विश्वचषकाचाही भाग होते. त्यामुळे त्यांना भारताकडून २ विश्वचषक जिंकण्याचे भाग्य लाभले. अशाच क्रिकेटपटूंचा घेतलेला हा आढावा –
२००७ टी२० विश्वचषकाच्या आणि २०११ वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळलेले ५ भारतीय खेळाडू – (5 Indian players who featured in the country’s final triumphs at two World Cup tournaments)
१. एमएस धोनी – २००७ च्या पहिल्या टी२० विश्वचषकात आणि २०११ वनडे विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व एमएस धोनीने केले आहे. त्यामुळे तो वनडे आणि टी२० विश्वचषक जिंकणारा पहिला कर्णधार होता. या दोन्ही विश्वचषकात त्याने कर्णधार म्हणून घेतलेले अनेक निर्णय महत्त्वाचे ठरले होते.
२००७ च्या टी२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या अंतिम सामन्यात धोनीला ६ धावाच करता आल्या होत्या. पण त्या सामन्यात त्याने लावलेले क्षेत्ररक्षण महत्त्वाचे ठरले होते. तसेच त्या सामन्यात गोलंदाजी करताना थोडे महागडे ठरलेल्या हरभजन सिंग आणि एस श्रीसंत ऐवजी शेवटच्या षटकात १३ धावांचे रक्षण करण्यासाठी धोनीने अनुभव नसलेल्या जोगिंदर शर्माला चेंडू सोपवला होता. हा निर्णयही निर्णायक ठरला होता.
तसेच २०११ च्या वनडे विश्वचषकाच्या श्रीलंका विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात धोनी सामनावीर ठरला होता. त्याने त्या सामन्यात गौतम गंभीरबरोबर चौथ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण १०९ धावांची भागीदारी केली होती. तसेच त्या सामन्यात गंभीर ९७ धावांवर बाद झाल्यानंतर त्याने युवराज सिंगला हाताशी घेत भारताचे नाव विश्वचषकाच्या ट्रॉफीवर कोरले होते.
त्यावेळी तो वनडे विश्वचषक जिंकणारा कपिल देव यांच्यानंतरचा दुसराच भारतीय कर्णधार ठरला होता. त्याने त्या सामन्यात नाबाद ९१ धावांची खेळी केली होती.
२. गौतम गंभीर – २००७ च्या टी२० विश्वचषकातील आणि २०११ च्या वनडे विश्वचषकातील महत्त्वाचा शिलेदार म्हणजे गौतम गंभीर. त्याने दोन्ही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. २००७ च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने पाकिस्तान विरुद्ध ५४ चेंडूत ७५ धावांची खेळी केली होती. ज्यामुळे भारतीय संघ आव्हानात्मक धावसंख्या धावफलकावर झळकावू शकला होता.
तसेच २०११ वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या दिग्गजांच्या विकेट गमावल्यानंतर गंभीरने त्यावेळीच्या युवा विराट कोहलीला साथीला घेत अर्धशतकी भागीदारी करुन डाव सावरला होता. तसेच विराट बाद झाल्यावर त्याने धोनीला साथीला घेत भारताचा डाव पुढे नेला होता.
त्या सामन्यात त्याच्यातील आणि धोनीमधील १०९ धावांची भागीदारी झाली असताना तो ९७ धावांवर नुवान कुलसेकराच्या गोलंदाजी वर त्रिफळाचीत झाला होता. पण तोपर्यंत भारतीय संघ त्या सामन्यात भक्कम स्थितीत पोहचला होता. त्यामुळे त्याची ९७ धावांची खेळी महत्त्वाची ठरली होती.
३. युवराज सिंग – अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने २००७ चा टी२० विश्वचषक आणि २०११ चा विश्वचषक त्याच्या कामगिरीने गाजवला होता. त्याने दोन्ही विश्वचषक भारतीय संघाला जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. २००७ च्या टी२० विश्वचषकातच युवराजने इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ६ चेंडूत ६ षटकार खेचले होते. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य सामन्यात त्याने ३० चेंडूत आक्रमक ७० धावांची खेळी केली होती. मात्र अंतिम सामन्यात तो १४ धावांवरच बाद झाला होता. पण असे असले तरी भारतीय संघाने सांघिक कामगिरी करत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती.
त्यानंतर ४ वर्षांनी झालेल्या २०११ च्या वनडे विश्वचषकात युवराज मालिकावीराचा मानकरी ठरला होता. त्याने त्या विश्वचषकात ४ सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. तसेच अंतिम सामन्यात त्याने धोनीबरोबर गंभीर बाद झाल्यानंतर नाबाद ५४ धावांची भागीदारी रचली होती. त्यावेळी त्याने नाबाद २१ धावा केल्या होत्या.
तसेच त्यानेगोलंदाजी करताना श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा आणि तिलन समरावीरा यांच्या विकेट्सही घेतल्या होत्या. त्याने या विश्वचषकात ३६२ धावा केल्या होत्या आणि १५ विकेट्सही घेतल्या होत्या.
४. एस श्रीसंत – क्रिकेटमध्ये नेहमीच वादग्रस्त घटनांमध्ये अडकला असलेला श्रीसंतही २००७ टी२० विश्वचषकाच्या आणि २०११ वनडे विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता.
श्रीसंतने २००७ च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ४ षटकात ४४ धावा दिल्या होत्या. पण तरही त्याने पाकिस्तानच्या मिस्बाह उल हकचा शेवटचा झेल उत्कृष्टरित्या घेत भारताच्या विजेदेपदावर शिक्कामोर्तब केले होते. त्याचा झेल महत्त्वाचा ठरला होता. मिस्बाहची विकेट ही पाकिस्तानची शेवटची विकेट होती. त्यामुळे त्या झेल नंतर भारताने तो सामना ५ धावांनी जिंकला होता.
२०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी आशिष नेहरा दुखापतग्रस्त झाल्याने श्रीसंतला अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. पण त्याला खास काही करता आले नव्हते. त्याने एकही विकेट न घेता ८ षटकात ५२ धावा दिल्या होत्या. पण अन्य खेळाडूंची कामगिरी चांगली झाल्याने श्रीसंतच्या कामगिरीचा जास्त फरक भारतीय संघाला अंतिम सामन्यात पडला नाही.
५. हरभजन सिंग – भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगची कामगिरीही दोन्ही विश्वचषकात महत्त्वाची ठरली असली तरी २००७ च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हरभजन सिंग थोडा महगडा ठरला होता. त्यामुळे त्याने त्याच्या कोट्यातील सर्व ४ षटके गोलंदाजीही नव्हती केली. त्याने ३ षटकात ३६ धावा देत एकही विकेट घेतली नव्हती. पण अखेर भारताने हा सामना जिंकल्याने तोही विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग होता.
तसेच २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हरभजनने तिलत्करने दिलशानची महत्त्वाची विकेट घेत भारताला चांगली सुरुवात दिली होती. पण त्याला या सामन्यातही या १ विकेटशिवाय खास काही करता आले नव्हते. पण असे असले तरी त्याची संपूर्ण विश्वचषकात चांगली कामगिरी झाली होती. त्याने या विश्वचषकात ९ सामन्यात ९ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
का झाला होता २०११च्या विश्वचषक अंतिम सामन्यात दोन वेळा टाॅस?
ईशान-सूर्याच्या फिटनेसबाबत मुंबई इंडियन्सकडून आले अपडेट; राजस्थानविरुद्ध…
चर्चित आयुष बडोनीला मेंटर गंभीरने दिला मोलाचा सल्ला; म्हणाला…