---Advertisement---

२०१८च्या महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी

---Advertisement---

जालनामध्ये रविवारी( 23 डिसेंबर) महाराष्ट्र केसरी 2018 ची अंतिम फेरी रंगली. या फेरीत बुलढाण्याच्या बालारफिक शेखने गतविजेत्या अभिजित कटकेवर मात करत मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दिली जाणारी मानाची चांदीची गदा पटकावली.

हे विजेतेपद मिळवल्यानंतर बालारफिक भावनिक झाला होता. त्याच्या या महत्त्वाच्या लढतीसाठी त्याचे कुटुंबही जालन्यात उपस्थित होते. त्याला महाराष्ट्र केसरी झालेला पाहुन त्याचे वडिल आझम शेख यांनाही डोळ्यातून आनंद अश्रू ओघळताना शब्द फुटत नव्हते.

मातीतील कुस्तीमध्ये तरबेज असणाऱ्या बालारफिकने मॅटवरील कुस्ती खेळण्यात हातखंडा असणाऱ्या अभिजितला मॅटवरच पराभूत करत सर्वांची मने जिंकली आहेत.

26 वर्षीय पैलवान बालारफिक हा कोल्हापुर वस्ताद हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचा शिष्य आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्याने न्यू मोतीबाग तालीमीत कुस्तीतील सुरुवातीचे धडे गिरवले आहेत. कुस्तीपटू म्हणून त्याला आळंदकरांनी तयार केले.

काही महिन्यांपूर्वी गणपतराव आंदळकरांचे निधन झाले. पण त्यांच्याकडे कुस्तीचे धडे गिरवणाऱ्या बालारफिकने महाराष्ट्र केसरी जिंकत त्यांचा विश्वास सार्थ ठरवला.

आळंदकर त्याला नेहमी म्हणायचे तो त्यांचा शेवटचा शिष्य आहे. त्यानेही त्याच्या या विश्वासाला तडा न जाऊ देता महाराष्ट्र केसरीवर नाव कोरले. त्याने हे विजेतेपद जिंकल्यानंतर  गणपतराव आंदळकरांच्या नावाचा जयघोष घुमत होता. बालारफिकनेही त्याचे हे विजेतेपद त्याचे गुरु आंदळकरांना समर्पित केले आहे.

6 फूट 3 इंच उंची असणारा पैलवान बालारफिकला महाराष्ट्र केसरी झालेला बघण्यासाठी त्याचे संपूर्ण कुटुंब जालन्यात उपस्थित होते.

बालारफिकबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना त्याचे वडिल आझम शेख म्हणाले, ‘लाकडाच्या व्यवसायातून जे दोन पैसे येत होते. ते आम्ही बालाच्या खूराकासाठी तो कोल्हापूरला असताना पाठवले आहेत. त्यातून त्याची प्रगती होत गेली. मी माझ्या घरात कधी भेदभाव केलेला नाही. जे मोठ्या मुलीला दिल तेच सर्व बालालाही खायला मिळाले.’

आझम शेख हे देखील कुस्तीपटू होते. त्यांनी जवळजवळ 30 वर्षे कुस्ती खेळली आहे. बालारफिकने अनेकदा त्याच्या वडिलांबरोबर कुस्ती खेळली आहे. त्यांच्या कुस्तीबद्दल बोलताना आझम म्हणाले, ‘आमच्यावेळी बदाम तूप असं काही नव्हतं. साधं दुध, भाकरी, हुरडा खायचो. यावरच आमची कुस्ती होती.’

बालारफिकची आई म्हणाली, ‘मी तो खूप मोठा व्हावा यासाठी प्रार्थना केली होती. त्याच्यासाठी खूप कष्ट केले आहेत. त्याच्यासाठी दुध काढणे, म्हशी सांभाळणे असे सर्व केले आहे.’

घराण्यातच कुस्तीची परंपरा असलेल्या बालारफिकचीही कारकिर्द कुस्तीत घडवायची असेच ठरवले होते असेही त्याच्या आईने सांगितले.

125 किलो वजन असलेल्या बालारफिकचा खूराक हा रात्री भिजवलेले गहू सकाळी तो खायचा असा आहे आणि मग दिवसभर व्यायाम आणि सराव हा त्याच्या दिनक्रम होता.

बालारफिकचा भाऊ हा देखील कुस्तीपटू आहे. पण त्याने बालारफिकला कुस्तीचे चांगले शिक्षण मिळावे म्हणून स्वत:च्या कुस्तीला मागे टाकले. याबद्दल सांगताना बालारफिकचा भाऊ म्हणाला, ‘बालासाठी खूप काही केले आहे. त्याला तालमीत पाठवले. गरिब परिस्थित त्याच्यासाठी कामधंदा केला.’

या भावना व्यक्त करताना ते देखील भावनिक झाले होते. ते पुढे म्हणाले, ‘बाला मोठा होत होता. त्यामुळे मी कुस्ती सोडली आणि त्याला तालमीत पाठवले.’

‘बाला दोन-चार महिन्यांनी एखाद्या दिवशी घरी येतो तेव्हा त्याची भेट होते. नाहीतर त्याला तालमीत जाऊनच भेटावे लागते.’

याबरोबरच बालाच्या संपूर्ण कुटुंबाने अंतिम सामना पार पडण्याआधी तो महाराष्ट्र केसरी ठरेल असा विश्वास व्यक्त केला होता. बालानेही त्याच्या कुटुंबायांच्या विश्वास खरा ठरवताना त्यांनी त्याच्यासाठी घेतलेल्या कष्टाचे, केलेल्या त्यागाचे चीज केले आहे.

मुळचा सोलापूर जिल्हातील करमाळा येथील असणारा बालारफिक सध्या जय हनुमान कुस्ती केंद्र वारजे वस्ताद गणेश दांगट यांच्याकडे सराव करतात.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Kesari: बुलढाण्याचा बालारफिक शेख महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी

महाराष्ट्र केसरीच्या मैदानातून- विजेत्या मल्लांना पहिल्यांदाच मिळणार जंबो पदक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment