भारतात क्रिकेट या खेळाला धर्म समजले जाते. अफाट लोकप्रियता लाभलेल्या या खेळात भारतातील जवळपास प्रत्येक लहान मुलगा मोठेपणी क्रिकेटपटू होण्याची स्वप्ने पाहत असतो. मात्र त्यामुळे भारतीय क्रिकेट टीममध्ये स्थान मिळवणे तितकेच अवघड असते. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात केवळ ११ खेळाडूंना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते.
याच कारणामुळे नशिबवान खेळाडूंनाच भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळते. काही खेळाडू या संधीचा अचूक लाभ उठवून आपली संघातील जागा पक्की करतात, मात्र काही खेळाडूंना या संधीचा फायदा न घेता आल्याने ते संघाबाहेर जातात. तसेच अनेकदा खूप जास्त स्पर्धा असल्याने त्यांना पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी देखील मिळत नाही. आपण या लेखात काही अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना गुणवत्ता असून देखील पुरेशी संधी मिळाली नाही.
१) वसीम जाफर –
भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी खेळाडूंपैकी एक म्हणून मुंबईकर वसीम जाफरचे नाव घेतले जाते. भारतीय संघाकडून खेळलेल्या या फलंदाजाला चांगले प्रदर्शन करून देखील संघात दीर्घ काळ स्थान मिळाले नाही. जाफरने देशांतर्गत क्रिकेटमध्येही सातत्याने खोर्याने धावा काढल्या, मात्र भारतीय संघात अनेकदा त्याच्यापेक्षा कमी अनुभवी खेळाडूंना स्थान मिळत गेले. अखेर या सगळ्याला कंटाळून त्याने निवृत्तीची घोषणा केली. मात्र त्यामुळे जाफरवर अन्याय झाल्याची भावना आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे.
२) दिनेश कार्तिक –
तामिळनाडूचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक गेली जवळपास १५ वर्षे भारतीय संघाच्या आत-बाहेर आहे. काही वेळा त्याला संधी दिली जाते, तर काही वेळा विनाकारण त्याला संधी नाकारल्या जाते. त्याने भारतीय संघात ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्या त्या वेळी उपयुक्त खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तसेच संघासाठी फिनिशरची भूमिका देखील उत्तम प्रकारे निभावली होती. मात्र तरीही त्याला भारतीय संघात कायमस्वरूपी स्थान मिळाले नाही.
३) करूण नायर –
कर्नाटकचा गुणवान फलंदाज करूण नायरला भारतीय संघात संधी न मिळणे, हे आजही अनेकांच्या आकलना पलीकडे आहे. कारण संघातून बाहेर होण्यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावण्याची किमया केली होती. मात्र तरीही त्याला संघाबाहेर जावे लागले. भारताच्या कसोटी संघात गेल्या अनेक काळापासून त्याला स्थान मिळाले नाहिये.
४) रॉबिन उथप्पा –
रॉबिन उथप्पा हा भारतीय क्रिकेटमधील अतिशय गुणवान फलंदाजांपैकी एक होता. भारतीय संघात त्याला सर्वप्रथम सलामीवीर म्हणून संधी मिळाली. या संधीचा ऊपयोग करत त्याने सलामीला चांगली फलंदाजी केली होती. मात्र त्यानंतर हळूहळू त्याच्या फलंदाजी क्रमात बदल होत त्याला खालच्या फळीत फलंदाजी करावी लागली. ज्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होऊन त्याचा फॉर्म हरवला. त्यामुळे भारतीय संघातील स्थान त्याला गमवावे लागले.
५) अमित मिश्रा –
फिरकीपटूंची खाण समजल्या जाणार्या भारतात अमित मिश्रा नावाचा गुणवान लेगस्पिनर २००० नंतरचे दशक गाजवू लागला होता. मात्र हरभजन सिंगचे संघातील स्थान पक्के असल्याने त्याला फारशी संधी मिळाली नाही. हरभजन संघातून बाहेर गेल्यावर त्याला काही काळ संधी मिळाली होती, ज्यात त्याने चांगले प्रदर्शन केले होते. त्याने भारताकडून खेळलेल्या शेवटच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला होता. मात्र असे असून देखील त्याला संघाबाहेर करण्यात आले. आणि आजतागायत त्याला पुन्हा संधी मिळाली नाही.
महत्वाच्या बातम्या:
भुवीच्या चेंडूवर जेसन रॉय बोल्ड, रागाच्या भरात केलं असं काही; व्हिडिओ पाहून म्हणालं लज्जास्पद!
रोहित-विराट वादाच्या चर्चेला पूर्णविराम! पाचव्या सामन्यात दिसले जबरदस्त बॉन्डिंग
व्हिडिओ : रोहितची नेत्रदीपक फटकेबाजी! पाहा अर्धशतकी खेळीतील लाजवाब षटकार






