कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजवर 8 फलंदाजांनी त्यांच्या 100 व्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज आणि विश्वचषक विजेत्या संघाचा तत्कालिन कर्णधार रिकी पाँटिग याने आपल्या 100 व्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकावण्याचा अनोखा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे.
कसोटी सामन्यात गोलंदाजांपेक्षाही फलंदाजांचा कस अधिक लागतो. दोन डावांत फलंदाजी करणे, त्यातही दिर्घकाळ खेळपट्टीवर फलंदाजी करत टिकून राहणे, यासाठी फलंदाजांकडे अधिक कौशल्ये आणि गुणवत्ता असावी लागते. अशावेळी कोणत्याही खेळाडून जर सामन्यात शतक झळकावले तर तो क्षण त्या फलंदाज आणि संघासाठी देखील महत्वाचा आणि अविस्मरणीय असतो.
कोणतेही शतक हे फलंदाजासाठी महत्वाचे असतेच. मात्र, त्यातही एखाद्या खास सामन्यात झळकावलेले शतक मात्र ऐतिहासिक ठरत असते. पदार्पण सामन्यात शतक झळकावणे, वाढदिवसाच्या दिवशी शतक झळकावणे या सारखे क्षण फलंदाजासाठी अविस्मरणीय असतात.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजवर तब्बल 108 फलंदाजांनी आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले आहे. तर त्यापैकी 5 फलंदाज असे आहेत, ज्यांनी आपल्या पदार्पणात द्विशतक झळकावण्याची कामगिरी केलेली आहे.
वेस्ट इंडीज संघाच्या लॉरेंस रोव आणि पाकिस्तानच्या यासिर हमीद या दोन्ही खेळाडूंनी तर आपल्या पदार्पण सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये 36 खेळाडू असे आहेत, ज्यांनी आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम करत कसोटी कारकिर्दीचा शेवट गोड केलेला आहे.
या लेखात मात्र आपण एक विशेष बाब पाहणार आहोत. ती म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये 100 वा सामना खेळणारे असे खेळाडू ज्यांनी आपल्या शंभराव्या कसोटी सामन्यातच शतक झळकावून तो क्षण अविस्मरणीय केला आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजवर 8 फलंदाजांनी त्यांच्या 100 व्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. त्यातही ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार रिकी पाँटिग याने तर आपल्या 100 व्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकावण्याचा अनोखा विक्रम केलेला आहे. मात्र, खेदाची बाब म्हणजे भारताच्या एकाही खेळा़डूचे नाव या यादीत नाही.
100 व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणाऱ्या फलंदाजांची यादी…
1. कॉलिन काउड्रे (इंग्लंड)
महान फलंदाज कॉलिन काउड्रे (Colin Cowdrey) हे इंग्लंड संघाकडून 100 कसोटी सामने खेळणारे पहिलेच खेळाडू होते. हा मान मिळवणारे खेळाडू म्हणून काउड्रे यांनी आपल्या कामगिरीने तो सामना ऐतिहासिक बनवला होता.
1968 मध्ये एजबेस्टन येथे ऑस्ट्रेलिया विरोधातील 100 व्या कसोटी सामन्यात कॉलिन काउड्रे यांनी सामन्यातील पहिल्याच डावात शतक झळकावले. संघाचा कर्णधार म्हणून काउड्रे यांनी तब्बल 104 धावा केल्या होत्या.
काउड्रे यांच्या 104 धावांच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियापुढे 409 धावांचा डोंगर उभा केला होता. ज्याच्या प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संपुर्ण संघ 222 धावांवर गारद झाला होता.
सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडने 142 धावा बनवून आपला डाव घोषीत केला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया समोर जिंकण्यासाठी 330 धावांचे लक्ष्य होते. परंतु, अंतिम दिवसापर्यंत ऑस्ट्रेलियाचा डाव 1 बाद 68 धावावर असल्याने तो सामना अनिर्णित राहिला.
2. जावेद मियांदाद (पाकिस्तान)
पाकिस्तानचे महान फलंदाज जावेद मियांदाद (Javed Miandad) यांनी 1989 मध्ये भारताविरुद्ध आपला 100 वा कसोटी सामना खेळला होता. लाहोर येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात संजय मांजरेकरच्या 218 धावांच्या जोरावर 509 धावांचा डोंगर पाकिस्तानपुढे उभा केला होता.
पाकिस्तानने देखील आपल्या डावाला जोरदार सुरुवात केली. या वेळी प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानकडून शोएब मोहम्मद याने नाबाद द्विशतक (209 धावा) केल्या. तसेच आपला 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या जावेद मियांदाद यांनी या सामन्यात शतक झळकावत 145 धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघाने 699 धावा केल्याने हा सामना पुढे अनिर्णित राहिला होता.
3. गॉर्डन ग्रीनिज (वेस्टइंडीज)
वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज गॉर्डन ग्रीनिज (Gordon Greenidge) याने 1990 मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध आपला 100 वा कसोटी सामना खेळला. एंटिगा येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने पहिल्या डावात 260 धावा केल्या होत्या. यानंतर वेस्ट इंडीज संघाने पहिल्या डावात गॉर्डन ग्रीनिज यांच्या 149 धावा आणि डेसमंड हेंस याच्या 167 धावंच्या जोरावर 446 धावा बनल्या होत्या.
शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या गॉर्डन ग्रीनिज यांनी त्या सामन्यात शतक ठोकून तो क्षण अविस्मरणीय केला होता. यांनतर दुसऱ्या डावातही इंग्लंडचा संघ 154 धावावर सर्वबाद झाल्याने वेस्ट इंडीज संघाने 32 धावा राखत हा सामना आपल्या खिशात टाकला होता.
4. एलेक स्टीवर्ट (इंग्लंड)
इंग्लंडकडून 133 कसोटी सामने खेळणाऱ्या दिग्गज फलंदाज एलेक स्टीवर्ट (Alec Stewart) यांनी आपला शंभरावा कसोटी सामना वेस्ट इंडीज संघाविरुद्ध 2000 साली खेळला होता. ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडीजने पहिल्या डावात अवघे 157 धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरादाखल इंग्लंड संघाने एलेक स्टीवर्ट याच्या 105 धावांच्या ऐतिहासिक शतकी खेळीसह 303 धावा केल्या होत्या. ज्यामुळे वेस्ट इंडीज संघाला पहिल्या डावानंतर 146 धावांची आघाडी मिळाली होती.
वेस्ट इंडीज संघाने दुसऱ्या डावात ब्रायन लाराच्या शतकाच्या जोरावर 438 धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी 293 धावांचे लक्ष्य दिले. परंतु, शेवटच्या दिवसापर्यंत इंग्लंडचा धावफलक 1 बाद 80 अस राहिल्याने हा सामना अनिर्णित राहिला.
5. इंजमाम-उल- हक (पाकिस्तान)
पाकिस्तान संघाचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार इंजमाम-उल- हक (Inzamam Ul Haq) याचे देखील या यादीत नाव आहे. इंजमाम-उल- हक याने आपला शंभरावा कसोटी सामना भारतीय संघाविरुद्ध बंगळुरु येथे खेळला होता. पाकिस्तानने त्यावेळी युनूस खान याच्या 267 धावा आणि इंजमाम-उल- हक च्या 184 शतकी खेळीच्या जोरावर 570 धावांचा डोंगर उभा केला होता.
यानंतर भारतीय संघाने विरेंद्र सेहवागच्या 201 द्विशतकाच्या जोरावर 449 धावा केल्या होत्या. तरिही पाकिस्तान संघाकडे 121 धावांची आघाडी होती.
पाकिस्तानने त्यांचा दुसरा डाव 261 धावांवर घोषीत केला आणि भारतापुढे जिंकण्यासाठी 383 धावांचे लक्ष्य दिले. परंतु भारतीय संघाचा डाव 214 धावांवर आटोपला. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना 168 धावांनी जिंकला.
6. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाजांच्या यादीत सामील असणारा रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) आपल्या 100व्या कसोटी सामन्यात एक अविस्मरणीय विक्रम केला होता. ज्याची आजपर्यंत कोणीही बरोबरी करू शकलेले नाही. पाँटिंगने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सिडनी कसोटीच्या दोन्हीही डावांमध्ये शतक ठोकून इतिहास रचला होता.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 9 बाद 451 धावा इतका होता. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने पाँटिंगच्या (120) शतकी खेळीच्या मदतीने 359 धावा केल्या. आफ्रिकेला 92 धावांनी आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात त्यांनी 6 बाद 194 धावा करत डाव घोषित केला. तसेच, ऑस्ट्रेलियाला 287 धावांंचे आव्हान दिले. पाँटिंगने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत दुसऱ्या डावातही शतकी खेळी केली. त्याने 159 चेंडूत केलेल्या नाबाद 143 धावांच्या खेळीच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने तो सामना 8 विकेट्सने जिंकला होता.
7. ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने (Graeme Smith) आपला 100 वा कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध 2012मध्ये खेळला होता. ओव्हलमध्ये इंग्लंडने पहिल्या डावात 385 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 2 बाद 637 धावा करत डाव घोषित केला आणि 252 धावांची आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेकडून हाशिम अमलाने नाबाद त्रिशतकी खेळी करत 311 धावा केल्या. याव्यतिरिक्त जॅक कॅलिसने नाबाद 182 धावांची आणि स्मिथने आपल्या ऐतिहासिक कसोटीत 131 धावा केल्या.
इंग्लंड संघाचा दुसरा डाव 240 धावांवर संपुष्टात आला. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि 12 धावांनी सामना आपल्या नावावर केला.
8. हाशिम अमला (दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजांमध्ये सामील असणारा हाशिम अमलाने (Hashim Amla) 2017मध्ये श्रीलंकेविरुद्ध 100वा कसोटी सामना खेळला होता. जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात अमलाच्या 134 आणि जेपी ड्युमिनीच्या 155 धावांच्या मदतीने 426 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाचा पहिला डाव 131 आणि दुसऱ्या डावात 177 धावा करत संपुष्टात आला. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि 118 धावांनी तो सामना जिंकला होता.
ट्रेंडिंग लेख-
-क्रिकेट विश्वविजेत्या भारताच्या ट्राॅफी नक्की आहेत तरी कुठं?
-१९८३ व २०११ क्रिकेटविश्वचषकाच्या बक्षीसाच्या रकमा आहेत विचार करायला लावणाऱ्या