श्रीलंका महिला क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. झिम्बाब्वेमध्ये सध्या आगामी आयसीसी महिला विश्वचषकासाठी क्वॉलिफायर्स स्पर्धा खेळल्या जात आहेत. या दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका महिला संघातील सहा खेळाडू कोरोना संक्रमित आढळले आहेत. यापूर्वी एक दिवस आधी शनिवारी (२७ नोव्हेंबर) संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना कोरोना संक्रमण झाल्याचे आढळले होते. त्यानंतर वेस्ट इंडीजसोबत होणारा श्रीलंकेचा सामना रद्द केला गेला होता. आता संघातील खेळाडूंना देखील कोरोनाची लागण झाल्यामुळे संघाला मायदेशात आणले जाणार असल्याचे, माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डने दिली आहे.
श्रीलंका महिला संघातील खेळाडू कोरोना संक्रमित आढळले असले तरी, अजून पर्यंत हे स्पष्ट झालेले नाही की, खेळाडूंना कोरोनाच्या नवीन विषाणूची लागण झालेली आहे की नाही. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने शनिवारी खेळला जाणारा श्रीलंका आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामना रद्द केला आहे. तसेच पाकिस्तान आणि झिम्बाब्वे व्यतिरिक्त थायलंड आणि अमेरिका यांत झालेला सामना रद्द केला गेला होता. आता या क्वालिफायर स्पर्धेतील उर्वरित सामने रद्द केले गेले असून रँकिंगच्या आधारावर क्वालिफाय संघांची निवड केली गेली आहे.
काही दिवसांपूर्वी दक्षिण अफ्रिकेत नवीन ओमिक्रॉन विषाणू सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांनी विदेशांतून येणाऱ्या प्रवाशांवर कडक नियमावली लादली आहे. अशात श्रीलंका संघातील कोरोना संक्रमित आढळलेल्या खेळाडूंना मायदेशात आणण्याचा श्रीलंका क्रिकेट बोर्ड विचार करत असल्याचे समजते. भारतात देखील दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या नागरिकांना विमानतळावर विलगीकरणात ठेवले जाणार आहे. त्यानंतर कोरोना चाचणी आणि विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल.
दरम्यान, आगामी आयसीसी महिला विश्वचषक पुढच्या वर्षी न्यूझीलंडमध्ये खेळला जाणार आहे. याच विश्वचषकात झिम्बाब्वेमध्ये हे क्वालिफायर सामने आयोजित केले गेले होते. क्वालिफायर स्पर्धा अर्ध्यातून रद्द केली गेल्यामुळे बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज संघांनी रँकिंगच्या आधारे विश्वचषकासाठी क्वालिफाय केले आहे.






