आयपीएलचा १३ वा हंगाम यूएईमध्ये १९ सप्टेंबर २०२० रोजी सुरु होईल. त्यामुळे सध्या या स्पर्धेची जोरदार चर्चा सगळीकडे सुरु आहे. सर्व संघ देखील आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. यंदा या स्पर्धेत जगभरातील अनेक चांगले सलामीवीर फलंदाज आपल्याला खेळताना दिसतील. या खास लेखात आयपीएल २०२० च्या अशा ५ सलामीवीर फलंदाजांबद्दल जाणून घेऊया, जे या हंगामात जबरदस्त कामगिरी करून आपला दबदबा निर्माण करू शकतात.
ऍरॉन फिंच (Aaron Finch)
आरसीबीच्या टीमने आयपीएल २०२० च्या लिलावातून ऍरॉन फिंचला खरेदी करून आपल्या संघात सामील करून घेतले. आरसीबीच्या पहिल्या सामन्यात अॅरोन फिंच हा अंतिम अकरामध्ये असू शकतो आणि संघासाठी सलामीला फलंदाजी करताना दिसेल.
फिंचने आयपीएल कारकिर्दीतील आतापर्यंतच्या ७५ सामन्यात २६.३१ च्या सरासरीने आणि १३०.६९ च्या स्ट्राइक रेटने १७३७ धावा केल्या आहेत. या आयपीएल कारकिर्दीत त्याने १३ अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्या सर्वाधिक नाबाद ८८ धावा आहेत.
सध्या तो टी-२० क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. टी-२० क्रिकेटमध्ये फिंचने अनेक चांगले डाव खेळले आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने १७२ धावांची स्फोटक खेळी साकारली होती जी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळी आहे. या आयपीएल मोसमातही तो जबरदस्त फलंदाजी करून आपला दबदबा निर्माण करू शकतो.
रोहित शर्मा (Rohit Sharma)
रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघाला ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आहे. हा खेळाडू एक चांगला फलंदाज तसेच कर्णधार देखील आहे. रोहित शर्मानेआयपीएलमध्ये खेळलेल्या १८८ सामन्यांच्या १८३ डावात त्याने ३१.६० च्या सरासरीने एकूण ४८९८ धावा केल्या आहेत. तर यावेळी, त्याचा स्ट्राइक रेट १३०.८२ इतका आहे.
या स्टार फलंदाजाने आयपीएलमध्ये १ शतक आणि ३६ अर्धशतके झळकावली आहेत. या टी-२० स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटने ४३१ चौकार आणि १९४ षटकार लागले आहेत. या स्पर्धेत त्याची सर्वाधीक नाबाद १०९ धावा आहेत.
आयपीएलमध्ये आतापर्यंत रोहित शर्माने एका हंगामात ७०० हून अधिक धावा केल्या नसल्या तरी या मोसमात तो ७०० पेक्षा जास्त अधिक धावा करू शकतो.
डेव्हिड वॉर्नर (David Warner)
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर चौथ्या क्रमांकावर आहे. हा खेळाडू आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या २ संघाकडून खेळाला आहे. त्याने १२६ सामन्यात ४३.१७ च्या उत्कृष्ट सरासरीने आणि १४२.३९ च्या उत्तम स्ट्राईक रेटने एकूण ४७०६ धावा केल्या आहेत.
या खेळाडूने आयपीएलमध्ये ४ शतके आणि ४४ अर्धशतकेही केली आहेत. तसेच या फलंदाजाने आयपीएलमध्ये ४५८ चौकार आणि १८१ षटकार ठोकले आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपद या खेळाडूकडे देण्यात आले आहे. तो प्रत्येक हंगामात आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करताना दिसतो. आयपीएल २०१९ मध्ये वॉर्नरने ऑरेंज कॅप जिंकली होती. या हंगामातही तो असा पराक्रम पुन्हा करु शकतो.
ख्रिस गेल (Chris Gayle)
ख्रिस गेलला आयपीएलमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक मानले जाते. आयपीएल कारकिर्दीत त्याने सर्वाधिक ३२६ षटकार ठोकले आहेत. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणताही फलंदाज एवढे षटकार मारू शकलेला नाही. त्याचबरोबर या फलंदाजाने आयपीएलमध्ये सर्वाधिक ३६९ चौकारही मारले आहेत.
आयपीएल २०२० मध्येही हा अनुभवी खेळाडू स्फोटक फलंदाजी करून, चौकार-षटकारांचा पाऊस पाडू शकतो आणि आयपीएल २०२० मध्ये आपला दबदबा निर्माण करू शकतो.
ख्रिस गेलच्या नावावर आयपीएलमध्ये अनेक विक्रम आहेत. ख्रिस गेलने आयपीएलचे एकूण १२५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४१.१३ च्या प्रभावी सरासरीने आणि १५१.०२ च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने ४४८४ धावा केल्या आहेत. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये २८ अर्धशतके आणि ६ शतके ठोकली आहेत.
केएल राहुल (KL Rahul)
केएल राहुलची आयपीएलची आकडेवारी जबरदस्त आहे. त्याने ४२.०६ च्या सरासरीने खेळलेल्या ६७ आयपीएल सामन्यांमध्ये १९७७ धावा केल्या आहेत. यावेळी राहुलचा स्ट्राइक रेट १३८.१५ आहे. त्याने आयपीएलमध्ये १६ अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे.
आयपीएल २०१८ मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू होता. आयपीएल २०१९ मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता.
केएल राहुलने आयपीएलमध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली ते पाहता असे म्हणता येईल की यंदाच्या हंगामात त्याचे नाव अव्वल क्रमांकावर असेल. तसेच त्याचायकडे यंदा किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे कर्णधारपद देखील सोपविण्यात आले आहे.