गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) मंगळवारी मुंबई सिटी एफसीने कोलकत्याच्या मातब्बर एससी ईस्ट बंगालवर 3-0 असा सफाईदार विजय मिळवला. इंग्लंडचा 36 वर्षीय फॉरवर्ड ऍडम ली फाँड्रे याने दोन गोलांसह मोलाचा वाटा उचलला. स्पेनचा 30 वर्षीय मध्यरक्षक हर्नान सँटाना याने एका गोलची भर घातली.
मुंबई सिटीचा हा तीन सामन्यांतील दुसरा विजय असून त्यांनी एक सामना गमावला आहे. त्यांचे सहा गुण झाले. याबरोबरच मुंबई सिटीने गुणतक्त्यात आघाडी घेतली. एटीके मोहन बागानप्रमाणेच त्यांचे सहा गुण झाले. मुंबईचा 3 (4-1) आणि एटीकेएमबीचा 3-0 (3) असा गोलफरकही समान आहे, पण मुंबईने गोल जास्त केले आहेत.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. पहिल्या सत्रात मुंबई सिटीकडे एका गोलची आघाडी होती. मग दुसऱ्या सत्रात दहा मिनिटांच्या अंतराने दोन गोल करीत मुंबई सिटीने पकड भक्कम केली. स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मुंबई सिटीने रॉबी फाऊलवर यांच्या ईस्ट बंगालवर दमदार खेळाच्या जोरावर वर्चस्व राखले.
मुंबई सिटी आणि एससी ईस्ट बंगाल सामन्याच्या प्रारंभीच कर्णधार डॅनिएल फॉक्स याला दुखापत झाली. त्यामुळे संघाच्या रचनेत करावा लागलेला बदल ईस्ट बंगालसाठी प्रतिकूल ठरला. त्यांच्या संघाला अखेरपर्यंत लय अशी गवसलीच नाही. ईस्ट बंगलासाठी हा निकाल निराशाजनक ठरला. त्यांना सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. पहिल्या विजयासह पहिल्या गोलचीही त्यांची प्रतिक्षा लांबली. त्यांचे गुणांचे खाते अद्याप उघडले नसून तळातील अकरावा क्रमांक कायम राहिला.
खाते उघडण्याची शर्यत मुंबई सिटीने जिंकली. 20व्या मिनिटाला प्रतिआक्रमणाच्या जोरावर ही चाल रचण्यात आली. बचाव फळीतील मुर्तडा फॉलने हेडिंगवर रकीपला गोलक्षेत्रालगत चेंडू दिला. रकीपने छातीवर चेंडू नियंत्रीत केला आणि चेंडूला रॉलीन बोर्जेसच्या मारले. बोर्जेसने अप्रतिम पास देताच बुमूसने ईस्ट बंगालचा मध्यरक्षक सुरचंद्र सिंगला चकविले. ही चाल पुढे नेत त्याने ऍडमच्या दिशेने चेंडू मारला. मग ऍडमने मोकळ्या नेटमध्ये चेंडू मारत लक्ष्य साधले.
दुसऱ्या सत्राचा प्रारंभ सनसनाटी झाला. 47व्या मिनिटाला मुंबईच्या अहमद जाहुने ह्युगो बुमुसला अफलातून पास दिला. बुमूसने घोडदौड करीत गोलक्षेत्र गाठले. त्याचवेळी ईस्ट बंगालचा गोलरक्षक मजुमदार पुढे सरसावला. त्याने बुमुसला पाडले. त्यामुळे मुंबईला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर ऍडमने लक्ष्य साधण्यात यश मिळविले.
पुढे 59व्या मिनिटाला मुंबई सिटीला पेनल्टी मिळाली. जाहूने ती घेत बुमूसच्या दिशेने चेंडू मारला. हवेतून भिरभिरत आलेल्या चेंडूला बुमूसने सँटानाच्या दिशेने मारला. सँटानाने सफाईदार फिनिशिंग केले.
दुसऱ्याच मिनिटाला ईस्ट बंगालचा कर्णधार डॅनिएल फॉक्स याला दुखापत झाली. बदली खेळाडू सज्ज होण्यास पाच मिनिटे लागली. बचाव फळीतील फॉक्सऐवजी मध्य फळीतील महंमद रफीक याला पाचारण करण्याचा निर्णय प्रशिक्षक रॉबी फाऊलर यांनी घेतला. त्यानुसार संघाच्या रचनेत बदल झाला.
नवव्या मिनिटाला ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजीत मजुमदार याने चपळाई प्रदर्शित करीत मुंबईची चाल फोल ठरवली. मंदार राव देसाई याने डाव्या बाजूने आगेकूच करीत गोलक्षेत्रातील ऍडमला पास दिला. त्यातून ह्युगो बुमुसला संधी मिळाली. त्याने मारलेला फटका देबजीतने डावीकेड झेपावत थोपवला.
दहाव्या मिनिटाला मुंबई सिटीच्या महंमद रकीप याला रेफरी तेजस नागवेंकर यांनी यलो कार्ड दाखविले. त्याने ईस्ट बंगालच्या बचाव फळीतील नारायण दासला पाडले. त्यावेळी नारायण उपयुक्त चाल रचत होता. त्यामुळे यलो कार्डवर निभावणे रकीप आणि मुंबईसाठी सुदैवी ठरले.
त्यानंतर 15व्या मिनिटाला ईस्ट बंगालचा मध्यरक्षक जॅक्स माघोमा याने उजवीकडून मुसंडी मारली. त्याने नेटच्या दिशेने मारलेला फटका मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याने आरामात अडविला. त्यानंतर चार मिनिटांनी म्हणजे 19व्या मिनिटाला मुंबई सिटीचा मध्यरक्षक अहमद जाहू याच्या चुकीच्या पासमुळे रफीकला चेंडू मिळाला. रफकीने नेटच्या उजव्या कोपऱ्यात चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण अमरिंदरने झेपावत चेंडू बाहेर घालवला. त्यामुळे ईस्ट बंगालला मिळालेल्या कॉर्नरवर विशेष काही घडले नाही.
त्यानंतर 34व्या मिनिटाला ईस्ट बंगालचा स्ट्रायकर बलवंत सिंगने रफीकला चेंडू देण्याचा प्रयत्न केला, पण त्याने पास देताना जास्त ताकद लावली. त्याचवेळी अमरींदरने अंदाज घेत पुढे सरसावत चेंडूवर ताबा मिळवला.
ईस्ट बंगालचे सेट-पीसवरील अपयश चिंताजनक ठरले. 65व्या मिनिटाला अँथनी पिल्कींग्टन याने डावीकडे मिळालेला कॉर्नर घेतला. पण त्याचा फटका इतका स्वैर होता की मुंबई सिटीच्या बचावपटूंना काहीच करावे लागले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
आयएसएल २०२०: ईस्ट बंगालचा धुव्वा उडवत मुंबई सिटीचा सफाईदार विजय
आयएसएल २०२०: एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील सामना बरोबरीत
Video: महान फुटबॉलपटू मॅराडोना यांना मेस्सीकडून खास अंदाजात श्रद्धांजली