fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

अतिशय वाईट भारतीय कर्णधार, जो विरोधी संघातील गोलंदाजांना द्यायचा सोन्याची घड्याळं भेट

Things to know about the controversial Indian captain Maharajkumar of Vizianagram, aka Vizzy

भारतीय क्रिकेटने मागील अनेक वर्षात मोठी प्रगती केली. आज जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. तसेच बीसीसीआय एक श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षात भारताला अनेक महान कर्णधार मिळाले. भारतीय कर्णधारांचा इतिहास पाहिला तर गावस्कर, कपिल देव, गांगुली, धोनी, विराट अशी अनेक मोठ्या नावांची चर्चा होते. पण याचबरोबर आणखी एक नाव यात येते पण एक चांगला कर्णधार म्हणून नाही तर भारतीय क्रिकेटमधील सर्वात वाईट आणि राजकारणी कर्णधार म्हणून. ते नाव म्हणजे लेफ्टनंट कर्नल सर विजयनंद गजापती राजू, विजयनगरमचे राजकुमार उर्फ विझी. भारतीय क्रिकेट इतिहासातील हे एक महत्त्वपूर्ण नाव आहे, जे कायम विसरावे असेच होते.

विझी ज्यांना फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण किंवा संघाचे नेतृत्व करणे यांतील कोणतीही कला अवगत नव्हती, तरीही ते भारतीय संघाचे कर्णधार होते, इतकेच नाही तर क्रिकेट खेळत असताना सर ही पदवी मिळवणारे पहिले क्रिकेटपटू देखील होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 47 प्रथम श्रेणी सामने खेळले. यात 18.60 च्या सरासरीने 1228 धावा केल्या. तसेच केवळ 4 विकेट्स घेतल्या. त्यांनी भारताकडून 3 कसोटी सामनेही खेळले. या तीन्ही सामन्यात ते भारताचे कर्णधार होते. यात त्यांनी केवळ 33 धावा केल्या. विशेष म्हणजे एका दिग्गज कर्णधाराला हटवून ते कर्णधार झाले होते. ते भारताचे दुसरे कसोटी कर्णधार राहिले.

विझी यांचा जन्म 28 डिसेंबर 1905 ला झाला. ते विजयनगरमचे महाराज पुष्पती विजयराम गजापती राजू यांचे द्वितीय सुपुत्र होते. ते जेष्ठ सुपुत्र नसल्याने त्यांना महाराजांनंतर गादीवर बसता येणार नव्हते. यामुळे ते आंध्रप्रदेशमधून उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे स्थायिक झाले. त्यामुळे दुर्दैवाने म्हणा त्यांनी क्रिकेटमध्ये रस घेतला. कदाचीत त्यांना गादीवर बसता आले असते तर लाला अमरनाथ यांच्या कारकिर्दीत मोठा वाद झाला नसता. तसेच कर्नल सीके नायडू, वझिर अली अशा खेळाडूंना आणखी काही काळ खेळता आले असते.

1930 च्या दशकातील काळ हा भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाचा काळ होता. त्यावेळी भारतात क्रिकेटची लोकप्रियता वाढत होती. भारतात चांगले क्रिकेटपटू तयार होत होते. त्यामुळे भारताचा एक संघ असावा याची बांधणी सुरु होती. त्यानुसार 1932 ला सीके नायडू यांच्या नेतृत्वाखाली भारत पहिला कसोटी सामना खेळला देखील. पण त्या काळात राजे-महाराजे यांची भारतात सत्ता होती. त्यामुळे संपंत्ती आणि अधिकाराच्या जोरावर हेच राजे-महाराजे क्रिकेटलाही पैसा पुरवत असल्याने त्यांची मनमानी चालायची. त्यावेळी पटियालाचे महाराज भूपेन्द्र सिंग यांनी बरेच योगदान भारतीय क्रिकेट सुरु करण्यात दिले होते.

त्यांनीच रणजीत सिंग, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते, त्यांच्या नावाने होणाऱ्या स्पर्धेच्या गोल्डन ट्रॉफीसाठी £500 दान केले होते. यामुळे पटियाला भारतीय क्रिकेट बोर्डावर नियंत्रण ठेवता यईल हा एक उद्देश होता. पण याचवेळी विझी यांनी या प्रक्रियेत प्रवेश केला. ज्यावेळी भारताने सर्वात पहिला इंग्लंड दौरा 1932 ला केला होता. त्यावेळी विझी यांना उप-कर्णधारपद देण्यात आले होते. पण त्यांनी नंतर त्या दौऱ्यातून माघार घेतली होती. आता ते रणजीत सिंग यांच्या नावाचा वापर करण्याच्या विरोधात होते. त्यांचे म्हणणे होते की रणजीत सिंग इंग्लंडकडून क्रिकेट खेळले आणि ते स्वत:ला इंग्लिंश क्रिकेटर म्हणवतात मग असे असताना त्यांच्या नावावर ही स्पर्धा कशाला? त्यापेक्षा भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलिंगडन यांच्या नावाने स्पर्धा व्हायला हवी, कारण त्यांनी अधिक काळ भारतात घालवला असून भारतीय क्रिकेटसाठी योगादान दिले आहे.

