आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा आहे. गेल्या १२ वर्षांत आयपीएलने जगभरातील चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. आयपीएलमध्ये जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंच्या सोबतच युवा खेळाडूंचा दर्जेदार खेळ पाहायला मिळाला.
आयपीएलमध्ये असे बरेच खेळाडू आहेत ज्यांना खेळण्याची जास्त संधी मिळत नाही. आयपीएलमधील संघ बऱ्याचदा प्रत्येक हंगामात वेगवेगळी रणनीती आखताना दिसतात. यात कधी खालच्या फळीतील फलंदाज आयपीएलमध्ये सलामीला जाताना दिसतो, तर बर्याच सलामीच्या फलंदाजांना खालच्या फळीत फलंदाजी करावी लागते. असे बर्याच वेळा घडले आहे.
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा ५ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आयपीएलमध्ये सलामीलाही फलंदाजी केली आहे आणि ८ व्या क्रमांकावरही फलंदाजी केली आहे. या यादीमध्ये कोणते ५ फलंदाज आहेत ते पाहूया.
८ व्या क्रमांकावर आणि सलामीला खेळणारे आयपीएलमधील ५ फलंदाज
५. राहुल त्रिपाठी
या यादीमध्ये अलीकडेच कोलकाता नाईट रायडर्सच्या राहुल त्रिपाठीचे नाव जोडले गेले आहे. आयपीएल २०२० मध्ये शारजात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला ८ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्यात आले होते. परंतु राहुल त्रिपाठी मुख्यत: सलामीवीर असून आयपीएलमध्ये १९ वेळा सलामीला आला आहे.
२०१७ च्या आयपीएल हंगामात रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना राहुल त्रिपाठीने १४ डावांमध्ये ३९१ धावा केल्या होत्या. त्या सत्रात त्रिपाठीने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. यंदाच्या हंगामात त्याला फक्त एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे.
४. सुनील नारायण
या यादीमध्ये आणखी एक केकेआरच्या खेळाडूचे नाव आहे, तो म्हणजे सुनील नारायण. तो सुरुवातीला केवळ फिरकी गोलंदाज म्हणून संघात खेळला होता आणि खालच्या फळीत फलंदाजी करीत होता. त्याने ४ वेळा ८ व्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. पण नंतर गौतम गंभीर केकेआरचा कर्णधार होता तेव्हा त्याने प्रयोग म्हणून सुनीलला सलामीसाठी पाठवले आणि त्याचा प्रयोग खूप यशस्वी झाला.
सुनील केकेआरचा सलामीवीर म्हणून बर्यापैकी यशस्वी झाला होता. त्याने ३७ डावात १७६.५९ च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने ७२४ धावा केल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजीतही आपली छाप सोडली आहे. २०२०च्या हंगामातही तो आत्तापर्यंक केकेआरने खेळलेल्या चारही सामन्यात सलामीला फलंदाजीसाठी आला आहे.
३. इरफान पठाण
माजी अनुभवी अष्टपैलू इरफान पठाण याचेही या यादीत नाव आहे. इरफान पठाण आयपीएल कारकीर्दीत ६ संघांसाठी खेळला आहे. इरफान पठाण हा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता. म्हणूनच संघांनी त्यांचा वापर वेगवेगळ्या क्रमांकावर केला. आयपीएलच्या एका मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून सलामीला फलंदाजी करताना त्याने ३२ चेंडूंत ३९ धावा फटकावल्या. त्याने ३ वेळा आयपीएलमध्ये डावाची सुरुवात केली आहे आणि ८ व्या स्थानी ५ वेळा त्याने फलंदाजी केली. यात त्याने ३० धावा केल्या आहेत.
२. मनीष पांडे
सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज मनीष पांडे सुद्धा या यादीत आहे. त्याने आयपीएलच्या इतिहासात २७ डावांमध्ये सलामीला फलंदाजी केली आहे आणि दोनदा ८ व्या क्रमांकावर फलंदाजीही केली आहे. सलामीला फलंदाजी करताना त्याच्या नावावर ७३९ धावा आहेत. तथापि, तो आता सनरायझर्सकडून तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे.
१. अजिंक्य रहाणे
सलामीवीर अजिंक्य रहाणेने आयपीएलच्या ११० डावांमध्ये सलामी दिली आहे पण एकदा त्याने ८ व्या स्थानावरही फलंदाजी केली. त्याने सलामीमध्ये ३४३६ धावा केल्या आहेत. २००९ च्या आयपीएल मोसमात रहाणे मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग होता आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या सामन्यात त्याला ८ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. तेव्हा त्याने आपल्या डावात १२ चेंडूत १२ धावा केल्या होत्या.