नाशिक : नाशिक सायकलीस्टसने डेक्कन क्लिफहँगर स्पर्धेत दमदार कामगिरी केली असून ५ सोलो रायडर्सपैकी ३ सायकलीस्टसने जागतिक स्तरावर आव्हानात्मक असलेली रेस अॅक्रॉस अमेरिका या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
६२ वर्षीय मोहिंदरसिंग भराज हे रॅम स्पर्धेसाठी पात्र ठरणारे भारतातील सर्वाधिक वयस्कर स्पर्धक ठरले आहेत. तर किशोर काळे आणि विजय काळे यांनी निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण करत १८ ते ५० या वयोगटात रॅम स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी यशस्वीपणे डेक्कन क्लिफहँगर स्पर्धा पूर्ण केली आहे. केवळ ६ महिने आधी सायकलिंग सुरु केल्यानंतर डॉ. सिंगल यांनी हा पल्ला गाठला आहे.
पुणे ते गोवा असे ६४३ किमी (४०० मैल) अंतराच्या या स्पर्धेत नाशिकमधून एकूण ५ सोलो सायकलीस्ट व टीम ऑफ टू मध्ये संगमनेरच्या निलेश वाकचौरे आणि संजय विखे व पिंपळगाव बसवंतचे अविनाश आणि विकास दवांगे असे दोन संघ सहभागी झाले होते.
भारतातून एकूण ६० सायकलीस्टसने या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. नाशिकचे मोहिंदर सिंग भराज हे ५० हून अधिक वयोगटात रॅम स्पर्धेसाठी पात्र ठरणारे भारतातील पहिलेच सायकलीस्ट ठरले आहेत.
त्यांनी निर्धारित वेळेच्या २० मिनिटे आधी म्हणजेच ३३ तास ४० मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली आहे. तर पिंपळगाव बसवंतचे अविनाश व विकास दवांगे यांनी स्पर्धा पूर्ण करण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. सर्व स्तरातून त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.
या सर्व स्पर्धकांचे मंगळवारी (दि. ६) सकाळी नाशिक शहरात जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी सर्व सायकलीस्टसने उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक सायकलीस्टसचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी केले आहे.