बोर्ड आणि खेळाडू यांच्यामध्ये एक वेगळं नातं असतं, त्यामुळे खेळाडूंना बोर्डाशी चांगले संबंध राखणे गरजेचे असते. खेळ सुरळीत पार पाडण्यासाठी क्रिकेट बोर्डाची आवश्यकता असते. कारण जेव्हा आपण एक खेळाडू म्हणून आपल्या क्रिकेट बोर्डाशी वाद करतो, तेव्हा केवळ बोर्डाचेच नाही, तर खेळाडूंचे देखील नुकसान जास्त होते. क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यात संबंध चांगले नसल्यास त्या क्रिकेटपटूची कारकीर्दही संपू शकते. आज आपण अशाच काही खेळाडूंबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांचे क्रिकेट बोर्डाशी संबंध चांगले नव्हते, त्यामुळेच त्यांची कारकीर्द संपली आणि त्या खेळाडूंना निवृत्तीसाठी भाग पाडले गेले.
५. गौतम गंभीर (Gautam Gambhir)
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर हा दिग्गज फलंदाजांपैकी एक होता. २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषक विजयात त्याचे महत्वपूर्ण योगदान होते. त्याने अनेक वेळा कठीण परिस्थितीत आपल्या संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. विश्वचषक २०११ मधील गौतम गंभीरची ९७ धावांची अप्रतिम खेळी कायम लक्षात राहील.
पण यादरम्यान गंभीरचे कर्णधार एमएस धोनीशी असलेला वाद पुढे आले. २०१२ मध्ये कर्णधार धोनी आणि गंभीर यांच्यात वाद सुरू झाला होता. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत अशी काही विधाने केली, की त्यानंतर बोर्ड धोनीच्या बाजूने उभा राहिला आणि गौतम गंभीरला संघातून वगळण्यात आले. यामुळे त्याला धोनीच्या नेतृत्वात अधिक संधी मिळाल्या नाहीत. अखेर गौतम गंभीरने डिसेंबर २०१८ मध्ये क्रिकेटला अलविदा केले आणि राजकारणात प्रवेश केला.
४. ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo)
ड्वेन ब्राव्हो हा थेट बोर्डाशी वाद असणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. ड्वेन ब्राव्हो आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड यांच्यातील वादामुळे त्याला संघाचा कर्णधार असतानाही संघातून बाहेर काढले. २०१४ मधील भारत दौऱ्यावर त्याच्यासह संघातील इतर खेळाडूंना पगार न मिळाल्यामुळे, ब्राव्होने अन्य विंडीज खेळाडूंसह पुढील सामने खेळण्यास नकार दिला.
त्यांनतर ब्राव्हो सह अन्य खेळाडू आणि बोर्डामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. याशिवाय वेस्ट इंडिजमध्ये देशांतर्गत सामने खेळण्यासाठी ब्राव्होने आयपीएल सोडण्यासही नकार दिला होता. चांगली कामगिरी करूनही त्याला संघातून वारंवार वगळण्यात आले.
ऑक्टोबर २०१८ मध्ये ड्वेन ब्राव्होने निवृत्ती घेतली होती. मात्र, तो आता संघात परतला आहे. तो आता टी-२० विश्वचषकातून वेस्ट इंडिज संघात प्रवेश करेल अशी अपेक्षा आहे.
३. शोएब अख्तर (Shoaib Akhtar)
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात घातक वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. पण दुखापती व वादांमुळे त्याची कारकीर्द छोटी राहिली. आयसीसी विश्वचषक २०११ मध्ये पीसीबीकडून अख्तरला अत्यंत वाईट वागणूक मिळाली.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०११ च्या भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात संघ व्यवस्थापनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामागील मुख्य कारण म्हणजे तत्कालीन कर्णधार शाहिद आफ्रिदीला वहाब रियाजला अंतिम आकारामध्ये घेण्याची इच्छा होती आणि हा संघ आफ्रिदीच्या पसंतीचा होता. त्यानंतर त्याला निवृत्ती जाहीर करण्यास भाग पाडले गेले. याच कारणास्तव या दिग्गज पाकिस्तानी गोलंदाजीची कारकीर्द अकाली संपली.
२. केविन पीटरसन (Kevin Peterson)
केविन पीटरसन हा इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात स्फोटक फलंदाज होता. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक अविस्मरणीय खेळी खेळून प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी (ईसीबी) त्याचे संबंध चांगले नव्हते. मंडळाने त्याला एक स्वार्थी फलंदाज म्हणून संबोधले आणि म्हटले की तो संघासाठी खेळत नाही तर स्वतःसाठी खेळतो. अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अपमानास्पद पराभवानंतर पीटरसनला बळीचा बकरा बनवण्यात आले.
त्यानंतर पीटरसनचा, कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस आणि मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्यासोबतही संबंध चांगले नसल्याचे समोर आले. त्याने २०१८ मध्ये आपली निवृत्ती जाहीर केली.
१. अंबाती रायुडू (Ambati Rayudu)
भारतीय क्रिकेट संघाच्या अंबाती रायुडूनेही बोर्डाशी झालेल्या वादामुळे कारकीर्द संपवल्याचे समजते. रायुडूने बोर्डाशी बर्याच वेळा वाद घातला होता. आपल्या कारकीर्दीच्या सुरूवातीस त्याने आयसीएलमध्ये खेळात असताना बीसीसीआयसोबत वैर पत्करले. ज्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी खूप उशिराने मिळाली.
तसेच २०१९ च्या विश्वचषकासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास तो शर्यतीत होता, परंतु त्याची निवड झाली नाही.
यानंतर रायुडूने सोशल मीडियावर टीम मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर त्यानेही जुलै २०१९ मध्ये निवृत्तीचा निर्णय घेतला. परंतु, तो आता परतला असून लवकरच आयपीएलमध्येही दिसणार आहे.