विझीने इंग्लंडमध्ये सोन्याची ट्रॉफी बनवली आणि भारतीय बोर्डाला ही भारताच्या देशांतर्गत स्पर्धेसाठी अधिकृत ट्रॉफी म्हणून स्विकारण्यास सांगितले. पण तोपर्यंत रणजीत सिंग यांच्या नावाने आधीच रणजी ट्रॉफी ही स्पर्धा सुरु झाली होती. त्यातील 2 सामनेही झाले होते. या सगळ्यामुळे विझी यांच्या सन्मानाला ठेच लागली.

यादरम्यान पटियाला आणि विझी यांचे दोन वेगवेळगे संघ माईन-उद-दावला कपमध्ये सहभागी झाले होते. पटियालाचा पराभव करण्यासाठी विझी यांनी लीरी कॉन्संटाईन यांची आधीच त्यांच्या संघात भरती केली होती. जेव्हा या दोन संघात अंतिम सामना होत होता तेव्हा कॉन्संटाईन सातत्याने चेंडूचा वेगवान मारा करत होते, ज्यामुळे पटियालाचे फलंदाज संघर्ष करतील. पण त्याचवेळी लाला अमरनाथ यांनी टिचून फलंदाजी केली आणि शतक झळकावले. त्यामुळे पटियाला हा सामना जिंकले.

दरम्यान एक देशांतर्गत स्पर्धा सुरु होती. मात्र त्या स्पर्धेचे नाव काय, हे कोणालाही माहित नव्हते, या सगळ्याचा मोठा गोंधळ त्यावेळी सुरु होता. पण अखेर बाँबेने ती स्पर्धा जिंकले. पण त्यांना ट्रॉफी घेण्यासाठी दिल्लीला बोलावण्यात आले. यातही नाट्यपूर्ण वळण म्हणजे, पटियाला-विझी यांच्यातील स्पर्धेत लॉर्ड वेलिंगडन हे स्वत: विजेत्या संघाला ट्रॉफी देण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यांनी जी ट्रॉफी विजेत्या संघाला दिली ती होती रणजी ट्रॉफी, ज्याला पटियालाने प्रायोजकत्व दिले होते. यासाठी पटियालाने मोठे अर्थिक योगदान दिले होते. त्यामुळे पटियालाला क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्षपद मिळाले. याचवेळी पटियालाच्या युवराजला भारताच्या 1936 ला होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून संभाव्य उमेदवार म्हणूनही घोषित केले. त्यावेळी त्याच्या विरुद्ध होते कर्नल सीके नायडू.

सीसीआयचे अध्यक्ष म्हणून पटियालाच्या महाराजांनी फ्रँक ट्राँटला ऑस्ट्रेलिया संघाला भारत दौऱ्यावर आणण्याची व्यवस्था करण्यासाठी पाठवले. पण फ्रँक यांनी जो ऑस्ट्रेलिया संघ आणला तो सर्वोत्तम संघ नव्हता. त्यातील अनेकांनी 1920 च्या दरम्यानच क्रिकेट सोडले होते.

तथापि, ऑस्ट्रेलियन संघ येण्याआधीच विझीने पाचव्या किंग जॉर्जच्या सन्मानार्थ रौप्य महोत्सवी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. यावेळी विझीने स्टार खेळाडूंचा भरणा असलेला संघ तयार केला. यात नायडूंचाही समावेश होता. हा संघ पटियाला विरुद्ध जिंकला. यावेळी वेलिंगडन यांनी खरीखुरी वेलिंगडन ट्रॉफी विझी यांना दिली. ही स्पर्धा जिंकल्याने बोर्डात प्रवेश करण्याचा मार्ग विझींसाठी खूला झाला. पण यादरम्यान विझींसमोर आव्हान होते ते नायडू यांचे.

