पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीरने भारतीय कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने रविवारी (२४ ऑक्टोबर) भारताचा १० विकेट्स राखून पराभव केला. विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा केलेला हा पहिलाच पराभव आहे. पराभवानंतर विराट ज्याप्रकारे पाकिस्तानच्या खेळाडूंना भेटला आणि चर्चा केली, त्यासाठी मीरने विराटचे कौतुक केले आहे. मीरच्या मते विराट एक आदर्श खेळाडू आहे आणि त्याने पराभव पूर्ण खेळभावनेने स्वीकारला आहे.
मीरने आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर तिच्या कॉलममध्ये विराटचे कौतुक केले आहे. तिने लिहिले की, “विराट कोहलीने पूर्ण तब्येतीने पराभव स्वीकार केला आणि मी त्याच्या खेळ भावनेने कौतुक करते. सर्वोच्च स्तरावरील खेळाडूंचा अशा प्रकारचा व्यवहार पाहणे प्रत्यक्षात खूप चांगले आहे. यामुळे त्यांच्यातील सुरक्षा भावही माहित होते. याचा अर्थ असा होतो की, त्यांना पुनरागमन करण्याविषयी पूर्णपणे खात्री आहे.”
जर भारताने मोठ्या विजयासह स्पर्धेत पुनरागमन केले तर आपल्याला आश्चर्य वाटणार नसल्याचे मीरने पुढे बोलताना सांगितले. “जर भारताने लवकरच मोठ्या विजयासह पुनरागमन केले, तर मला आश्चर्य वाटणार नाही. मला अपेक्षा आहे की, आपण भारत आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध खेळताना पाहू शकतो.”
भारतावर विजय मिळवल्यानंतर विजयाचा आनंद साजरा करत बसण्यापेक्षा बाबर आझमने पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मीरने त्याचेही कौतुक केले आहे. तिने लिहिले की, “या प्रदर्शनासोबत पाकिस्तान निश्चित स्वरूपात स्पर्धेतील आवडता संघ बनला आहे. पण हे पाहून चांगले वाटले की, बाबर आणि शाहीन मीडियासमोर भावनांमध्ये वाहिले नाहीत. त्यांचे लक्ष पुढच्या सामन्यावर होते. ही चांगली गोष्ट आहे की, डोकं शांत केलेलं आहे. हेदेखील स्पष्ट होत आहे की, संघ योग्य दिशेने पुढे जात आहे.” सना मीर हिला पाकिस्तानची आजवरची सर्वात यशस्वी महिला क्रिकेटपटू मानले जाते. तिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू म्हणून ओळखतात.