-सचिन सोनलाल वानखेडे
क्रिकेटमध्ये अनेक परिवार असे आहेत, ज्यांच्या कुटूंबातील अनेक सदस्य या ना त्या प्रकारे क्रिकेटशी जोडले गेले. क्रिकेटमध्ये वडिल- मुलगा, भाऊ- भाऊ किंवा चुलता- पुतणे असे अनेक क्रिकेट खेळले आहेत. यामध्येही जागतिक क्रिकेटमध्ये अनेक पिता-पुत्रांच्या जोड्या अशा आहेत, ज्यांनी क्रिकेटमध्ये आपलं नाव अजरामर केले. काही पिता-पुत्र असे आहेत जे एकत्र सामन्यांमध्ये खेळले देखील आहेत. अशीच ४ पिता-पुत्रांच्या जोड्यांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी एकत्र किमान १ सामना खेळला आहे.
४. लाला अमरनाथ-सुरिंदर अमरनाथ
लाला अमरनाथ हे भारत स्वातंत्र्य झाल्यांनंतरचे भारताचे पहिले कर्णधार. त्यांनी २४ कसोटी सामन्यांत ८७८ धावा करताना ४५ विकेट्स घेतल्या. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पहिलं शतक करण्याचा मान हा लाला अमरनाथ यांना जातो. त्यांनी विश्वयुद्धापूर्वी ३ आणि नंतर २१ असे एकूण २४ सामने खेळले होते.
त्यांचे थोरले पुत्र सुरिंदर अमरनाथ भारताकडून १० कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी कसोटीमध्ये ५५० तर एकदिवसीय सामन्यात १०० धावा केल्या.
पण या पिता पुत्राच्या कारकिर्दीत सर्वात खास क्षण आला तो सन १९६३ मध्ये. त्यावेळी एका चॅरीटी क्रिकेट मालिकेतील चौथा सामना महाराष्ट्र मुख्यमंत्री एकादश विरुद्ध महाराष्ट्र राज्यपाल एकादश संघात सामना होत होता. या सामन्यात ५२ वर्षीय लाला अमनाथ देखील खेळले होते. तसेच १५ वर्षीय सुरिंदर अमरनाथ देखील खेळले होते.
विशेष म्हणजे त्या सामन्यातून सुरिंदर यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र लाला आणि सुरिंदर ही पिता-पुत्रांची जोडी एकाच सामन्यात एकत्र खेळली असली तरी ते एकमेकांविरुद्ध खेळले होते. त्यावेळी सुरींदर हे महाराष्ट्र मुख्यमंत्री एकादश कडून खेळत होते. तर लाला महाराष्ट्र राज्यपाल एकादशकडून खेळले होते.
त्या सामन्यात सुरिंदर यांनी पहिल्या डावात ४१ आणि दुसऱ्या डावात नाबाद ८ धावा केल्या होत्या. तर लाला यांनी पहिल्या डावात फलंदाजी केली नव्हती. त्यांनी दुसऱ्या डावात ४७ धावांची खेळी केली होती. तो सामना अनिर्णित राहिला होता.
३. शिवनारायण चंद्रपॉल-टागेनारायण चंद्रपॉल
शिवनारायण चंद्रपॉल हे वेस्ट इंडिज क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. १९९४मध्ये चंद्रपाॅलने कसोटी पदार्पण केले होते. जाॅर्जटाऊनमध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात ६२ धावा केल्या होत्या. कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामना २०१५ साली इंग्लंडविरूध्दच खेळला. ४५ वर्षीय या खेळाडूने २०१६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. चंद्रपॉलने १६४ कसोटी सामन्यात विंडीजचे प्रतिनिधित्व केले आहे. दोन दशकांच्या क्रिकेट कारकीर्दीत ११००० हजार कसोटी धावा आणि ९००० हजार वनडे धावा चंद्रपॉलच्या नावावर आहेत.
चंद्रपॉलचा मुलगा २४ वर्षीय तेगनारायण वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटमध्ये नशीब आजमावत आहे. तेगनारायणने २३ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या पिता-पुत्राच्या कारकिर्दीत एकत्र एकाच सामन्यात खेळण्याचा क्षण २०१७ मध्ये एका देशांतर्गत स्पर्धेदरम्यान आला.
