साल २००८ पासून सुरु झालेल्या इंडियन प्रीमीयम लीगने गेल्या १३ वर्षात मोठी प्रगती केली आहे. आयपीएल अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाचा टप्पा देखील ठरला आहे. अनेक क्रिकेटपटू आत्तापर्यंत आयपीएलमध्ये खेळले आहेत. आयपीएलमध्ये बऱ्याचदा अनेक संघ प्रत्येकवेळी युवा खेळाडूंना पसंती देत असल्याचे दिसून येते. पण वयस्कर खेळाडूंना पसंती देताना अनेक संघ बराच विचार करतात. वयाच्या ४० व्या वर्षानंतर आयपीएलमध्ये खूप कमी खेळाडू खेळले आहेत. अगदी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड हे देखील ४० व्या वर्षापर्यंतच आयपीएलमध्ये खेळले. आयपीएलमध्ये वयाच्या ४५ व्या वर्षानंतर केवळ १ क्रिकेटपटू खेळला आहे. या लेखात अशा आयपीएलमध्ये खेळलेल्या वयस्कर ५ खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे.
आयपीएलमध्ये खेळलेले वयस्कर खेळाडू – 5 oldest cricketers in IPL history
५. ऍडम गिलख्रिस्ट –
ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट नेहमीच त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. त्याच्या आक्रमक खेळण्याच्या शैलीमुळे तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्येही यशस्वी ठरला. त्याने आयपीएलमध्ये खेळतानाही चांगली कामगिरी केली. त्याने आयपीएलमध्ये ८० सामने खेळताना २०६९ धावा केल्या.
विशेष म्हणजे त्याने ३५ व्या वर्षानंतर आयपीएल खेळायला सुरुवात केली. गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली डेक्कन चार्जर्सने २००९ ला आयपीएलचे विजेतेपदही मिळवले होते. गिलख्रिस्ट २०१३ ला किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व करताना शेवटचा आयपीएल सामना खेळला. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध हा सामना खेळला. त्यावेळी त्याचे वय ४१ वर्षे १८५ दिवस एवढे होते.
तसेच त्या सामन्यात त्याने गोलंदाजीही केली होती. तेव्हा त्याने हरभजन सिंगला बाद केले होते. ती गिलख्रिस्टची टी२० कारकिर्दीत गोलंदाजी करण्याची पहिलीच वेळ होती.
४. शेन वॉर्न –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीने फलंदाजांना संकटात टाकण्याऱ्या शेन वॉर्नने अनेक विक्रम केेले आहेत. तो २००८ ला पहिले आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार देखील होता. त्यावेळी तो ३८ वर्षांचा होता. तो राजस्थानकडून २०११ पर्यंत खेळला. तो शेवटचा आयपीएल सामना २०११ ला मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थानचे नतृत्व करताना खेळला. त्यावेळी तो ४१ वर्षे २४९ दिवस इतक्या वर्षांचा होता.
त्या सामन्यात त्याने रोहित शर्माला बाद केले होते. तसेच तो सामना राजस्थानने १० विकेट्सने जिंकला होता. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतरही वॉर्न बिग बॅश लीगमध्ये पुढे २ मोसम खेळला. त्याने २०१३ ला व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
३. मुथय्या मुरलीधरन –
श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनची कारकिर्द जेवढी मोठी होती तेवढीच शानदार होती. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. तो आयपीएलमध्येही पहिल्या ७ मोसमात ३ संघांकडून खेळला. तो पहिले ३ मोसम चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. २०११ ला तो कोची टस्कर्स केरलाकडून खेळला. तर पुढील ३ मोसम तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला. त्याने एकूण ६६ आयपीएल सामने खेळताना ६३ विकेट्स घेतल्या.
तो त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना २०१४ ला बेंगलोरकडून कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळला. त्यावेळी तो ४२ वर्षे ३५ दिवस एवढ्या वयाचा होता. त्या सामन्यात त्याने २ षटके गोलंदाजी केली होती आणि १९ धावा दिल्या होत्या. तो सामना कोलकाताने ३० धावांनी जिंकला होता.
२. प्रविण तांबे –
प्रविण तांबे हा आयपीएलमध्ये खेळलेला सर्वात वयस्कर भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याला २०१३मध्ये वयाच्या ४१ व्या वर्षी राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये पहिल्यांदा संधी दिली होती. ३ वर्षे राजस्थानकडून खेळल्यानंतर २०१६ मध्ये गुजराज लायन्सने आपल्या संघात घेतले होते. तर २०१७ मध्ये त्याला सनरायझर्स हैद्राबाद संघाने १० लाखात संघात सामील करुन घेतले. पण २०१७ ला त्याला एकाही सामन्यात खेळवण्यात आले नाही.
तसेच २०२० च्या आयपीएलसाठी त्याला कोलकाता नाईट रायडर्सने २० लाखांच्या मूळ किंमतीत संघात सामील केले होते. परंतू तो हा आयपीएल मोसम खेळण्यास अपात्र ठरला. तांबेने अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा न करता दुबई आणि शारजातील टी 10 लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यामुळे बीसीसीआयच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडू फक्त आयपीएलमध्ये खेळतील किंवा त्यांनी आयपीएलपासून दूर रहावे आणि इतर देशांच्या लीगमध्ये खेळावे.
त्यामुळे २०१६ ला गुजराज लायन्सकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध खेळलेला सामना त्याचा आयपीएलमधील शेवटचा सामना ठरला. त्यावेळी तो ४४ वर्षे २१९ दिवस एवढ्या वर्षांचा होता. तांबेने आयपीएलमध्ये एकूण ३३ सामने खेळले असून त्यात त्याने ३०.४६ च्या सरासरीने २८ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या हॅट्रिकचाही समावेश आहे.
१. ब्रॅड हॉग –
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ब्रॅड हॉगने २००७-०८ च्या मोसमानंतर निवृत्ती घेतली होती. परंतू त्याने पुन्हा २०११-१२ च्या मोसमात क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. २०१२ मध्ये तो पहिल्यांदा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला. त्यावेळी तो ४१ वर्षांचा होता. २०१३ मध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्सने संघात सामील करुन घेतले. त्याने २०१५ आणि २०१६ च्या मोसमातही कोलकाताने प्रतिनिधित्व केले.
तो एकूण २१ सामने आयपीएलमध्ये खेळला. यात त्याने २३ विकेट्स घेतल्या. तो आयपीएलमध्ये २०१६ मध्ये शेवटचे गुजरात लायन्सविरुद्ध खेळला. त्यावेळी तो ४५ वर्षे आणि ९२ दिवस एवढ्या वयाचा होता. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळलेला सर्वात वयस्कर क्रिकेटपटू होण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तसेच आयपीएलमध्ये ४५ व्या वर्षानंतर खेळणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे.
त्याने २०१६ नंतर आयपीएल खेळले नसले तरी तो नंतर बीग बॅश लीगमध्ये पुढील २ मोसम खेळला. त्यानंतर त्याने २०१८ ला त्याने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
ट्रेंडिंग लेख –
भारतीय संघाकडून वनडेत खेळलेले ४ खेळाडू, जे फारसे कुणाला माहीत नाही
भारतासाठी फक्त १ कसोटी सामना खेळू शकलेले ५ खेळाडू; एक आहेत विश्वविजेत्या दिग्गज खेळाडूचे वडील
भारतासाठी फक्त १ कसोटी सामना खेळू शकलेले ५ खेळाडू; एक आहेत विश्वविजेत्या दिग्गज खेळाडूचे वडील