क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ म्हणून ओळखला जातो. बऱ्याचदा क्रिकेटपटू त्यांच्या मैदानावरील प्रदर्शनाबरोबरच खिलाडूवृत्तीची उदाहरणे देत या वाक्याचा प्रत्यय देत असतात. उभय संघांमध्ये कितीही द्वंद्व असले, विरोधी संघाचे खेळाडू आक्रमक होऊन हिणावत असले, तरीही शांत राहून छोटेशे स्मितहास्य देत ते विवादाची सुरुवात होण्यापूर्वीच त्याचा शेवट करतात. याबरोबरच बऱ्याचदा क्रिकेटपटू आपल्या उदार वृत्तीने विरोधी संघाच्या खेळाडूंच्या मदतीसाठी धाव घेतानाही दिसतात. केवळ मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही त्यांची ही वृत्ती पाहायला मिळाले. त्यामुळे अशा क्रिकेटपटूंना कोट्यवधींच्या संख्येत लोकांचे भरभरून प्रेम मिळत असते.
अशाच काही सभ्य क्रिकेटपटूंचा येथे लेखाजोखा घेण्यात आला आहे. चला तर सुरुवात करुया…
जगात सर्वाधिक प्रेम मिळालेल्या खेळाडूंची सार्वकालिन प्लेईंग इलेव्हन
१. सचिन तेंडूलकर
गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडूलकर याला या प्लेईंग इलेव्हनमध्ये सलामीवीर म्हणून स्थान देण्यात आले आहे. सचिनने एकापेक्षा जास्त पिढीतील लोकांची मने जिंकली आहेत. सचिन मैदानावर फलंदाजीला उतरल्यानंतर सर्वत्र एकच आवाज घुमत असायचा, आणि तो आवाज असायचा सचिनच्या नावाचा. हॉकी हा राष्ट्रीय खेळ असलेल्या भारत देशाला सचिनने क्रिकेटचे वेड लावले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. हजारो युवकांनी त्याला पाहूनच क्रिकेट खेळण्याची सुरुवात केली आणि बरेचसे क्रिकेटपटू आज त्याच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटची मैदाने गाजवत आहेत.
याचे सर्व श्रेय जाते, त्याच्या उल्लेखनीय फलंदाजी प्रदर्शन आणि त्याच्या शांत व संयमी वागणुकीला. क्रिकेट कारकिर्दीत सर्वाधिक १०० शतके ठोकणाऱ्या सचिनला जगाच्या कानाकोपऱ्यातून चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. हेच कारण की काय, ज्यामुळे सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्यासहित आख्खा भारत देश रडत होता.
२. ख्रिस गेल
युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल हा क्रिकेटविश्वातील सर्वात विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. वनडे, टी२० आणि कसोटी, या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात शतके झळकावणारा तो पहिला क्रिकेटपटूही राहिला आहे. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही त्याच्या फलंदाजीची धार कमी झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे क्रिकेटजगतातील विस्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवाग, तिलकरत्ने दिलशान आणि ब्रेंडन मॅक्यूलम यांच्यासह त्याचेही नाव घेतले जाते.
आपल्या या आक्रमक फलंदाजी शैलीमुळेच गेल लाखो क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करतो. गेलला जगात सर्वाधिक प्रेम मिळालेल्या खेळाडूंच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सचिनसोबत दुसरा सलामीवीर म्हणून जागा देणे चुकीचे ठरणार नाही.
३. राहुल द्रविड
भारतीय संघाची द वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविड याला या संघात तिसऱ्या क्रमांकावर जागा मिळाली आहे. या दिग्गज कसोटीपटूची दुसरी ओळख म्हणजे, त्याची सभ्यता आणि शांत स्वभाव होय. द्रविडने खेळाचे नियम आणि त्याची प्रतिष्ठा सर्वोच्च मानून येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्श घालून दिला आहे.
