---Advertisement---

‘या’ पाच खेळाडूंची आरसीबीतून होऊ शकते हकालपट्टी, एक नाव आहे धक्कादायक

On: रविवार, नोव्हेंबर 8, 2020 8:52 AM
---Advertisement---

जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामात विराट कोहलीची सेना म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ मोठ्या अपेक्षांनी उतरला होता. १२ हंगामांच्या प्रतिक्षेनंतर यावर्षी तरी चषकावर आरसीबीचे नाव कोरले जाईल, असे सर्वांना वाटत होते. परंतु पुन्हा एकदा त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. शुक्रवारी (६ नोव्हेंबर) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या एलिमिनेटर सामन्यात त्यांचा ६ विकेट्सने पराभव झाला.

त्यामुळे पुढील वर्षी आरसीबी संघ मोठ्या तयारीने पुनरामगन करण्याचा प्रयत्न करेल. अशात यावर्षी खराब प्रदर्शन केलेल्या काही खेळाडूंना आरसीबी संघातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. या लेखात आम्ही त्याच पाच खेळाडूंचा आढावा घेतला आहे.

शिवम दुबे –

गतवर्षीपासून आरसीबीचा भाग असलेल्या शिवम दुबेला यावर्षी बरीच संधी देण्यात आली. तरीही या अष्टपैलू खेळाडूला अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करण्यात यश आले नाही. त्याने या हंगामात ११ सामने खेळले असून फक्त १८.४२च्या सरासरीने १२९ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीमध्ये त्याने फक्त ४ विकेट्सची कामगिरी केली आहे. त्यामुळे दुबेच्या या आकडेवारीला पाहता आरसीबी संघ आयपीएल २०२१ मधून रिलीज करु शकतो.

डेल स्टेन –

२००८ पासून आयपीएलमध्ये खेळत असलेला वेगवान गोलंदाज डेल स्टेन यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये दिसला नाही. या अनुभवी खेळाडूच्या वाढत्या वयाचा त्याच्या गोलंदाजीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरसीबीने त्याला आयपीएल २०२०मध्ये फक्त ३ सामन्यात संधी दिली. त्यातही स्टेनने केवळ १ विकेट घेतली. त्यासाठी त्याने तब्बल १३३ धावा खर्च केल्या. त्यामुळे आरसीबी पुढील वर्षी त्याला संघातून बाहेर करण्याची शक्यता आहे.

उमेश यादव –

उमेश यादवकडे वेगवान गोलंदाजी करण्याची शैली आणि अनुभव या गोष्टी आहेत. परंतु यंदा आरसीबीला त्याच्या या दोन्ही गोष्टींचा फायदा झाला नाही. त्यामुळे केवळ २ सामन्यात त्याला अंतिम ११ जणांच्या पथकात संधी मिळाली. परंतु या दोन्हीही सामन्यात तो रिकाम्या हाती परतला. उलट त्याने या दोन सामन्यात ४२ चेंडू टाकत ८३ धावा खर्च केल्या. त्यामुळे यादवच्या या प्रदर्शनाला पाहता, कदाचित आरसीबी त्याला २०२१मध्ये संघाबाहेर करु शकते.

ऍरॉन फिंच –

ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि टी२० संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणले जाते. मात्र आयपीएलच्या १३व्या हंगामात फिंच त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकला नाही. या शिलेदाराला आरसीबीने एक-दोन नव्हे तर १२ सामन्यात संधी दिली होती. पण या सामन्यांत तो २२.३३च्या सरासरीने फक्त २६८ धावा करु शकला. यात एका अर्धशतकाचा समावेश होता. त्यामुळे पुढील वर्षी संघातील त्याच्या स्थानाबाबत विचार केला जाऊ शकतो.

गुरकीरत सिंग –

३० वर्षीय भारतीय क्रिकेटपटू गुरकीरत सिंग यावर्षी आरसीबीकडून ८ सामने खेळताना दिसला. परंतु यापैकी एकाही सामन्यात तो आपल्या प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधु शकला नाही. त्याने ८ सामन्यात केवळ ७१ धावा केल्या. त्यामुळे अधिकतर बेंचवर बसून राहणाऱ्या या खेळाडूवर संघाला विश्वास ठेवणे, कठीण जाऊ शकते.

ट्रेंडिंग लेख-

बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---