यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) -२०२० च्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) या खेळाडूसाठी बरीच चढाओढ झाली. कमिन्ससाठी दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात चुरस रंगली. नंतर कोलकाता नाईट रायडर्स संघ यामध्ये सामील झाले आणि त्याला १५.५ कोटी रुपयात केकेआरने विकत घेतले.
कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग परदेशी खेळाडू तसेच या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने बेन स्टोक्सला मागे टाकले. २०१७ मध्ये राइजिंग पुणे सुपरगिजंट्सने स्टोक्सची १४.५० कोटी रुपये मोजून आपल्या संघात निवड केली होती. कमिन्सने मात्र आतापर्यंत आयपीएलमध्ये फारसा प्रभाव पाडलेला नाही. असे असूनही, त्याला इतकी मोठी रक्कम मिळाली.
पण आयपीएलमध्ये असेही काही खेळाडू आहेत, ज्यांना मोठी किंमत लिलावात मिळाली नाही परंतु या खेळाडूंनी त्यांचा शानदार खेळ दाखवत त्यांच्या संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले. या लेखातही अशा खेळाडूंचा आढावा घेतला आहे, ज्यांना संघाने खरेदी करण्यासाठी फारच कमी पैसे लावले, परंतु ते संघासाठी मॅच विनर असल्याचे सिद्ध झाले.
ते ५ खेळाडू कोण ते जाणून घेऊया-
१. मयंक मारकंडे (Mayank Markande)
आतापर्यंत अनेक युवा तारे आयपीएलमध्ये चमकले आहेत. आयपीएल २०१८ मध्ये मयंकला मुंबई इंडियन्सने अवघ्या २० लाखांच्या बेस प्राइसमध्ये खरेदी केले होते. इतक्या कमी किमतीत विकत घेतलेल्या या फिरकी गोलंदाजाने २०१८ मध्ये खेळलेल्या आयपीएल हंगामात जबरदस्त कामगिरी केली.
या हंगामात, त्याने १४ सामन्यांमध्ये २४ च्या शानदार सरासरीने १५ बळी मिळवले. यावेळी त्याने सर्वोत्तम कामगिरी होती २३ धावा देऊन ४ बळी. आयपीएलमधील मयंक मारकंडेच्या शानदार कामगिरीमुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मध्ये भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली.
परंतु, पदार्पण सामन्यात त्याला एकही विकेट मिळू शकला नाही. मयंकने आयपीएलमध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीवर मोठ्या फलंदाजांना चकवा दिला आहे, त्यामुळे भविष्यात तो भारतासाठी चांगला पर्याय ठरू शकेल.
२. राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi)
राइझिंग पुणे सुपरजायंट्सच्या वतीने आपला पहिला हंगाम खेळणार्या राहुल त्रिपाठीने आत्तापर्यंत तीन हंगाम खेळले असून त्यातील त्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे. आयपीएल २०१७ मध्ये राइझिंग पुणे सुपरजायंट्सने अवघ्या दहा लाख रुपये देऊन राहुलला संघात स्थान दिले.
इतक्या स्वस्तात खरेदी केलेल्या या युवा खेळाडूने या मोसमात पुण्याकडून शानदार कामगिरी केली होती, राहुल त्या हंगामात पुण्याकडून खेळला आणि त्याने १४ सामन्यांत ३९१ धावा केल्या. राहुलचा हा आयपीएलचा सर्वात यशस्वी हंगाम होता. त्यानंतर तो २०१८ आणि २०१९ चा मोसम राजस्थान रॉयल्स संघात खेळला. आयपीएल २०२०साठी त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघात घेतले आहे.
राहुल त्रिपाठीने आतापर्यंत आयपीएल कारकीर्दीत १३७.३१ च्या स्ट्राईक रेटने ३४ सामन्यांत एकूण ७५८ धावा केल्या आहेत. ज्यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या कामगिरीकडे पाहता असे म्हटले जाऊ शकते की आयपीएल २०२० मध्ये तो कोलकाता संघाच्या वतीने सलामीला जाताना दिसू शकतो.
३. श्रेयस गोपाळ (Shreyas Gopal)
श्रेयस गोपाळ कर्नाटकचा फिरकी अष्टपैलू हा आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य आहे. सर्वात मोठे फलंदाजही त्यांच्या गुगलीसमोर चकमा खातात. २०१९ च्या आयपीएल हंगामात, त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध हॅटट्रिक विकेट घेतली, ज्यात विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सारख्या दिग्गजांच्या बळींचा समावेश होता.