आपल्या या शिस्तबद्ध स्वभावाबरोबरच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये दिलेले योगदानानेही लोकांना त्याचा चाहता बनण्यास भाग पाडले. आपल्या संथ पण चिवट खेळीसह तो विरोधी संघांना घाम फोडत असे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही त्याचा क्रिकेटप्रती नम्रपणा दिसून आला. त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची धुरा हाती घेत युवा पिढींना मार्गदर्शन करण्याचे काम केले. त्याच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे युवा शिलेदार घडले असून ते आता भारतीय क्रिकेटची मैदाने गाजवताना दिसत आहेत.
४. केन विलियम्सन
या संघात चौथ्या क्रमांकावर वर्णी लागते ती न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याची. फार दुर्मिळ प्रसंगी हा क्रिकेटपटू कोणत्या विवादात अडकल्याचे दिसते. तो नेहमी मैदानावर शांत आणि संयमी राहून संघाचे नेतृत्त्व करताना दिसतो. तसेच दबावातही चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून सर्वतोपरी प्रयत्न करण्याची त्याची वृत्ती कोट्यवधी क्रिकेटशौकिनांना त्याच्या प्रेमात पाडते. हेच कारण की काय, २०१९ सालच्या वनडे विश्वचषकात अंतिम सामन्यापर्यंत मजल मारल्यानंतरही न्यूझीलंडला पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर, चाहत्यांनी त्याच्यावर टिका न करता त्याच्याप्रती सांत्वना व्यक्त केली होती.
५. एबी डिविलियर्स
दक्षिण आफ्रिकेचा माजी विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्स याचे भारताशी खूप जवळचे नाते आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या जोरदार फटकेबाजीमुळे त्याने लाखो भारतीय क्रिकेटप्रेमींचे हृदय जिंकले आहे. आयपीएलमधील त्याच्या प्रदर्शनामुळे त्याला मिस्टर ३६० डिग्री ही उपाधीही मिळाली आहे. बऱ्याचदा दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात भारताविरुद्ध क्रिकेट सामना खेळत असताना भारतीय चाहत्यांनी डिविलियर्सला चीयर केल्याचे प्रसंगही पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे तो या संघात पाचव्या क्रमांकावरील प्रबळ दावेदार ठरतो.
६. जॅक्स कॅलिस
या संघातील सहाव्या स्थानी वर्णी लागते ती, जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू जॅक्स कॅलिस याची. दक्षिण आफ्रिकेच्या या क्रिकेटपटूने बऱ्याचशा किमया साधल्या आहेत. तो वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये २५० विकेट्स आणि १० हजार धावा करणारा एकमेव अष्टपैलू आहे. आपल्या या वर्ल्ड क्लास शैलीबरोबरच त्याचा मैदानावरील आणि मैदानाबाहेरील शांत स्वभाव त्याला इतरांपासून वेगळे करतो. तो कधीही त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत मैदानावर कोणत्या घटनेवरुन पंचांशी वाद घालताना दिसला नाही. त्याची हीच वृत्ती क्रिकेटप्रेमींना भावत असे.
७. एमएस धोनी (यष्टीरक्षक आणि कर्णधार)
कॅप्टनकूल, या नावातच भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी याच्या स्वभावाची ओळख पटते. टी२० आणि वनडे विश्वचषकासह चँपियन्स ट्रॉफीतही भारताला जेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. त्याने भारतीय संघासाठी एक उत्कृष्ट कर्णधार, यष्टीरक्षक आणि फिनिशर अशा वेगवेगळ्या भूमिका निभावल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघालाही त्याने भरपूर यश मिळवून दिले आहे.
क्रिकेटच्या मैदानाबाहेरही धोनी आपल्या ज्ञानाचा पिटारा नेहमीच सर्वांसाठी खुला ठेवतो. आजही आयपीएलमधील सामना झाल्यानंतर युवा क्रिकेटपटू धोनीकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्याच्याभोवती घेरा घालताना दिसतात.