त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही चंद्रपॉल देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत होता. तेव्हा गांधी युथ ऑर्गनायझेशनकडून ४० षटकांच्या एका सामन्यात हे दोघे पिता-पुत्र एकत्र खेळण्यासाठी मैदानावर उतरले होते. विशेष म्हणजे त्या दोघांनी मिळून २५६ धावांची भागीदारीही केली होती. पण आडीचशेपेक्षाही अधिक धावांची भागीदारी झाल्यानंतर एकेरी धाव घेताना त्या दोघांमध्ये गोंधळ झाल्याने तेगनारायण धावबाद झाला होता.
२. हीथ स्ट्रीक- डेनिस स्ट्रीक
डेनिस स्ट्रीक झिम्बाब्वेकडून कधीही खेळू शकले नाही, परंतु त्याचा मुलगा हिथ स्ट्रीक झिम्बाब्वेचा यशस्वी अष्टपैलू खेळाडू होता. डेनिस यांनी त्यांच्या कारकिर्दीत १४ प्रथम श्रेणी सामने खेळले असून २२८ धावा आणि १६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांची कामगिरी क्रिकेटमध्ये खास नसली तरी त्यांचा मुलगा हिथने वेगवान गोलंदाज म्हणून झिम्बाब्वे संघासाठी चमकदार कामगिरी केली होती.
हिथ स्ट्रिकने ६५ कसोटी सामने आणि १८९ वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने १९९० धावा केल्या आणि २१६ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच वनडेत त्याने २९४३ धावा केल्या असून २३९ विकेट्स घेतल्या होत्या.
हिथ स्ट्रिकने झिम्बाब्वे संघाचे कर्णधारपदही सांभाळले होते, त्याला सन २००० मध्ये झिम्बाब्वे संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली २१ कसोटींपैकी ४ सामन्यात झिम्बाब्वेने विजय मिळवला होता. तर ११ सामन्यात पराभव स्विकारला होता. याशिवाय ६ सामने अनिर्णित राहिले होते. तसेच वनडेमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेने १८ सामने जिंकले होते.
डेनिस यांनी क्रिकेट खेळत असताना मधूनच ब्रेकही घेतला होता. पण पुन्हा वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांनी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्यावेळी १९९६ ला लोगन कपमध्ये डेनिस आणि हिथ ही पिता-पुत्राची जोडी मटाबेलेलँडकडून एकत्र खेळली होती.
त्यावेळी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मॅशोनलँड कंट्री डिस्ट्रिक्ट विरुद्ध डेनिस यांनी पहिल्या डावात ३ धावाच केल्या होत्या. तसेच त्यांना दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यावेळी हिथने पहिल्या डावात ३० धावा केल्या होत्या. त्यानेही दुसऱ्या डावात फलंदाजी केली नव्हती. तसेच हिथने दोन्ही डावात गोलंदाजी करताना ४ विकेट्सही घेतल्या होत्या.
१. विली क्वाफी-बर्नांड क्वाफी –
विली क्वाफी हे एक इंग्लंडचे स्टाईलिश फलंदाज म्हणून ओळखले जात होते. त्यांनी १८९९ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण ते केवळ ७ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी २२८ धावा केल्या होत्या. पण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी ७१९ सामन्यात ३६०१२ धावा केल्या आहेत.
त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा बर्नांडनेही क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्याचा प्रयत्न केला. बेर्नांड यष्टीरक्षक फलंदाज होते. त्यांना कधी इंग्लंडकडून खेळण्याची संधी मिळाली नाही पण त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. त्यांनी वारविक्शायरकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. काही सामने वारविक्शायरकडून खेळल्यावर त्यांनी नंतर वर्सेस्टरशायरकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता.
पण बर्नांड हे वर्सेस्टरशायर संघात सामील होण्यापूर्वी त्यांचे वडील विली यांच्यासह २० सामन्यांमध्ये एकत्र खेळले होते. त्या दोघांची एकत्र क्रिकेट खेळणारी सर्वात जुनी पिता-पुत्राची जोडी आहे.