आयपीएल २०२७ च्या हंगामासाठी नुकतेच एक मोठी ट्रेड डील दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये पार पडली. ऋषभ पंत दिल्लीमध्ये तर कुलदीप यादव लखनऊ फ्रॅचायझीमध्ये सामील झाला आहे. आता आणखी एक मोठी डील चर्चेचा विषय ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या संघ सोडून जाण्याची शक्यता आहे.
हार्दिकला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी सात फ्रॅंचायझीमध्ये शर्यत सुरू आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जाचाही समावेश आहे. त्यामुळे ट्रेडची ही शर्यत आता अधिकच रोमांचक झाली आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैद्राबाद मात्र हार्दिकला संघात सामावून घेण्याच्या शर्यतीत नाहीत.
चेन्नईला पर्यायी खेळाडूंचा अधिक शोध आहे. एमएस धोनीनंतर संघाला संतुलन आणि नेतृत्व असे दोन्ही गुण असलेल्या खेळाडूचा शोध आहे, अशी माहिती पुढे येत आहे. हार्दिकमुळे त्यांची ही उणीव भरून निघेल, मात्र त्याला कर्णधारपद दिले जाईल की नाही हा निर्णय अद्याप झालेला नाही.
चेन्नईप्रमाणे कोलकाता नाईट रायडर्सही हार्दिकला घेण्याच्या विचारात आहेत, मात्र अद्याप कोणत्याही फ्रॅंचायझीकडून या माहितीला अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही.
हार्दिकला आपल्या संघात घेण्यासाठी चेन्नई आणि कोलकाता यांच्यासोबत राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात चढाओढ सुरू आहे. तसेच या ट्रेडमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, खेळाडूंची समंती.
आयपीएलच्या नियमानुसार, खेळाडूच्या परवानगीशिवाय कोणताही ट्रेड शक्य नाही. जर हार्दिकचा ट्रेड पार पडला तर तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक चर्चात्मक खेळाडूंपैकी एक ठरेल.
यामुळे सध्या हार्दिकबरोबर मुंबई इंडियन्सच्या हालचालींवर लक्ष असणार आहे.






