fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आयपीएलमध्ये ‘या’ ५ खेळाडूंना मिळाले क्षमतेपेक्षाही अधिक पैसे, पण कामगिरीच्या बाबतीत मात्र…

5 Players Who Are Getting More Money than Needed In IPL

जगातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रसिद्ध टी२० लीग इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) युवा आणि अनुभव नसलेल्या खेळाडूंना जागतिक स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी उपलब्ध करून देते आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवते. आयपीएल हे एक क्रिकेटचं उपयुक्त व्यासपीठ आहे. आयपीएलमधूनच खेळाडूला एक ओळख मिळते.

या स्पर्धेत देश- विदेशातील खेळाडू उत्तम कामगिरी करून फक्त आपल्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवत नाहीत, तर त्यात त्यांना बरेच पैसेही मिळतात. पण असे बरेच खेळाडू आहेत ज्यांना आयपीएलमधील कामगिरीपेक्षाही जास्त पैसे मिळतात.

आज या लेखात आपण अशा ५ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे आतापर्यंत आयपीएलमध्ये काही खास कामगिरी करू शकलेले नाहीत. परंतु तरीही त्यांना त्यांच्या फ्रंचायझींमधून बरीच रक्कम मिळत असते.

१. केदार जाधव

केदार जाधव (Kedar Jadhav) हा विश्वचषक २०१९ पूर्वी भारतीय संघातील नियमित अष्टपैलू खेळाडू होता, परंतु विश्वचषकामध्ये खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ह्या देशांतर्गत स्पर्धेतही केदारची कामगिरी पूर्णपणे अयशश्वी ठरली आहे.

एवढा खराब फॉर्म असूनही चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) ७.८ कोटी रुपये देऊन जाधव याला कायम ठेवले आहे. अशी कामगिरी असूनही जाधव इतक्या मोठ्या रकमेचा दावेदार का आहे? हा एक मोठा प्रश्न आहे. आयपीएलमध्येही केदारची कामगिरी काही खास नव्हती. केदारने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत ७९ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने २२.९५ च्या सरासरीने आणि १२६.४९ च्या  स्ट्राइक रेटने १०७९ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये जाधवने केवळ ४ अर्धशतक केले आहेत.

२. बेन स्टोक्स

आयपीएल २०१८ मध्ये १२.५ कोटींची विक्रमी बोली लागलेला इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) अजिबात चांगली कामगिरी करत नव्हता. ना त्याची फलंदाजी चांगली होत आहे ना गोलंदाजीत त्याला दमदार प्रदर्शन दाखवता आलं नाही. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) बरोबरच सर्वांनीही अशी अपेक्षा केली होती की, स्टोक्स या आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करेल, पण त्यावेळी हा खेळाडू त्याच्या रंगात अजिबात दिसत नव्हता.

धावा आणि विकेट मिळवण्यासाठीची त्याची तळमळ दिसत होती. स्टोक्सच्या खराब कामगिरीची वस्तुस्थिती अशी आहे, की तो त्याच्या पहिल्या ४ सामन्यातही फलंदाजीमध्ये ३० चा आकडा सुद्धा गाठू शकला नाही. त्याचबरोबर गोलंदाजीमध्येही स्टोक्सने सुमारे १२ च्या सरासरीने धावा दिल्या होत्या. त्याने आयपीएलमध्ये एकूण ३४ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २२.६७ च्या सरासरीने ६३५ धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्याने ३१.०७ च्या सरासरीने केवळ २६ विकेट्स घेतल्या आहेत.

३. करुण नायर

भारतीय संघाचा फलंदाज करुण नायर (Karun Nair) याच्या आयपीएलमधील कामगिरीचा आलेख चढता- उतरत्या क्रमानेच होता. तरीही किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघाने त्याला २०१८च्या आयपीएल लिलावात ५.६ कोटी प्रचंड मोठी रक्कमेची बोली लावून विकत घेतले. २०१९च्या गेल्या मोसमात पंजाबने त्यांना फक्त एकाच सामन्यात खेळण्याची संधी दिली होती. ज्यामध्ये नायर केवळ ५ धावा करू शकला. नायरने आतापर्यंत आयपीएलमध्ये ६९ सामने खेळला आहे. त्यात त्याने २४. ८१ च्या सरासरीने १४६४ धावा केल्या आहेत.

पंजाब संघाने यावर्षीही नायरवर विश्वास ठेवला आहे. पण यावेळी करुण नायर आयपीएलच्या मोसमात किती दमदार कामगिरी करतो आणि संघ मालकांचा विश्वास स्वार्थ ठरवतो का ते पहावं लागेल.

४. इशान किशन

आयपीएल २०१८ च्या लिलावात शिखर धवन, युवराज सिंग, हरभजन सिंग, फॉफ डु प्लेसिस, डेव्हिड मिलर यांना मागे टाकत पटणाच्या इशान किशनला मुंबई इंडियन्स संघाने ६ कोटी २० लाख रुपयांमध्ये संघात सामील केले. त्या मोसमात त्याने २७५ धावा केल्या. परंतु पुढील मोसमात त्याने मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आपल्या कामगिरीने नाराज केलं.

इशानने आयपीएल २०१९ मध्ये खेळल्या गेलेल्या ७ सामन्यात १६.८३ च्या सरासरी आणि १०१ च्या स्ट्राइक रेटने १०१ धावा केल्या. ज्यामध्ये इशानची सर्वाधिक धावसंख्या फक्त २८ धावा होती. एवढी खराब कामगिरी करूनही मुंबईने आयपीएल २०२० साठी इशानवर विश्वास ठेवत त्याला संघात कायम ठेवले आहे.

५. मनीष पांडे

भारतीय संघाचा फलंदाज मनीष पांडेला (Manish Pandey) आयपीएलच्या २०१८ च्या मोसमात सनरायझर्स हैद्राबादने (Sunrisers Hyderabad) ११ कोटी रुपयांच्या प्रचंड रकमेमध्ये संघात सामील केले होते. त्यावेळी तो सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत होता. पांडेचा आयपीएल २०१९ मधील खेळ खूपच अस्थिर होता. सुरुवातीच्या सामन्यात खराब कामगिरीनंतर सनरायझर्स हैद्राबाद संघ व्यवस्थापनाने पांडेला संघातून बाहेर बसवलं होतं. पण काही परदेशी खेळाडू परत गेल्यामुळे त्याला पुन्हा संधी मिळाली आणि ती संधी मिळाल्यापासून मात्र मनीष पांडे जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याला हैद्राबादकडून पुन्हा संधी मिळाली. पांडेने आयपीएल २०१९ च्या शेवटच्या ४ सामन्यात अनुक्रमे नाबाद ८३, ६१, ३६ आणि नाबाद ७१ धावा केल्या. तो फॉर्ममध्ये परत आल्यानंतर हैद्राबाद संघ व्यवस्थापनाने सुटकेचा श्वास घेतला. परंतु विचार करण्यासारखी बाब म्हणजे मनीष पांडेची कामगिरी ११ कोटीला साजेशी अशी होती का?

वाचनीय लेख-

-अतिशय वाईट भारतीय कर्णधार, जो विरोधी संघातील गोलंदाजांना द्यायचा सोन्याची घड्याळं भेट

-क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम नोंदवणाऱ्या क्रिकेटपटूचे शरद पवारांशी नाते होते तरी काय…

-आयपीएल इतिहासात एकदाही अपयश नशिबात न आलेले ५ महारथी, दोन आहेत मुंबई इंडियन्सचे

You might also like