हार्दिक पंड्या हा भारतातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो. आयपीएलच्या इतिहासात त्याचा खेळ उत्कृष्ट राहिला आहे. मात्र, २०२१ च्या हंगामात त्याला विशेष काही करता आले नसले तरी पुढील हंगामासाठी मेगा लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.
हार्दिक पंड्याने आयपीएलच्या इतिहासात ९२ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने २७.३३ च्या सरासरीने आणि १५३.९१ च्या स्ट्राइक रेटने १४७६ धावा केल्या आहेत. यादरम्यान हार्दिकने ४ अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ९१ इतकी आहे. गोलंदाजीत त्याने ३१.२६ च्या सरासरीने आणि ९.०६ च्या इकॉनॉमी रेटने ४२ बळी घेतले आहे.
हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्समध्ये कायम ठेवण्याची शक्यता कमी आहे. कारण रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे कायम ठेवण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
आयपीएल २०२२ मेगा लिलावाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, परंतु सर्व संघांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पंड्या लिलावात लिलावात उतरु शकतो. अष्टपैलू हार्दिक पंड्याला जे पाच संघ आपल्या ताफ्यात घेऊ शकतील त्या संघांवर एक नजर टाकूया.
ह्या पाच संघांचे हार्दिकवर असेल लक्ष्य
१.पंजाब किंग्स
पंजाब किंग्ज २००८ पासून आयपीएलचा भाग आहे, परंतु आतापर्यंत त्यांना एकही विजेतेपद मिळालेले नाही. अशा परिस्थितीत, या फ्रँचायझीचे मालक संघात हार्दिकसारख्या खेळाडूला संघात घेण्याचा प्रयत्न करतील. जेणेकरुन त्यांना आयपीएल चषक जिंकता येईल. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी हार्दिक पंड्या हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
२. दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्सला एकदाही आयपीएल विजेता बनलेला नाही, पण या संघाने गेल्या ३ वर्षांपासून चांगली कामगिरी केली आहे. मेगा लिलावापूर्वी बहुतांश बड्या खेळाडूंना सोडण्यात येणार आहे. आता संघाला पुन्हा मजबूत करण्यासाठी हार्दिक पंड्यासारख्या स्टार खेळाडूची गरज भासणार आहे.
३. रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर
विराट कोहलीचा संघ आरसीबी अजूनही पहिल्या आयपीएल चषकसाठी आसुसलेला आहे. अशा परिस्थितीत ही फ्रँचायझी मजबूत करण्यासाठी हार्दिक पांड्यासारख्या उत्कृष्ट खेळाडूची गरज भासेल. या संघाचे मालक अनेकदा बड्या खेळाडूंना आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणून ते हार्दिकसाठी निश्चितच मोठी बोली लावतील.
४. अहमदाबाद संघ
सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद संघाची मालकी ५१६६ कोटी रुपयांना विकत घेतली आहे. ही एक आंतरराष्ट्रीय गुंतवणूक फर्म आहे. ज्यांनी नवीन आयपीएल संघांसाठी दुसरी सर्वोच्च बोली लावली. हार्दिक पंड्या मूळचा गुजरातमधील बडोदा शहराचा आहे. अशा परिस्थितीत, या फ्रँचायझीला हार्दिकचा आपल्या संघात समावेश करून आपला चाहता वर्ग वाढवायचा आहे आणि त्याचवेळी हार्दिक संघाला बळकट देखील करू शकतो.
५. लखनऊ संघ
आरपी-एसजी ग्रुपने लखनऊची फ्रेंचायझी ७०९० कोटी रुपयांना विकत घेतली आहे. या कंपनीने आयपीएलच्या नवीन संघांसाठी सर्वात मोठी बोली लावली. या संघाचे होम ग्राउंड भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम असेल. नवीन फ्रेंचायझी असल्याने संघाच्या मालकांच्या नजरा नक्कीच हार्दिक पंड्यावर असतील.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाब विरुद्ध ऋतुराजचा ‘रुद्रावतार’, ८० धावांच्या खेळीसह महाराष्ट्राला ७ विकेट्सने मिळवून दिला विजय
‘ही’ ब्राझिलियन अभिनेत्री एकेकाळी होती विराटच्या प्रेमात!