मंगळवारी(18 डिसेंबर) जयपूर, राजस्थानमध्ये पार पडलेल्या आयपीएल 2019च्या लिलावात अनेक युवा खेळाडूंवर कोटी रुपयांची बोली लागली. यामध्ये बंगालच्या 16 वर्षीय प्रयास राय बर्मनचाही समावेश आहे.
प्रयासला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 1.5 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले आहे. त्याची मुळ किंमत 20 लाख रुपये होती. त्याला संघात घेण्यासाठी बेंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघात लिलावावेळी चढाओढ पहायला मिळाली होती.पण अखेर ती बोली बेंगलोरने जिंकली.
प्रयास हा टी20 स्पर्धेतमध्ये कोट्यावधी रुपयांची बोली लागलेला सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे.
प्रयासच्या बाबतीतील या आहेत खास गोष्टी-
-प्रयासचा जन्म दुर्गापूरमध्ये 25 आॅक्टोबर 2002 ला झाला आहे. पण तो लहानाचा मोठा दिल्लीमध्ये झाला आहे.
-त्याचे वडिल डॉ. कौशिक राय बर्मन हे फिजीशीयन असून दिल्लीत काम करतात.
-दक्षिण दिल्लीतील गार्गी कॉलेजमधील राम पाल क्रिकेट अकादमीमध्ये प्रयासच्या क्रिकेटची सुरुवात झाली. पण त्याची क्रिकेटपटू म्हणून दुर्गापूर क्रिकेट सेंटरमध्ये शिबनाथ राय यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीला सुरुवात झाली.
-त्याने पहिल्यांदा 14 वर्षांखालील अंबर रॉय सब-ज्यूनियर स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर त्याची बंगालच्या 15 वर्षांखालील संघात निवड झाली. त्यामुळे तो त्याच्या आजी – आजोबांबरोबर कोलकतामध्ये एका छोट्या फ्लॅटमध्ये स्थायिक झाला. यामुळे तो आणि त्याचे वडील दिल्ली – कोलकता दरम्यान सातत्याने प्रवास करतात.
-आता त्याचा समावेश रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये झाल्याने तो बेंगलोरला जाण्यास उत्सुक आहे. बेंगलोरमध्ये त्याची बहिण आयटीमध्ये काम करते.
-प्रयासने 2012-13मध्ये बंगालच्या 15 संघाकडून बांगलादेशच्या 15 वर्षांखालील संघाविरुद्धच्या मालिकेत खेळताना चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी त्याने चार सामन्यात 20.42 च्या सरासरीने 7 विकेट्स घेतल्या होत्या.
-त्याने यावर्षी सप्टेंबरमध्ये विजय हजारे ट्रॉफीमधून अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो बंगालकडून जम्मू काश्मिरविरुद्ध 20 सप्टेंबरला पहिला सामना खेळला.
या सामन्यात त्याने 5 षटकात 20 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. अ दर्जाच्या पदार्पणाच्या सामन्यातच अशी उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. या सामन्यात त्याने जम्मू काश्मिरचा कर्णधार परवेझ रसूलचीही विकेट घेतली होती.
-त्याने आत्तापर्यंत 9 अ दर्जाचे सामने खेळले असून यात त्याने 23 च्या सरासरीने आणि 4.45 च्या इकोनॉमी रेटने 11 विकेट्स घेतल्या आहेत.
-प्रयास हा आॅस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचा मोठा चाहता आहे.
– 6.1 इंच उंची असणारा प्रयासची गोलंदाजी ही भारताचा माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेप्रमाणे असल्याचे त्याच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे.
-प्रयास हा भारताचा कर्णधार विराट कोहलीला आदर्श मानतो. तसेच त्याचे विराटबरोबर सेल्फी काढण्याचे स्वप्न होते. पण आता त्याला फोटोच नाही तर विराट बरोबर खेळण्याचीही संधी मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–युवराज सिंग या कारणामुळे आयपीएल २०१८मध्ये झाला होता अपयशी…
–धोनीने रणजी ट्रॉफी खेळणे म्हणजे युवा खेळाडूची संधी हुकणे!
–भारताचे माजी सलामीवीर फलंदाज झाले भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक