भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा गेल्या काही सामन्यांपासून चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला ३-१ ने विजय मिळवून देण्यात रोहित शर्माने मोलाची भूमिका बजावली होती. येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या मोठ्या सामन्यात देखील रोहित शर्माकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. अशातच पाकिस्तान संघाच्या माजी कर्णधाराने रोहित शर्माबद्दल मोठे भाष्य केले आहे.
रोहित शर्माच्या प्रदर्शनाबद्दल अनेक दिग्गजांनी आपले मत मांडले आहे. पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार सलमान बट यानेदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना तो म्हणाला, “विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माला त्रास देणारी एक गोष्ट म्हणजे ड्यूक बॉल. ड्यूक बॉल ८-९ षटकांनंतर अधिक फिरतो. ड्यूक बॉलमुळे कोणताही फलंदाज अडचणीत येऊ शकतो आणि रोहित शर्माही त्याला अपवाद नाही.”
कुकाबुरा आणि लाल ड्युक चेंडूमधील फरक
तसेच तो पुढे म्हणाला की, “ड्यूक चेंडू ८-९ षटकांनंतर संपूर्ण नियंत्रणासह अधिक फिरतो. जर परिस्थिती स्विंग आणि वेगवान गोलंदाजांना अनुकूल असेल तर रोहित शर्मासह कोणत्याही फलंदाजास त्रास होईल. रोहित शर्मा मोठमोठे फटके खेळणारा खेळाडू आहे. जो अत्यंत सुंदररित्या फलंदाजी करून मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करून धावा करू शकतो. त्याने विश्वचषक स्पर्धेत ५ शतके ठोकली होती. परंतु तिथे पांढरा कुकाबुरा चेंडू होता, जो लाल ड्यूक चेंडूसारखा प्रभावीपणे फिरत नाही.”
रोहित शर्माची विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरी
भारतीय संघासाठी सलामीवीर फलंदाजाची भूमिका पार पाडत असलेल्या रोहित शर्माने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने या स्पर्धेत एकूण ११ सामने खेळले आहेत. यात त्याला ६४.३७ च्या सरासरीने १०३० धावा करण्यात यश आले आहे. त्यामुळे येणाऱ्या अंतिम सामन्यात रोहित शर्माकडून भारतीय क्रिकेट चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीच्या विनोदी अंदाजाने सगळेच झाले चकित, केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा व्हिडिओ
इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाला मिळाले दोन नवे प्रशिक्षक, एक आहे माजी सलामीवीर