भारताच्या १९ वर्षाखीलील संघात (india u19 team) सुधारणा करण्याचे श्रेय दिग्गज राहुल द्रविड (rahul dravid) यांना दिले जाते. द्रविडच्या मार्गदर्शनात अनेक युवा खेळाडू तयार झाले आहेत. त्यांच्या मते युवा खेळाडूंनी फक्त १९ वर्षाखालील संघापूरते मर्यादित न राहता, भविष्यात वरिष्ठ संघात सहभागी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
अनेक खेळाडू असे आहेत, ज्यांनी १९ वर्षाखालील संघासोबतच पुढे जावून वरिष्ठ संघातही चांगली कामगिरी केली आहे. जागतिक क्रिकेटच्या इतिहासात काही खेळाडू असे आहेत, ज्यांनी त्यांच्या १९ वर्षाखालील संघाचे नेतृत्व केले आणि नंतर देशाच्या मुख्य संघाचेही ते कर्णधार बनले. आपण या लेखात अशाच सहा खेळाडूंची माहिती घेणार आहोत, ज्यांनी १९ वर्षाखालील संघासोबतच वरिष्ठ संघाचे देखील नेतृत्व केले आहे.
१९ वर्षाखालील संघाचे सहा कर्णधार, ज्यांनी नंतर वरिष्ठ संघाचे देखील नेतृत्व केले
६. मुशफिकुर रहीम ( Mushfiqur Rahim)
बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने २००६ साली १९ वर्षाखालील विश्वचषकात बांगादेश संघाचे नेतृत्व केले होते. तो या स्पर्धेत बांगलादेश संघाला उपांत्यपूर्व सामन्यापर्यंत घेऊन गेला होता. तो अशा मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे, जे १९ वर्षाखालील विश्वचषक खेळण्यापूर्वी देशाच्या वरिष्ठ संघासाठी देखील खेळले आहेत.
रहीमने २००५ साली त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तर २००९ मध्ये त्याला बांगलादेशच्या वरिष्ठ संघाचा उपकर्णधार बनवले गेले. त्यानंतर २०११ साली तो पहिल्यांता बांगलादेश संघाचा नियमित कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वात बांगलादेश संघाने चांगले प्रदर्शन केले. त्याने कर्णधारपदाच्या काळात संघाला बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या एशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचवले होते.
५. सर्फराज अहमद (Sarfaraz Ahmad)
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार सर्फराज अहमद देखील या यादीत सहभागी आहे. त्याने २००६ मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषकात पाकिस्तान संघाचे नेतृत्व करत जेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर तो पुढे पाकिस्तानच्या वरिष्ठ संघाचा कर्णधार बनला आणि संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली. यामध्ये विशेष उल्लेख करावा अशी गोष्ट म्हणजे. सर्फराजच्या नेतृत्वात पाकिस्तानने जिंकलेल्या या दोन्ही ट्रॉफी त्यांनी अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून जिंकल्या आहेत.
४. केन विलियम्सन (Kane Williamson)
न्यूझीलंड संघाचा सध्याचा कर्णधार केन विलियम्सनने २००८ मध्ये खेळल्या गेलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात त्यांच्या संघाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी त्याने न्यूझीलंडला स्पर्धेच्या उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचवले होते, पण उपांत्य सामन्यात भारतीय संघाकडून त्यांना पराभव मिळाला होता.
न्यूझीलंडचा नियमित कर्णधार ब्रेंडन मॅकूलमच्या अनुपस्थितीत विलियम्सनने संघाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे पार पाडले. नंतर मॅकूलमने जेव्हा क्रिकेमधून निवृत्ती घेतली, तेव्हा विलियम्सनला न्यूझीलंडच्या वरिष्ठ संघाचा नियमित कर्णधार बनवले गेले. त्याच्या नेतृत्वात न्यूझीलंड संघ २०१९ विश्वचषक आणि २०२१ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. विलियम्सनच्या नेतृत्वातात न्यूझीलंडने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकली आहे.
