fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

या ५ कारणांमुळे रणजी खेळूनही श्रीसंतचे कमबॅक ठरणार महाकठीण

5 Reasons: Comeback in international cricket is not easy for S Sreesanth

-प्रफुल चिखले

२००७ टी२० विश्वचषक आणि २०११ मधील वनडे विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेला वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत २०१३ मध्ये मॅच फिक्सिंगच्या वादात अडकला होता. राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये खेळत असलेल्या श्रीसंतला आणि त्याचे दोन सहकारी खेळाडू, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना फिक्सिंगच्या प्रकरणामुळे २०१३ला अटक करण्यात आली. त्यानंतर बीसीसीआयने तिन्ही खेळाडूंवर आजीवन बंदी घातली होती. पण ते म्हणतात ना जे प्रयत्न करतात त्यांची हार होत नाही…

श्रीसंतने हे सिद्ध करून दाखवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतवरील बंदीचा कालावधी कमी करण्यास सांगितला. त्यानुसार श्रीसंतला ७ वर्षांची बंदी लागली. ही बंदी सप्टेंबर २०२० मध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे तो क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने श्रीसंतसाठी त्यांच्या रणजी संघाचे दरवाजे उघडले आहेत अशी बातमी येत आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने म्हटले आहे की, श्रीसंतने आपली फिटनेस चांगली राखल्यास केरळच्या रणजी संघात भाग घेऊ शकेल.

देशांतर्गत क्रिकेटमधून भारतीय संघात पुनरागमन करण्याची श्रीसंतची इच्छा आहे. मात्र यासाठी त्याला खूप कठीण मेहनत घ्यावी लागेल. तसेच तरीही अनेक कारणांचा विचार करता त्याच्यासाठी भारतीय संघात पुनरागमन करणे कठीण जाऊ शकते. अशाच कारणांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.

या कारणांमुळे श्रीसंतचे भारतीय संघातील पुनरागमन ठरु शकते महाकठीण – 

१. वयाचे बंधन 

श्रीसंत मागील ७ वर्षांपासून बंदीचा सामना करत होता, पण शेवटी तो क्रिकेटच्या मैदानात परतण्यास तयार आहे. जेव्हा श्रीसंतवर बंदी घालण्यात आली तेव्हा तो ३० वर्षांचा होता. परंतु आता श्रीसंत ३७ वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत खेळाडू भारतीय संघात परत येणे अशक्य वाटते. ज्या वयात खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा होते. त्या वयात श्रीसंत पुनरागमन करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे सध्यातरी त्याच्या या वयाचा विचार करता त्याच्यासाठी पुनरागमन कठीण वाटत आहे.

२. तरुण खेळाडू – 

सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी युनिटचे जगभरात कौतुक होत आहे. विरोधी फलंदाजांवर दबाव आणणारे अनेक वेगवान गोलंदाज सध्या भारतीय संघात आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात वेगवान गोलंदाजी युनिट सतत चांगली कामगिरी करत आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी  इशांत शर्मा आणि उमेश यादव या वेगवान गोलंदाजांचा समावेश भारतीय संघात सध्या आहे. त्या खेरीज जर बेंच स्ट्रेंथ वर लक्ष दिले तर नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, दीपक चहर असे वेगवान गोलंदाज आहेत. अशा परिस्थितीत श्रीसंतला पुन्हा संघात येण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागेल. कारण संघव्यवस्थापन ३७ वर्षीय श्रीसंतला परत आणण्याऐवजी युवा खेळाडूंना पुढे जाण्याची संधी देण्याचीच जास्त शक्यता आहे. 

३. संधीची कमतरता –

वेगवान गोलंदाज श्रीसंतने भारताकडून २७ कसोटी, ५३ वनडे आणि १० टी२० सामने खेळले आहेत. पण २०१३ मध्ये झालेल्या मॅच फिक्सिंगच्या वादामुळे त्याची क्रिकेट कारकीर्द संपल्यात जमा होती.

श्रीसंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्याप्रकारे सुरुवात केली होती हे पाहून सर्वांनाच वाटले होते की हा वेगवान गोलंदाज पुढे जाईल आणि भारतासाठी चांगली कामगिरी करेल. पण तसे झाले नाही आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळताना तो मॅच फिक्सिंगच्या वादात अडकला आणि त्याची क्रिकेट कारकीर्दीला ग्रहण लागले. पण आता केरळमधून रणजी संघात खेळण्याची संधी मिळणार असल्याने तो भारतीय संघात पुनरागमन करेल अशी त्याला आशा आहे.

मात्र श्रीसंतचा रणजी संघात समावेश झाला तरी त्याला प्रत्येक सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नाही. कारण केरळमध्ये आधीच संदीप वॉरियर सारखे सक्षम वेगवान गोलंदाज आहेत. तसेच, खेळाडूला फॉर्म प्राप्त करण्यास वेळ लागेल. संघातील अन्य चांगल्या खेळाडूंना डावलून त्याला संधी कितपत मिळणार हा प्रश्न आहे. त्यामुळे जेवढी संधी मिळेल. त्यात श्रीसंतला चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल.

४. खेळाडूंशी संबंध – 

श्रीसंतची कारकिर्द पाहिली तर अनेकदा त्याचे वाद झालेले आढळून आले आहेत. त्याचा तापट स्वभाव अनेकांना माहित आहे. त्यामुळे आत्ताचे खेळाडू त्याला कितपत सांभाळून घेऊ शकतात हा प्रश्न आहे. त्यातच तो जेव्हा भारतीय संघात खेळत होता त्यावेळचे खूप कमी खेळाडू सध्या भारतीय संघात आहेत. त्यामुळे त्याच्या स्वभावाचा आणि खेळाडूंशी त्याच्या असणाऱ्या संबंधाच्या इतिहासाचाही त्याला संघात घेताना विचार केला जाऊ शकतो.

५. कलंकित खेळाडू भारतीय संघाचा भाग बनलेले नाही

टी२० विश्वचषक २००७ आणि २०११ विश्वचषकात श्रीसंतने चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २००७ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने घेतलेला शेवटचा झेल कोणत्याही क्रिकेट चाहत्याला विसरता येणार नाही. ज्यामुळे भारताला आयसीसी टी२० विश्वविजेतेपद मिळाले.

मात्र असे असताना २०१३ मध्ये तो स्पॉट फिक्सिंग सारख्या वादात अडकला. त्यामुळे श्रीसंत २०१३ पासून कोणतेही क्रिकेट खेळलेला नाही. जरी स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या श्रीसंतला कोर्टाकडून क्लीनचिट मिळालेली असेल आणि तो राज्यासाठी क्रिकेट खेळला असेल, तरी बीसीसीआय त्याला पुन्हा भारतीय संघात परत घ्यायला १०० वेळा विचार करेल.

यामागचे कारण असे आहे की कोणत्याही बोर्डाला कलंकित खेळाडूचा राष्ट्रीय संघात समावेश करायचा झाल्यास अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल. आतापर्यंत भारतातील इतिहास आहे की फिक्सिंगमध्ये अडकलेल्या कोणत्याही खेळाडूला पुन्हा भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याचेच उदाहरण म्हणजे अजय जडेजा. जडेजाला क्लीनचीट मिळाल्यानंतरही भारतीय संघात पुनरागमन करता आले नव्हते. त्याने २०१३ पर्यंत प्रथम श्रेणी सामने खेळले मात्र शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २००० साली खेळला होता. हा विचार करता श्रीसंतला भारतीय संघात पुन्हा जागा मिळणार का हे पहावे लागेल.

You might also like