आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ क्रिकेट प्रकारांचा समावेश होतो, ते म्हणजे कसोटी, वनडे आणि टी२० क्रिकेट होय. यांमध्ये सर्वप्रथम आरंभ झाला तो कसोटी क्रिकेटचा. कसोटी हा सर्वाधिक सावकाश खेळला जाणारा क्रिकेट प्रकार आहे. यामध्ये एक सामना तब्बल ५ दिवस चालतो. यांमध्ये फलंदाजांची चांगलीच कसोटी लागलेली असते. परंतु यामध्ये फलंदाजांना आपल्या स्ट्राईक रेटची पर्वा नसते. कारण तिथे टिकून खेळत संघाच्या धावसंख्येत भर घालण्याला महत्त्व असते. परंतु कसोटी नंतर वनडे आणि टी२० हे असे क्रिकेट प्रकार आहेत, जिथे एका फलंदाजाच्या स्ट्राईक रेटला खूप महत्त्व असते. परंतु वनडे क्रिकेटच्या सुरुवातीलाही तब्बल २ ते ३ दशकांत स्ट्राईक रेटला फारसे महत्त्व दिले जात नसल्याचे पहायला मिळत होते. वनडे आणि टी२०त एक फलंदाज जेव्हा वेगाने धावा बनवतो, तेव्हा तो आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करत असतो.
वनडे क्रिकेटच्या ७० आणि ८० दशकांमध्ये फलंदाजांच्या स्ट्राईक रेटकडे फारसे लक्ष दिल जात नव्हते. परंतु वनडे क्रिकेट जस- जसा पुढे वाटचाल करू लागला, तस- तसा फलंदाजांच्या स्ट्राईक रेटचे महत्त्वही वाढत गेले.
यानंतर तर वनडे क्रिकेटमध्येही फलंदाजांचा स्ट्राईक रेट ८० च्या पलीकडे जाऊ लागला आणि फलंदाजांनी आक्रमकता दाखविली. परंतु याच दरम्यान भारतीय संघाकडे वनडेत असे काही दिग्गज फलंदाज होते, ज्यांचा स्ट्राईक रेट कमी होता.
चला तर मग जाणून घेऊया त्या ५ भारतीय फलंदाजांबद्दल, ज्यांचा वनडे क्रिकेटमधील स्ट्राईक रेट फारच कमी आहे.
वनडेत सर्वाधिक कमी स्ट्राईक रेट असणारे ५ भारतीय फलंदाज
५. नवज्योत सिंग सिद्धू- ६९.७२
भारतीय क्रिकेट संघाला एकापेक्षा एक उत्कृष्ट सलामीवीर फलंदाज लाभले आहेत. या सलामीवीर फलंदाजांमध्ये एक नाव होते, ते म्हणजे नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu). सिद्धू यांनी ८० आणि ९०च्या दशकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ज्यामध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली.
सिद्धू यांनी भारतीय संघाकडून १३६ वनडे सामने खेळले. यादरम्यान त्यांनी ६९.७२ इतक्या स्ट्राईक रेटने ४४१३ धावा केल्या. भारतीय वनडे क्रिकेट इतिहासात सर्वात कमी स्ट्राईक रेट हा सिद्धू यांचाच आहे.
४. अजय जडेजा- ६९.७९
भारतीय संघाचा माजी फलंदाज अजय जडेजाचे (Ajay Jadeja) नाव एक मोठा मॅच विनरच्या रूपात घेतले जाते. जडेजाने भारतीय क्रिकेट संघाचे कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्याला वनडे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील मजबूत फलंदाज मानले जात होते. त्याने मधल्या फळीत भारतीय संघाकडून चमकदार खेळी केल्या आहेत.
तसं पाहिलं तर जडेजाला आक्रमक फलंदाजाच्या रूपातही पाहिले जात होते. परंतु त्याच्या वनडे कारकिर्दीतील स्ट्राईक रेट हा फार कमी राहिला आहे. जडेजाने भारताकडून १९६ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने ६९.७९ च्या स्ट्राईक रेटने ५३५९ धावा केल्या आहेत.
३. राहुल द्रविड- ७१.१८
भारतीय क्रिकेट इतिहासातील महान फलंदाज, ज्याला ‘द वॉल’ म्हणून ओळखले जाते तो माजी खेळाडू म्हणजेच राहुल द्रविड (Rahul Dravid). जेव्हाही दिग्गज फलंदाजांची चर्चा होते, तेव्हा द्रविडचे नाव आपसुकच प्रत्येकाच्या मुखात येते. द्रविडने भारतीय क्रिकेट संघासाठी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे तसेच त्याने अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. ज्याप्रकारे द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये महान फलंदाज मानला जात होता, त्याचप्रकारे त्याला वनडेतही भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा दिग्गज फलंदाज मानले जात होते.
द्रविडने भारताकडून ३४० सामने खेळले आहेत. त्यात त्याने १०७६८ धावा केल्या आहेत. परंतु द्रविड चांगला फलंदाज असला तरी त्याला स्ट्राईक रेट मात्र राखता आला नाही. त्याने त्याच्या कारकिर्दीत केवळ ७१.१८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.
२. व्हीव्हीएस लक्ष्मण- ७१.२३
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणला (VVS Laxman) एक कसोटी फलंदाज म्हणून ओळखले जाते. लक्ष्मणने आपल्या कारकिर्दीत ज्याप्रकारे कामगिरी केली आहे, त्यावरून त्याला भारतीय संघाचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज समजले जाते. तसं पाहिलं तर लक्ष्मणला भारतीय वनडे संघाकडूनही खेळण्याची संधी मिळाली.
लक्ष्मणने भारतीय संघाकडून ८६ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने २३३८ धावा केल्या आहेत. लक्ष्मणला कसोटीप्रमाणे वनडेतही तीच सातत्यता ठेवता आली नाही. त्यामुळे त्याचा वनडे कारकिर्दीतील स्ट्राईक रेट हा ७१.२३ आहे.
१. कृष्णमचारी श्रीकांत- ७१.७४
भारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर फलंदाज कृष्णमचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) एक दिग्गज फलंदाज राहिले आहेत. श्रीकांत यांनी अनेक वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. याबरोबरच श्रीकांत १९८३ सालच्या विश्वचषक भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. श्रीकांत यांचा समावेशही सर्वात कमी स्टाईक रेट असणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये होतो.
त्यांनी भारतीय संघाकडून १४६ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ४०९१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांनी ७१.७४ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
-२०२०मध्ये बेंगलोर शंभर टक्के जिंकणार आयपीएल परंतू या ३ सुधारणा केल्यावरच