८. अनिल कुंबळे
या संघातील अजून एक सभ्य क्रिकेटपटू म्हणजे, भारतीय क्रिकेटचा स्टार फिरकीपटू अनिल कुंबले होय. या स्टार भारतीय फिरकीपटूने आपल्या अतुलनीय कौशल्याने आणि अत्यंत नम्र स्वभावाने क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. तो नेहमीच क्रिकेटच्या मैदानावर मृदूभाषी असायचा आणि याचमुळे लोकांकडून त्याला भरपूर प्रेम मिळत असे.
याबरोबरच कुंबळेने आपल्या गोलंदाजी प्रदर्शनानेही क्रिकेटप्रेमींवर आपली छाप सोडली आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज आहे. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ६१९ विकेट्स घेतल्या होत्या.
९. डेल स्टेन
डेल स्टेन हा आतापर्यंतच्या जगात सर्वात प्रेम मिळवणाऱ्या खेळाडूंच्या प्लेईंग इलेव्हनच्या यादीत स्थान मिळवणारा पहिला वेगवान गोलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या घातक गोलंदाजाने त्याच्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजीने भरपूर आदर आणि मोठा चाहता वर्ग मिळवला आहे. स्टेनमधील आणखी एक पैलू, ज्यासाठी त्याला जगभरातून कोट्यवधी लोकांचे प्रेम मिळते, तो म्हणजे त्याची नम्र आणि प्रेमळ वृत्ती. एक तीव्र वेगवान गोलंदाज असूनही, तो मैदानावर अनावश्यक आक्रमकता दाखवत नाही. विरोधी संघाच्या फलंदाजाने त्याच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली तरीही त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसते.
१०. ब्रेट ली
या यादीत स्थान मिळवणारा ब्रेट ली हा आणखी एक प्रतिभावान वेगवान गोलंदाज आहे. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच आपल्या गोलंदाजीचा ठसा उमटवला. याबरोबरच आपल्या मोहक हास्याने त्याने जगभरातील क्रिकेटरसिकांची मनेही जिंकली.
मैदानावर स्लेजिंग करत असतानाही त्याने कधीही आपली मर्यादा ओलांडली नाही आणि संयम राखला. २००८ मधील कुप्रसिद्ध सिडनी कसोटीतही त्याने आपल्या चांगल्या वृत्तीची झलक दाखवली होती. शिवाय, तो एक बहुप्रतिभावान माणूस असल्यामुळे जगभरातील लोक त्याचे चाहते आहेत. तो त्याच्या रॉक बँड सिक्स अँड आउटसाठी आनंदाने परफॉर्म करत असे. त्याचे संगीतावरील प्रेम इतके प्रगल्भ होते की त्याने प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्यासोबत एका अल्बमसाठी कामही केले आणि यामुळे तो भारतातील लोकांशी अधिक जोडले गेला.
११. लसिथ मलिंगा
लसिथ मलिंगा हा जगातील सर्वात नामांकित वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे, ज्याने त्याच्या चेहऱ्यावर नेहमी प्रेमळ हास्य ठेवून दुसऱ्या टोकाकडून सर्व कठीण आव्हानांचा सामना केला. पाच वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबई इंडियन्ससाठी त्याने आपले सर्वोत्कृष्ट योगदान देत भारतातून भरपूर प्रेम मिळवले. तो मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. जेव्हा त्याने फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली तेव्हा त्याला सर्व भारतीय चाहते आणि खेळाडूंचे खूप प्रेम मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या-
गेलला मिळणार ‘ग्रँड फेअरवेल’? ‘या’ संघाविरुद्ध खेळू शकतो अंतिम सामना
युवा सलामीवीरांवर युनिव्हर्स बॉसचा गंभीर आरोप; म्हणाला…
पाकिस्तान दौऱ्यासाठी वेस्ट इंडिज संघ जाहीर; ‘या’ बड्या खेळाडूंना नाही मिळाले स्थान