इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला (IPL 2022) मार्चच्या अखेरीस सुरुवात झाली होती. आता आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा अखेरचा टप्पा आला असून १५ पेक्षाही कमी सामने बाकी राहिले आहेत. या हंगामात आत्तापर्यंत अनेक खेळाडूंना आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली आहे, यातील अनेक खेळाडूंनी आपली छापही उमटवली. पण, असे असतानाही काही असेही खेळाडू आहेत, ज्यांना या हंगामात एकदाही अंतिम ११ जणांमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. आशाच ५ खेळाडूंबद्दल या लेखातून आपण जाणून घेऊ.
१. मोहम्मद नबी – अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीने (Mohammad Nabi) अनेकदा आपल्या खेळाने प्रतिस्पर्धी संघाला त्रास दिला आहे. त्याच्याकडे नेतृत्वाचीही क्षमता आहे. तसेच त्याच्याकडे मोठा टी२० अनुभव देखील आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत तब्बल ३२९ टी२० सामने खेळले असून ४९९६ धावा केल्या आहेत. तसेच ३०२ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये त्याने १७ सामने खेळले असून १८० धावा आणि १३ विकेट्स घेतल्या आहेत. पण यंदा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग असलेल्या नबीला एकदाही खेळण्याची संधी मिळालेली नाही.
२. कर्ण शर्मा – आयपीएलमधील ‘लकी चार्म’ म्हणून ज्याला ओळखले जाते, त्या कर्ण शर्माला (Karn Sharma) देखील अद्याप आयपीएल २०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने एकाही सामन्यात अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी दिलेली नाही. कर्णने आत्तापर्यंत सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स अशा संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे तो संघात असताना या तिन्ही संघांनी किमान एकदातरी विजेतेपद मिळवले आहे. कर्णने त्याच्या कारकिर्दीत १४५ सामने खेळले असून १४३४ धावा केल्या आहेत आणि १२१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर आयपीएलमध्ये ६८ सामने त्याने खेळले असून ५९ विकेट्स घेतल्या आहेत.
३. अर्जून तेंडुलकर – गेल्या दोन वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाचा अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) भाग आहे. मात्र अद्याप त्याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळालेली नाही. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ हंगामात पहिले ८ सामने पराभूत झाल्यानंतर चाहत्यांकडूनही अर्जूनला खेळवण्याची मागणी होत होती. पण, त्याला अजूनही अंतिम ११ जणांमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने वरिष्ठ स्तरावर अद्याप २ टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने २ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने वयोगटातील क्रिकेट खेळताना अनेकदा चांगली कामगिरी केली आहे.
४. राजवर्धन हंगारगेकर – गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२२ लिलावात १.५० कोटी रुपयांना खरेदी केलेला युवा खेळाडू राजवर्धन हंगारगेकर याला एकाही सामन्यात खेळण्याची अजून संधी दिलेली नाही. राजवर्धन हंगारेकरने (Rajwardhan Hangargekar) १९ वर्षाखालील विश्वचषकात केवळ ५ विकेट्स घेतल्या होत्या, परंतु त्याने स्पर्धेत चांगली कामगिरी केली. विश्वचषकादरम्यान तो संघासाठी एक उत्तम खेळाडू म्हणून समोर आला होता. त्याच्या स्विंग गोलंदांजीने सर्वांना प्रभावित केले होते. पण, असे असले तरी त्याला अजून आयपीएल पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
५. यश धूल – यश धूल (Yash Dhull) हा १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याने या स्पर्धेत ७६.३३च्या सरासरीने २२९ धावा केल्या होत्या. त्याची ही कामगिरी पाहून दिल्ली कॅपिटल्सने त्याला संघात ५० लाखांना विकत घेतले आहे. धूलने लिलावानंतर रणजी करंडक स्पर्धेत देखील दिल्लीकडून चांगली कामगिरी केली. रणजीच्या पदार्पणाच्या दोन्ही सामन्यात त्याने शतके केले होते. पण, असे असले तरी, अजून दिल्ली कॅपिटल्सने त्याला आयपीएल पदार्पणाची संधी दिलेली नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
उमरान मलिकच्या वडिलांना आहे विश्वास, लवकरच भारतीय संघासाठी खेळेल मुलगा; वाचा संपूर्ण वक्तव्य
ऑरेंज कॅप विजेत्या बटलरने नेट्समध्ये केली चहलला गोलंदाजी; दोघांमधील मजेशीर व्हिडिओ जोरदार व्हायरल
धोनीच्या कथित गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘मी अनेक रिलेशनशिपमधून गेलीये’