मंगळवारी(१ डिसेंबर) केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने ९ विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडच्या या विजयात डेविड मलानने मोलाचा वाटा उचलला.
मलानने या सामन्यात ४७ चेंडूत नाबाद ९९ धावा केल्या. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ५ षटकार मारले. दक्षिण आफ्रिकेने दिलेले आव्हान तो ९९ धावांवर असतानाच पूर्ण झाल्याने त्याला शतक करता आले नाही. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ९९ धावा करणारा एकूण तिसराच फलंदाज ठरला आहे.
याआधी ऍलेक्स हेल्स आणि ल्यूक राईट यांनी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ९९ धावा केल्या होत्या. हेल्स असा एकमेव क्रिकेटपटू आहे, जो ९९ धावांवर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये बाद झाला आहे. तो २४ जून २०१२ ला वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना ९९ धावांवर बाद झाला होता.
तसेच ल्यूक राईट २१ सप्टेंबर २०१२ ला अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना ९९ धावांवर नाबाद राहिला होता. मलानच्या आधी आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ९९ धावांवर नाबाद राहण्याचा विक्रम केवळ राईटच्या नावावर होता.
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ९९ धावा करणारे हेल्स, राईट आणि मलान हे तिघेही इंग्लंडचे खेळाडू आहेत.
इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश –
मंगळवारी दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला १९२ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान इंग्लंडने १७.४ षटकात केवळ १ विकेट गमावत पूर्ण केले. मलानने यावेळी जॉस बटलरसह नाबाद १६७ धावांची भागीदारी रचत इंग्लंडला विजय मिळवून दिला. बटलरने नाबाद ६७ धावा केल्या. इंग्लंडने या सामन्यात विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश दिला. इंग्लंडने या टी२०मालिकेतील पहिले २ सामनेही सहज जिंकले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
पदार्पण करताच टी नटराजनचे नाव झहिर खान, नेहरा, इरफान पठाणच्या पंक्तीत
ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत विराटचा ‘भीमपराक्रम’, सचिनच्या धावांचा ‘तो’ विक्रमही मोडला
चिन्नप्पापट्टी ते टीम इंडिया असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’