वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने आगामी पाकिस्तान दौऱ्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. वेस्ट इंडिज संघ १३ ते २२ डिसेंबर या कालावधीत कराचीमध्ये तीन वनडे आणि तीन टी२० सामने खेळणार असून, त्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली. कायरन पोलार्ड संघाचे नेतृत्व करेल. वेस्ट इंडिज संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
तीन सामन्यांची ही वनडे मालिका आयसीसी पुरुष वनडे सुपर लीगचा भाग असेल. विश्वचषक सुपर लीगमधील वेस्ट इंडिजची ही चौथी मालिका असेल. लीगमधील अव्वल सात संघ २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. वेस्ट इंडिजचा संघ सध्या १३ संघांपैकी आठव्या स्थानावर असून, त्यांच्यासाठी पुढे जाण्याची ही सुवर्णसंधी आहे.
या दौऱ्यासाठी अनेक नवीन खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. अति क्रिकेटचा ताण येऊ नये म्हणून, काळजी घेत जेसन होल्डरला विश्रांती देण्यात आली आहे. एविन लुईस, शिमरॉन हेटमायर, आंद्रे रसेल आणि लेंडल सिमन्स वैयक्तिक कारणांमुळे या दौऱ्यासाठी उपलब्ध राहणार नाहीत. तर फॅबियन ऍलन आणि ओबेद मॅकॉय हे देखील दुखापतींमुळे खेळू शकणार नाहीत.
वेस्ट इंडिजचा वनडे संघ
कायरन पोलार्ड (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), डॅरेन ब्राव्हो, शामराह ब्रुक्स, रोस्टन चेस, जस्टिन ग्रीव्हज, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, अँडरसन फिलिप, निकोलस पूरन, रॅमन रेफर, रोमॅरियो शेफर्ड, ओडेन स्फेर्ड, हेडन वॉल्श जूनियर
वेस्ट इंडिजचा टी२० संघ
कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उप-कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, शाई होप, अकील होसेन, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, रोमॅरियो शेफर्ड, ओशेन थॉमस आणि हेडन वॉल्श जूनियर
टी२० मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी२० सामना – १३ डिसेंबर, कराची
दुसरी टी२० सामना – १४ डिसेंबर, कराची
तिसरा टी२० सामना – १६ डिसेंबर, कराची
वनडे मालिका वेळापत्रक
पहिला वनडे सामना – १८ डिसेंबर, कराची
दुसरा वनडे सामना – २० डिसेंबर, कराची
तिसरा वनडे सामना – २२ डिसेंबर, कराची