इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध डरहॅम येथे तो आपला अखेरचा वनडे सामना खेळेल.
आपल्या ट्विटर हँडलवरून विश्वचषकासोबतचे आपले एक छायाचित्र आणि एक संदेश पाठवत त्याने ही घोषणा केली. त्याने लिहिले, “उद्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मी माझा शेवटचा वनडे सामना खेळेल. हा निर्णय खूपच अवघड होता. माझ्या सहकाऱ्यांसोबतचा प्रत्येक क्षण मी आनंदात घालवला. हा एक अविस्मरणीय प्रवास होता.”
❤️🏴 pic.twitter.com/xTS5oNfN2j
— Ben Stokes (@benstokes38) July 18, 2022
तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी आपले शरीर साथ देत नसल्याचे त्याने म्हटले. तसेच भविष्यात कसोटी क्रिकेट व टी२० क्रिकेटसाठी आपले पूर्ण योगदान देण्याचा शब्द त्याने दिला. जोस बटलर आणि संघाला भविष्यासाठी त्याने शुभेच्छा देखील दिल्या. डरहॅम या आपल्या घरच्या मैदानावर अखेरचा वनडे सामना खेळताना आपल्याला आनंद होईल असे त्याने सांगितले.
शानदार राहिली कारकीर्द
बेन स्टोक्स हा जन्माने न्यूझीलंडचा नागरिक आहे. मात्र, त्याने इंग्लंडसाठी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. सध्या त्याला जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हटले जाते. इंग्लंडचे विश्वचषक विजयाचे स्वप्न स्टोक्सने पूर्ण केलेले. २०१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तो सामनावीर ठरला होता. ३१ वर्षीय स्टोक्सने २०११ मध्ये आयर्लंडविरुद्ध आपल्या वनडे कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. त्याने आत्तापर्यंत इंग्लंडसाठी १०४ वन डे सामन्यात २९१९ धावा जमवल्या आहेत. यात तीन शतकांचा समावेश आहे. याच बरोबरीने त्याने ७४ बळी देखील मिळवले आहेत. अगदी काही महिन्यांपूर्वीच स्टोक्सकडे इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वात आत्तापर्यंत इंग्लंडने सर्व चार सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता काहीश्या कमी झालेल्या जबाबदारीमुळे स्टोक्स कसा खेळ दाखवतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
महत्त्वाच्या बातम्या-