शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२० रोजी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. धोनी गेल्या १ वर्षापासून भारतीय संघापासून दूर होता. त्याच दरम्यान त्याच्या निवृत्तीबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या, अखेर त्याने आपली निवृत्ती जाहीर करत या चर्चांना पूर्णविराम लावला.
धोनी कसोटीमध्ये २०१४ च्या अखेरीस पर्यंत आणि मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये गेले १५ वर्षे भारतीय संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी नियमितपणे सांभाळत होता. पण आता त्याच्या निवृत्तीनंतर ही जागा युवा यष्टीरक्षकांसाठी रिकामी झाली आहे. या लेखात अशाच ५ युवा यष्टीरक्षकांबद्दल आढावा घेतला आहे, जे भारतीय संघात धोनीची जागा घेऊ शकतात.
केएल राहुल (KL Rahul )
सध्या भारतीय क्रिकेट संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एक चांगला फलंदाज म्हणजे केएल राहुल आहे. केएल राहुलची कसोटी क्रिकेटमध्ये तितकी चांगली कामगिरी नाही, परंतु गेल्या १ वर्षात तो ज्या प्रकारे कामगिरी करत आहे त्यावरून तरी असेच वाटते की त्याने भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात स्थान निश्चित केले आहे.
केएल राहुलच्या उत्तम फॉर्ममुळे त्याला लॉकडाऊन होण्यापूर्वी झालेल्या न्यूझीलंड दौर्यावर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी मिळाली आणि त्याने चमकदार कामगिरी करत स्वत:ला यष्टीरक्षक फलंदाज म्हणूनही सिद्ध केले. आता राहुल संघातील धोनीची जागा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून जागा घेऊ शकतो.
रिषभ पंत (Rishabh Pant)
भारतीय क्रिकेट संघाचा युवा प्रतिभावान यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने सध्याच्या भारतीय संघात तिन्ही प्रकारामध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्थान मिळवले आहे. देशांतर्गत क्रिकेट, आयपीएल आणि १९ वर्षांखालील संघातील रीषभ पंतची कामगिरी बघता तो पुढे भारतीय संघात आपली जागा निच्छित करू शकतो.
पंतने सुरुवातीला त्याच्या कामगिरीने निवडकर्त्यांना प्रभावित केले होते. त्यामुळे त्याला भारताच्या तिन्ही क्रिकेटप्रकारच्या संघात संधी मिळाली होती. परंतु पंतला वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघातील स्थान कायम ठेवता आले नाही. तसे पाहता रिषभ पंतकडे अफाट क्षमता आहे, परंतु तो अनेकदा फलंदाजी करताना स्वत:च्या चुकीने बाद झालेला दिसतो. त्यामुळे जर त्याने थोडे त्याच्या फलंदाजी आणि यष्टीरक्षणाकडे लक्ष दिले, तर तो एमएस धोनीच्या जागी तो आता भारतीय संघात त्याचे स्थान पक्के करू शकतो.
ईशान किशन (Ishaan Kishan)
झारखंडचा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनसुद्धा आपले कौशल्य सिद्ध करून भारतीय संघाचे दार ठोठावत आहे. १९ वर्षाखालील भारतीय संघाचे नेतृत्व करणारा ईशान किशनही आपल्या कौशल्याने काही काळापासून भारतीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहे.
ईशान किशनला भारतीय-अ संघासाठीही संधी मिळाली आहे जिथे त्याने चांगली कामगिरी केली. याशिवाय तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत आहे. पण ज्या पद्धतीने त्याने आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने ठसा उमटविला आहे, त्यावरुन किशनही एमएस धोनीची जागा घेण्याच्या शर्यतीत असेल.
संजू सॅमसन (Sanju Samson)
भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभेची कधीच कमतरता भासली नाही. केरळच्या युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनने गेल्या काही वर्षांत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंडियन प्रीमियर लीगमधून चमदार कामगिरी करणाऱ्या या युवा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनच्या कौशल्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
एका उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाजीचे सर्व गुण सॅमसनकडे आहेत. पण त्याला त्याच्या कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे. संजूला आतापर्यंत भारताकडून मोजकेच टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्यामध्ये त्याची कामगिरी काही खास नव्हती. परंतु त्याची प्रतिभा पाहता तो धोनीची जागा घेऊ शकतो.
के एस भरत (KS Bharat)
भारतीय क्रिकेट संघात अनेक युवा यष्टीरक्षक फलंदाज एकाच वेळी स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. त्यापैकी कर्नाटकचा युवा यष्टीरक्षक फलंदाज के एस भरतचा देखील समावेश आहे. केएस भरतची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी उत्तम आहे.
के एस भरतने २०१५ मध्ये रणजी सामन्यात तिहेरी शतकही केले होते. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी राखीव खेळाडू म्हणून त्याची निवडही झाली होती. आता धोनी निवृत्त झाला आहे, त्यामुळे भारतीय संघात स्थान मिळवणे भरतसाठी सोपे झाले आहे.