आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा अशा खेळाडूंच्या जोड्या पहायला मिळाल्या आहेत, जे एकमेंकांचे अतिशय चांगले मित्र आहेत. माहेला जयवर्धने-कुमार संगकारा, एमएस धोनी-आरपी सिंग अशा काही जोड्यांचा समावेश यात आहे. मग अनेकदा ही मैत्री केवळ संघातील खेळाडूंबरोबरच नाही तर दुसऱ्या संघातील खेळाडूंशी असलेली दिसते. एबी डिविलियर्स, विराट कोहली हे याचे एक उत्तम उदाहरण आहे.
पण एकाच संघात असलेल्या अशाही काही जोड्या आहेत, ज्यांचे एकमेकांशी कधी पटले नाही, किंवा त्यांच्यात भांडण झाले आहे. अशा काही जोड्यांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
६. शेन वॉर्न आणि ऍडम गिलख्रिस्ट
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट आणि दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांचे एकमेकांशी चांगले संबंध नव्हते. गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलियन संघात पदार्पण करण्याआधीपासून त्यांच्यात भांडणे होती. काही रिपोर्टनुसार वॉर्नचा जवळचा मित्र डॅरेन बेरीच्या ऐवजी गिलख्रिस्टला आधी ऑस्ट्रेलियन संघात जागा मिळाल्याने वॉर्न नाराज होता.
वॉर्नने पुरा कपमध्ये विक्टोरिया विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघातील देशांतर्गत सामन्यात गिलख्रिस्टला स्लेजही केले होते. तसेच त्यांच्यातील संबंध २००० च्या आसपास आणखी बिघडले. त्यावेळी वॉर्नने एका इंग्लिंश नर्सला वादग्रस्त संदेश पाठवल्याने त्याला ऑस्ट्रेलिया संघाचे उपकर्णधारपद गमवावे लागले होते. त्याच्याऐवजी उपकर्णधार गिलख्रिस्टला करण्यात आले होते.
२ वर्षांपूर्वी त्यांच्यातील संबंधाबद्दल वॉर्नने Triple M. शी मुलाखतीदरम्यान सांगितले होते की त्यांच्यात काही समस्या होत्या. तसेच त्यांनी एकमेकांशी कधी नजर मिळवली नव्हती. पण त्याचबरोबर वॉर्नने असेही म्हटले होते की जरी मदभेद असले म्हणजे तूम्ही त्या व्यक्तीचा तिरस्कार करता असे होत नाही. आम्ही समालोचन करताना एकमेकांबरोबर चांगले वागतो.’
५. केविन पीटरसन, अँड्र्यू स्ट्रॉस आणि ऍलिस्टर कूक –
इंग्लंडला दिग्गज फलंदाज केविन पीटरसनच्याबाबतीत अनेकदा काही वाद समोर आले. २०११ पर्यंत पिटरसनची कारकिर्द चांगली सुरु होती. पण त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या ३ वर्षात त्याच्यातील आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डमधील वाद वाढले होते.
२०१२ ला पिटरसनने दक्षिण आफ्रिका संघाला चिथावणी देणारा संदेश पाठवला होता. त्यावेळी इंग्लंडचा कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस आणि प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्या नावाचाही त्या संदेशात समावेश होता. त्यामुळे त्याला पुढच्या कसोटीसाठी काढून टाकण्यात आले. त्यानंतर पीटरसन आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद आणखी चिघळले होते.
तसेच स्ट्रॉसनंतर कूकला इंग्डंचे कर्णधारपद देण्यात आले. पण कूक आणि पीटरसनमध्येही २०१३-१४ च्या ऍशेस मालिकेनंतर संबंध बिघडले होते. या मालिकेतच इंग्लंडला ०-५ असा पराभव पत्करावा लागला होता. तसेच या मालिकेत पीटरसनला २९४ धावाच करता आल्या होत्या.
पण दरम्यान पीटरसन आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद चिघळले होते. त्यामुळे त्याच्या बाबतील इंग्लंड आणि वेल्स क्रिकेटबोर्डाने त्याला वगळण्याचा निर्णय घेतला, ज्याला कूकने पाठिंबा दिला होता. यानंतर साधारण एक वर्षांने़ त्यावेळचे इंग्लंड क्रिकेटबोर्डाचे अध्यक्ष अँड्र्यू स्ट्रॉसने पीटरसनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपले असल्याचे सांगितले. या सगळ्यामुळे कूक आणि पीटरसनमधील दरी वाढत गेली.
४. सिमॉन कॅटिच आणि मायकल क्लार्क –
२००९ ला सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मायकल क्लार्क पारंपारिक ‘अंडर द साऊदर्न क्रॉस’ हे पारंपारिक विजय गाणे म्हणण्यापूर्वीच त्यांच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी ड्रेसिंग रुममधून निघून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे सिमॉन कॅटिच आणि क्लार्कमध्ये भांडण झाले होके. कॅटिचने क्लार्कचा गळाच धरला होता. त्यावेळी त्या दोघांना संघसहकाऱ्यांनी वेगळे केले होते. यानंतर जेव्हा क्लार्क कर्णधार झाला त्याचवेळेला काही दिवसांनी कॅटिचला संघातून वगळण्यात आले होते. मात्र यामागे कोणताही वैयक्तिक राग नसल्याचे क्लार्कने स्पष्ट केले होते.
३. शोएब अख्तर आणि मोहम्मद असीफ –
पाकिस्तान क्रिकेटमध्ये शोएब अख्तर हा एक वादग्रस्त व्यक्तीमत्त्व म्हणून राहिला. त्याने त्याच्या कारकिर्दीत शानदार कामगिरी केली असली तरी त्याचे त्याच्या अनेक संघसहकाऱ्यांबरोबर वाद होते.
२००७ च्या पहिल्या टी२० विश्वचषकावेळीही त्याचे आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद असीफमध्ये ड्रेसिंग रुममध्ये वाद झाले होते. त्यावेळी अख्तरने असीफच्या पायाला बॅट मारली होती. सुदैवाने असीफला गंभीर दुखापत झाली नव्हती. पण त्यामुळे अख्तरला पुन्हा पाकिस्तानला पाठवण्यात आले होते.
त्यावेळी अख्तरने नंतर असीफची माफी मागितली होती. पण त्याचबरोबर त्याने शाहिद आफ्रिदीला या वादासाठी जबाबदार धरले होते. पण आफ्रीदीने हे आरोप अमान्य करत या आरोपांबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते.
२. हरभजन सिंग आणि एस श्रीसंत
आयपीएलच्या पहिल्या मोसमातील श्रीसंत आणि हरभजन सिंग यांच्यातील वाद तर सर्वांच्याच लक्षात असेल. त्या मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत असलेल्या श्रीसंतला भर मैदानातच मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हरभजन सिंगने कानाखाली मारली होती. त्यानंतर श्रीसंत रडतानाही दिसला होता.
त्या घटनेनंतर हरभजनवर आयपीएलच्या त्या मोसमासाठी बंदीही घालण्यात आली होती. पण त्या घटनेनंतर लगेचच हरभजनने किंग्स इलेव्हन पंजाबच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन श्रीसंतची माफीही मागितली होती. या वादाला आता १२ वर्षे होऊन गेली असून या घटनेला विसरून दोन्ही क्रिकेटपटू आता पुढे गेले आहेत. हरभजननेही अनेकदा याबद्दल माफी मागितली आहे.
१. गौतम गंभीर-एमएस धोनी
सध्या सातत्याने धोनीवर गंभीरकडून होणाऱ्या आरोपांमुळे ही जोडी सध्या चर्चेत असते. संघात अनेक वर्षे हे दोघे एकत्र खेळले आहेत. पण धोनी कर्णधार झाल्यानंतर या दोघांमध्ये काहीवेळा मदभेद होत असल्याच्या चर्चा होत्या. पण आता गंभीरने निवृत्ती घेतल्यानंतर अनेकदा धोनीवर टिका केली आहे.
त्याने काही दिवसांपूर्वीच धोनीने २०११ च्या विश्वचषकात मारलेल्या विजयी षटकाराबद्दल टिका केली होती. क्रिकइंफो वेबसाईटने धोनीचा षटकार मारतानाचा फोटो शेअर करत “२०११ साली याच एका शाॅटने करोडो भारतीयांना आनंद दिला,” असे २०११ च्या विश्वचषक विजेतेपदाला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते.
यावर या ट्विटचा स्क्रीनशाॅट घेऊन गंभीरने निशाना साधला होता. “क्रिकइंफो, तुम्हाला आठवण करुन देतो की हा विश्वचषक संपुर्ण भारताने जिंकला होता. यात सर्व भारतीय खेळाडू व सपोर्ट स्टाफचाही समावेश आहे. बऱ्याच काळापासून तुम्ही केवळ त्या एका षटकारावर अडकून पडला आहात, ” असे गंभीरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
गंभीरने त्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ९७ धावांची खेळी केली होती. तर धोनीने नाबाद ९१ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्या दोघांमध्ये १०९ धावांची भागीदारीही झाली होती.
एवढेच नाही तर गंभीरने या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीमुळेच शतक हुकले असल्याचेही म्हटले होते. गंभीरने सांगितले होते की त्यावेळीचा कर्णधार धोनीने त्याला शतक पूर्ण करण्याबद्दल आठवण करून दिली होती ज्यामुळे त्याचा गोंधळ झाला आणि त्याला परिणामी विकेट गमवावी लागली.
तसेच त्याआधीही गंभीरने २०१२ च्या सीबी मालिकेत त्यावेळेचा भारताचा कर्णधार धोनीने घेतलेल्या निर्णयांवर टीका केली होती. त्यावेळी भारतीय संघात गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर असे तीन सलामीवीर होते. त्यामुळे धोनीने दोन सलामीवीरांनाच संघात संधी देण्याचे ठरवले, कारण २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकासाठी त्याला युवा खेळाडूंना संधी द्यायची होती. पण हा निर्णय गंभीरला पटला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूने बाॅर्डर पलिकडे भारताला मिळवून दिला होता पहिला विजय
टीम इंडियासाठी अक्षरश: जीवाचं रान केलेल्या ‘या’ ३ खेळाडूंना कधीही मिळाली नाही कर्णधारपदाची संधी
‘या’ गोष्टीमुळे कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात रोहित येणार अडचणीत, माजी पाकिस्तानी कर्णधाराचा दावा