3.ओएन मोर्गन (Eoin Morgan)
ओएन मॉर्गन त्या निवडक कर्णधारांपैकी एक आहे, ज्याने १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळ्या संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने २००४ आणि २००६ मधील १९ वर्षाखालील विश्वचषकात आयर्लंड संघाचे नेतृत्व केले आहे. त्यानंतर विश्वचषकात देखील तो आयर्लंडचा कर्णधार होता आणि त्याने या विश्वचषकात संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. २००७ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचणाऱ्या आयर्लंड संघाचाही तो भाग होता. परंतु, मार्गनची नेहमीच इंग्लंड संघासाठी खेळण्याची इच्छा होती.
कसोटी क्रिकेट खेळण्याची त्याची नेहमीच इच्छा होती, पण इंग्लंडच्या कसोटी संघात नियमित स्थान त्याला कधीच बनवता आले नाही. असे असले तरी, इंग्लंडच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले. २०१४ साली तो पहिल्यांदा इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी२० संघाचा कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वात भारतात खेळल्या गेलेल्या २०१६ टी२० विश्वचषकात इंग्लंड संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. तसेच २०१९ त्याच्याच नेतृत्वात इंग्लंड विश्वविजेता संघ बनला होता.
२. ब्रायन चार्ल्स लारा (Brian Lara)
वेस्ट इंडीजचा दिग्गज ब्रायन लाराने त्याचा पहिला १९ वर्षाखालील विश्वचषक १९८८ मध्ये खेळला होता आणि संघाचे नेतृत्वही केले होते. त्याच्या नेतृत्वात वेस्ट इंडीज संघ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत गेला होता. तर वेस्ट इंडीजच्या वरिष्ठ संघासाठी खेळताना त्याने १९९९ आणि २००३ विश्वचषकात संघाचे नेतृत्व केले होते. २००५ मध्ये त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. मात्र, २००६ साली तो पुन्हा एकदा संघाचा कर्णधार बनला.
२००४ साली त्याच्या नेतृत्वातील संघाने इंग्लंडचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तसेच २००७ विश्वचषकात देखील त्याने वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व केले. २००७ विश्वचषकानंतर लाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
1. विराट कोहली (virat kohli)
विराट कोहली सध्या जगातील सर्वात महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. २००८ मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषकात त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. १९ वर्षाखालील संघाचे नेतृत्व करण्यापूर्वी विराटने प्रत्येक स्तरावर स्वतःच्या संघाचे नेतृत्व केले होते. एकंदरीत पाहता कोहलीकडे आधीपासूनच संघाचे नेतृत्व करण्याचे गुण होते.
२००८ मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकल्यानंतर कोहलीने भारताच्या वरिष्ठ संघात स्थान बनवले. त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर २०१२ मध्ये तो संघाचा उपकर्णधार बनला. त्यानंतर एमएस धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्याकडे कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आली. २०१७ मध्ये जेव्हा धोनीने एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तेव्हा विराट क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करू लागला. त्याच्या नेतृत्वात भारताने अनेक महत्वाच्या मालिका जिंकल्या पण विश्वचषक मात्र जिंकता आला नाही.
यावर्षी पार पडलेल्या टी२० विश्वचषकानंतर त्याने स्वतःच्या इच्छेने भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एक कर्णधार ठेवण्याच्या हेतूने त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून बाजूला करण्यात आले. सध्या तो केवळ भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे.
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिका गाजवणाऱ्या ‘टॉप ३’ जोड्यांमध्ये सामील झाले मयंक-राहुल
बेंगलोरने रोखला बंगालचा विजयरथ; कोरियन लीची कमाल
अर्धशतकानंतर लगेचच स्टार्कने आऊट करताच रूटला राग अनावर, चिडून केले असे काही, व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओ पाहा –