या मोसमात राजस्थानने केवळ २० लाख रुपये देऊन गोपाळला त्याच्या संघात स्थान देण्यात आले. या युवा खेळाडूने आयपीएल २०१९ मध्ये १४ सामन्यांत १७.३५ च्या सरासरीने २० विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत ३८ बळी घेतले आहेत. तसेच तो संघासाठी उपयुक्त अशी फलंदाजी करू शकतो.
श्रेयस गोपाळने अनेकदा शानदार फलंदाजी करून राजस्थान रॉयल्सला संकटातून बाहेर काढले आहे. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक रेट १०७ आहे आणि त्याने १२७ धावा केल्या आहेत, त्याला जास्त संधी मिळत नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत २६७४ धावा केल्या असून त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद १५० अशी आहे. ही आकडेवारी पाहून कळते की त्यांच्यातही फलंदाजीचीही बरीच क्षमता आहे.
४. जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow)
२०१९च्या आयपीएल मोसमात सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या जॉनी बेयरस्टोने उत्तम कामगिरी केली. त्याने २०१९ च्या आयपीएलमध्ये १० सामन्यांत १५७.२४ च्या स्ट्राईक रेटने एकूण ४४५ धावा केल्या ज्यामध्ये १ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश होता. या हंगामात जॉनी बेअरस्टोने डेव्हिड वॉर्नरसह सलामीला फलंदाजी करताना जबरदस्त प्रदर्शन केले. त्यामुळे येत्या हंगामासाठी हैदराबादचा आत्मविश्वास नक्की वाढला असेल.
आयपीएलच्या शेवटच्या सत्रात जॉनी बेयरस्टो हैदराबादने त्याला १.५ कोटी रुपये देऊन विकत घेतले होते. पण कदाचित हैदराबादला कल्पना नव्हती की जॉनी बेयरस्टो त्याच्यासाठी इतका प्रभावी खेळाडू म्हणून सिद्ध होईल. पण त्याच्या या कामगिरीमुळे हैदराबाद संघ पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि त्याला सलामीची जबाबदारी देईल. त्याच्याबरोबर वॉर्नर असल्याने हैदराबाद संघाला एक मजबुती मिळेल.
५. ख्रिस गेल (Chris Gayle)
आयपीएल २०१८ मध्ये न विकल्या गेलेल्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस गेल प्रथम क्रमांकावर आहे. गेलला २ वेळा खरेदीदर न मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि आयपीएल किंग्ज इलेव्हन पंजाबची मालक प्रीती झिंटाने संघाचे मार्गदर्शक सेहवागच्या आदेशानुसार गेलला २ कोटी रुपये देऊन विकत घेतले.
सेहवाग आणि प्रीती झिंटाचा हा विश्वास गेलने सार्थ ठरवला, त्याने आयपीएल २०१८ मध्ये पंजाबकडून ११ सामने खेळले. यावेळी त्याने ४० हून अधिक सरासरीने आणि १४६ च्या स्ट्राइक रेटने ३६८ धावा केल्या. त्याने त्याच्या फलंदाजीतून शतकही झळकावले. गेलला २०१८ च्या मोसमाआधी आरसीबीने त्याच्या संघामधून सोडले होते. त्यानंतरच पंजाबने त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्याचा विचार केला होता. गेलची आत्तापर्यंतची कामगिरी पाहता त्याला मिळालेली २ कोटी ही रक्कम कमी वाटते. पण त्याने याचा विचार न करता पंजाबसाठी शानदार खेळ केला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘सचिनला त्रिफळाचीत करणारा माझा तो चेंडू वॉर्नपेक्षाही भारी,’ पाहा कोण म्हणतंय…
वीरेंद्र सेहवागच्या ‘या’ शतकाला झाले १८ वर्षे पूर्ण; शेअर केला खास व्हिडिओ
-विराट कोहलीच्या लग्नात झाली होती धोनीच्या रिटायरमेंटवर चर्चा
ट्रेंडिंग लेख –
‘जेंटल जायंट’ या नावाने प्रसिद्ध झालेला अँगस फ्रेझर
रणजी सामना खेळण्यापूर्वीच भारतीय संघात निवड झालेले दिलीप सरदेसाई
-आयपीएल २०२०: युएईच्या मैदानावर ‘हे’ ५ स्पिनर दाखवू शकतात कमाल, ३ भारतीयांचा समावेश