या स्पर्धेसाठी नवाब ऑफ पतौडी सिनियर देखील उपस्थित होते. त्यांनी इंग्लंडकडून क्रिकेट खेळले होते. तसेच ऍशेसमध्ये पदार्पणात शतकी खेळी देखील केली होती. याच दरम्यान मोठे राजकीय वळण भारतीय क्रिकेटमध्ये येत होते. निवडकर्त्यांनी पतौडी यांना 1936 च्या इंग्लंड दौऱ्यासाठी कर्णधारापदासाठी उमेदवार म्हणून निवड केली. या निवडकर्त्यांमध्ये पटियाला देखील होते. यावेळी नायडू पतौडींविरुद्ध उभे राहिले. पण या लढाईत नायडूंना पराभव स्विकारावा लागला. याचदरम्यान निवड समीतीमध्ये दुलीपसिंग आजारी असल्याने त्यांच्याजागी विझी यांची निवड झाली. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. पण त्याचवेळी पहिला अनधिकृत कसोटी सामन्यातून पतौडींनी आजारी असल्याचे कारण देत माघार घेतली. त्यामुळे पतौडी, विझी आणि एचडी कांगा यांनी मिळून पटियालाच्या युवराजला नायडूंऐवजी कर्णधार केले.

विझींनी पटियालाच्या युवराजला पाठिंबा देण्यामागे मोठा डाव खेळला. नायडूंसारख्या खेळाडूऐवजी युवराजला कर्णधार झालेले पाहून प्रेक्षकांनी युवराजची हुर्या उडवली. त्यामुळे त्या दबावात भारत तो सामना हरला. पुढचा सामना विझी एकादश संघाविरुद्ध होता. या सामन्यात विझींनी 40 धावा केल्या होत्या आणि सामना अनिर्णित राखला होता. याचा परिणाम असा झाला की पटियालाचा युवराज हा कर्णधारपदासाठी योग्य नसल्याचे त्यांनी सिद्ध केले. आता विझींसमोर कर्णधाराचा दुसरा उमेदवार असलेले नायडू यांचे आव्हान होते. नायडू सेंट्रल इंडियाचे नेतृत्व करत होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगले नेतृत्व केले होते. दुसरा अनधिकृत कसोटी सामना कोलकाताला होणार होता. त्या सामन्याआधी नायडूंना कर्णधार करण्यात आले. कारण पुन्हा एकदा पतौडी यांनी माघार घेतली. पण त्याचवेळी अमर सिंग यांनीही माघार घेतली. यामुळे ऑस्ट्रेलियाने भारताला 8 विकेट्सने नमवले. तिसऱ्या अनधिकृत सामन्यावेळी वझिर अलीला कर्णधार करण्यात आले. नायडूंनी वझिरच्या नेतृत्वाखाली खेळण्यास नकार दिला. पण तरीही वझिर यांनी चांगली फलंदाजी करताना भारताला विजय मिळवून दिला. त्यामुळे विझी यांनी धूर्तपणे शेवटच्या कसोटीसाठी शिस्तीचे कारण देत नायडूंना संघातून वगळले. तो सामनाही भारत जिंकला. या सगळ्याचा परिणाम असा झाला की नायडू कर्णधारपदाच्या शर्यतीतून सहज बाहेर फेकले गेले. यात विझींचा धूर्तपणा कामी आला होता. याचवेळी पतौडी यांनी या दौऱ्यातूनच माघार घेतली. यामागे त्यांना भारतीय क्रिकेटच्या राजकारणात पडायचे नसल्याचा उद्देश होता, असे म्हटले जाते. पण यामुळे केवळ विझी हे एकमेव कर्णधारपदासाठी उमेदवार राहिले.

यानंतर आता इंग्लंड दौऱ्याची वेळ आली. त्यावेळी विझी यांनी कॅप्टन जॅक ब्रिटेन-जोन्सला भारतीय संघाचे व्यवस्थापक केले आणि विझी यांच्या जवळचे एसएम हाडी यांना खजिनदार केले. विझी इंग्लंडला त्यांच्या दोन नोकरांसह आणि 36 बॅगांसह पोहचले. त्याच दौऱ्यात विझी यांनी भारतीय संघात पदार्पणही केले आणि भारतीय संघाचे नेतृत्वही केले. विशेष म्हणजे विझी सर्व निर्णय त्यांच्या मनाने घेत होते. ते 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला जायचे आणि गोलंदाजीही नाही करायचे. असे करणारे ते जगातील एकमेव क्रिकेटपटू असतील.

विशेष म्हणजे ते प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना महागड्या भेटवस्तू द्यायचे, जेणेकरुन हे गोलंदाज त्यांना सोपे चेंडू टाकतील. एका कौउंटी सामन्यावेळी त्यांनी विरोधी संघाच्या कर्णधाराला सोन्याचे घड्याळ भेट दिली होती. त्यामुळे विझी यांच्या या मैदानाबाहेरील कृतींनी सर्वांचे लक्ष वेधले होते. याच दौऱ्यात त्यांनी त्यांची सर्वात मोठी मनिषा पूर्ण केली. ती म्हणजे सर ही पदवी मिळवणे. या दरम्यान जेव्हा नायडू लँकाशायर विरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्व करत होते तेव्हा त्या सामन्यात लँकाशायरला 199 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा होता, यावेळी विझी यांनी मोहम्मद निसारला फक्त फुलटॉस टाकण्यास सांगितले. हे पाहून नायडूंनी निसार ऐवजी जहांगिर खानकडे चेंडू सोपवला. अखेर हा सामना भारताने जिंकला.

त्यामुळे त्या दौऱ्यादरम्यान भारतीय संघात 2 भाग पडले, एक भाग विझींना पाठिंवा देत होता. तर दुसरा नायडूंच्या बाजूने होता. विझी यांनी त्यांच्याबाजून असणाऱ्यांना पॅरीस टूरचे वगैरे अमिषही दाखवले होते. तसेच विझींनी इतका धूर्तपणा केला होता की तिसऱ्या कसोटीवेळी नाश्ता करताना बाका जिलानीने नायडूंचा अपमान केला म्हणून विझींनी बाकाला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी दिली होती.

दरम्यान या दौऱ्यात लाला अमरनाथ यांनी सर्वोत्तम खेळ केला होता. त्यांनी 11 सामन्यात 591 धावा केल्या होत्या आणि 31 विकेट्सही घेतल्या होत्या. पण मिडलसेक्सच्या सामन्यावेळी त्यांचे विझींशी वाद झाले. अमरनाथ यांनी त्या सामन्यात 29 धावात 6 विकेट्स घेतल्या परंतू विझींच्या क्षेत्ररक्षणातील चूकांमुळे त्यांनी रागाने चेंडू फेकला होता. पण पुन्हा ते गोलंदाजीला आले होते. यावेळी ब्रिटेन-जोन्सने अमरनाथ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतू तो अयशस्वी झाला. त्यांनतर मायनर कौउंटीविरुद्ध अमरनाथ फलंदाजीसाठी वाट पाहत होते. त्यावेळी विजय मर्चंट आणि मुश्ताक अली यांनी 215 धावांची भागीदारी केली होती. यावेळी विझींनी मुद्दाम अमरनाथ यांना खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेतला. विझी यांनी अमर सिंग, सीके नायडू, वझिर यांना अमरनाथ यांच्या आधी फलंदाजीला पाठवले. अखेर जेव्हा अमरनाथ फलंदाजीला गेले तेव्हा फार कमी वेळ शिल्लक होता. त्यामुळे अमरनाथ प्रचंड चिडले. परिणामी, अमरनाथ यांना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले. त्यावेळी अमरनाथ यांच्या विनंतीखातर सीके नायडू, वझिर अली, रामास्वामी यांनी विझीला त्यांचा निर्णय बदलण्यास सांगितले. अमरनाथ यांनी माफीपत्रही लिहीले. परंतु विझी अमरनाथ यांना परत पाठवण्याच्या निर्णयावर ठाम राहिले.

हे सर्व पहिल्या कसोटीआधी झाले. त्यामुळे खेळाडूंनी 4 गोष्टी ठरवल्या की एकतर संघाला उप-कर्णधार असेल. योजना या संघात चर्चा करुन तयार केल्या जातील. वरिष्ठ खेळाडूंचा मान राखला जाईल आणि व्यवस्थापनाने कोणत्याही खेळाडूबाबत पक्षपातीपणा करु नये. हे सर्व दबावात असणाऱ्या विझींना मान्य करावे लागले. पण त्यांनी या गोष्टींचे पालन केले नाही. पुढे त्यांनी बाका जिलानीला खेळवलेच होते की.

यावेळी मर्चंट यांनी विझीला कर्णधारपद सोडण्याबाबतही सांगितले. पण याचा विझींना प्रचंड राग आला. त्यामुळे दुसऱ्या कसोटीआधी जेव्हा दत्ताराम हिंदळेकर दुखापतग्रस्त होते तेव्हा मर्चंट यांच्याबरोबर मुश्ताक यांना सलामीला पाठवण्यात आले, यावेळी विझी यांनी मर्चंटना धावबाद करण्यास मुश्ताक यांना सांगितले. पण मुश्ताक यांनी सरळ मर्चंट यांना याबद्दल सांगून टाकले आणि त्यावर ते दोघेही हसू लागले. त्या दोघांनी त्यावेळी तब्बल 203 धावांची भागीदारी रचली आणि तो भारताचा पहिला अनिर्णित सामना होता. विझींना क्रिकेटमध्ये स्पाॅट फिक्सिंग केलेले पहिले खेळाडू म्हणतात.

याचवेळी भारतात अमरनाथ यांच्याबरोबर झालेल्या घटनांबद्दल चर्चा झाली. त्यांना दुसऱ्या कसोटीआधी पुन्हा इंग्लंडला पाठवण्याचा विचार सुरु होता. पण विझी यांनी पुन्हा त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत अमरनाथ यांना इंग्लंडला येऊ दिले नाही.

त्यामुळे सप्टेंबरमध्ये भारतात अमरनाथ यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नवाब ऑफ भोपाळ यांच्या नेतृत्वाखाली ब्यूमॉन्ट कमिटी तयार करण्यात आली. याचा रिपोर्ट पुढच्यावर्षी आला. त्यावेळी विझी यांच्या नेतृत्वावाला ‘त्रासदायक’ असा शेरा देण्यात आला. त्यात त्यांना क्षेत्ररक्षण लावता येत नाही, फलंदाजी क्रमवारीत सातत्याने बदल केला जातो, ते वाईट निवडकर्ते आहे, चांगल्या खेळाडूंना वगळले जाते, असे अनेक आरोप विझींवर झाले. अखेर विझी यांना भारतीय संघातून काढून टाकण्यात आले आणि अमरनाथ यांची काही चूक नसल्याचे सिद्ध झाले.

या प्रकरणानंतर काही वर्षे गेली. विझी पुन्हा क्रिकेटमध्ये आले पण यावेळी खेळाडू म्हणून नाही तर बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून. त्यांनी 1954 ते 1957 दरम्यान हे अध्यक्षपद भूषवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी अमरनाथ यांना भारतीय संघाचा कर्णधार म्हणून परत आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. एवढेच नाही तर उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी क्रिकेटचा प्रसार करताना कानपूर हे कसोटीसाठी महत्त्वाचे ठिकाण बनवले. तसेच आणखी आश्चर्य म्हणजे नायडू यांना वयाच्या 61 व्या वर्षी त्यांनी उत्तर प्रदेशचे कर्णधार बनण्याबद्दल विचारणा केली होती.

त्यानंतर विझींनी रेडिओ समालोचक बनण्याचाही प्रयत्न केला होता. पण त्यांचे समालोचन इतके कंटाळवाणे होते की रोहन कन्हाईचे एक वाक्य यासाठी प्रसिद्ध आहे. विझी हे वाघाची शिकार कशी केली हे सांगत असताना कन्हाईने उत्तर दिले होते की ‘खरंच? मला वाटले की तूम्ही समालोचन करत असतानाचा रेडीओ ट्रांझिस्टर तिथेच सोडून आला होता आणि वाघ ते एकून इतके कंटाळले की त्यांनी मृत्यूला जवळ केले.’

ईएम वेलिंग नावाचा इंग्लंडचा एक मोठा पत्रकार भारतात दिल्ली कसोटीसाठी १९६१-६२ दरम्यान आला होता. तेव्हा तो विझींसाठी राखीव असलेल्या खुर्चीवर बसला. जेव्हा विझींचा ताफा तेथे आला तेव्हा त्या ब्रिटीश पत्रकाराने तेथून उठण्यास नकार दिला. वाद खूप वाढले. शेवटी ब्रिटीश हाय कमिशनला यात लक्ष घालून हे प्रकरण सोडवावे लागले. परंतु विझी शेवटी त्याच जागी बसले.

त्यांचा मुलगा व्यंकटेश सिंग देखील आंध्रप्रदेश व उत्तरप्रदेशकडून मिळून ३ प्रथम श्रेणी सामने खेळला परंतु तो देखील ३ सामन्यात ४.५०च्या सरासरीने १८ धावा करु शकला.

विझी यांना त्यांच्या संपूर्ण जीवनात भारतीय क्रिकेटमधील एक धूर्त, वाईट कर्णधार आणि राजकारणी म्हणूनच ओळखले गेले. त्यामुळे जेव्हाही त्यांची चर्चा होते तेव्हा त्यांच्याबरोबर झालेल्या वादांचीच आठवण काढली जाते. त्यांनी नेहमीच त्यांच्या संपत्तीचा आणि अधिकाराचा चूकीचा वापर केला. भारतीय क्रिकेटमध्ये इतके मोठे राजकारण करणारे विझी 1965 ला अनंतात विलिन झाले.

You might also like