फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचून मोरोक्कोने इतिहास रचला आहे. त्यांनी राऊंड ऑफ १६ च्या पहिल्या सामन्यात कॅनडाला ३-० ने पराभूत केले. या विजयामुळे मोरोक्को विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत एकापेक्षा अधिक वेळा पोहोचणारा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे.
मोरोक्को २०२२ च्या विश्वचषकातही उपांत्य फेरीत पोहोचला होता. यंदाच्या स्पर्धेत त्यांनी पुन्हा एकदा अव्वल आठ संघांमध्ये स्ठान पक्के केले आहे.
सामन्याची स्थिती पाहिली तर दोन्ही संघांना पहिल्या हाफमध्ये गोल करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. एकाही संघाला बचावफळी भेदता आली नाही. दुसऱ्या हाफमध्ये मात्र सामन्याचे चित्रच पालटले. ५० व्या मिनिटाला हकिमीच्या फ्री-किकवर अझेडिन ओनाहीने (Azzedine Ounahi) गोल केला आणि मोरोक्कोला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
ओनाही या सामन्यात चांगलाच लयीत दिसला. त्याने ८२ व्या मिनिटाला इब्राहिम डियाझच्या अचूक पासवर गोल केला आणि मोरोक्कोची आघाडी २-० अशी केली. सामन्याच्या शेवटच्या मिनिटांमध्ये सुफियान रहिमीने आणखी एक गोल केली आणि कॅनडाच्या आशेवर पाणी फेरले.
मोरोक्कोने ३-० असा सामना जिंकत सह-यजमान देश कॅनडाच्या ऐतिहासिक प्रवासाचा शेवट केला. मागील सामन्यात कॅनडाने दक्षिण आफ्रिकेचा १-० असा पराभव करच पहिल्यांदाच नॉकआऊट फेरी गाठली होती, मात्र त्यांना अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवता आले नाही. (8 yellow cards and 3 goals morocco beat canada in round of 16 in FIFA World Cup 2026)
8 यलो कार्ड आणि मैदानावरील गोंधळ
हा सामना मागील विश्वचषकाच्या गट फेरीमधील दोन संघांचा पुनर्भेटीचा सामना होता. त्या सामन्यामध्ये मोरोक्कोने कॅनडाला २-१ ने पराभूत केले होते. राऊंड ऑफ ३२ च्या सामन्यात पेनाल्टी शूटआऊटमध्ये नेदरलॅंड्सचा पराभव करून पुढील फेरीत पोहोचलेल्या सहाव्या क्रमांकाच्या मोरोक्कोने या सामन्यात पूर्णपणे वर्चस्व गाजवले.
या सामन्यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये बराच तणाव दिसला, ज्यामुळे पंचांना आठ यलो कार्ड्स दाखवावी लागली. दोन्ही संघांना प्रत्येकी ४-४ कार्ड मिळाली. ४० व्या मिनिटाला हकिमी आणि कॅनडाचा रिची लॅरिया यांच्यात वाद आणि झटापट झाली. त्यामुळे दोघांनाही यलो कार्ड मिळाले.






