कोरोना विषाणूच्या महामारीमुळे बऱ्याच दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना पुन्हा सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच टी20 आणि वनडे मालिका खेळली गेली. त्या संघातील खेळाडूंना चांगली कामगिरी करून आयसीसीच्या क्रमवारीत सुधारणा करण्याची उत्तम संधी होती. इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टो याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या शेवटच्या वनडे सामन्यात चांगली खेळी करत शतक ठोकले. त्यामुळे त्याच्या आयसीसीच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.
जॉनी बेयरस्टोने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या शानदार खेळीमुळे तो पहिल्या दहामध्ये स्थान मिळवू शकला आहे.बेयरस्टोने मालिकेत एकूण 196 धावा केल्या आहेत. अंतिम सामन्यात त्याने 126 चेंडूंत 112 धावा फटकावल्या. तो आता 3 स्थानांनी पुढे जात 10 व्या क्रमांकावर आला आहे. 30 वर्षीय बेयरस्टो ऑक्टोबर 2018 मध्ये नवव्या स्थानावर पोहोचला होता. आता त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट रेटिंग (777) मिळविण्यासाठी त्याला 23 गुणांची गरज आहे.
आयसीसीच्या वनडे क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (871 गुण) फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान कायम राखले आहे. भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (855 गुण) दुसऱ्या स्थानी कायम आहे. कोविड-19 या साथीच्या रोगामुळे काही काळ क्रिकेट खेळता आले नसले तरी या दोन भारतीय खेळाडूंनी क्रमवारीत आपले स्थान कायम राखले आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचे फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि ऍलेक्स कॅरी या दोघांनीही इंग्लंड विरुद्ध झालेल्या शेवटच्या वनडे सामन्यात शतक ठोकले होते. त्यामुळे त्यांच्याही क्रमवारीत सुधारणा झाली आहे. मॅक्सवेलने पाच स्थानांची झेप घेत संयुक्त 26 वे आणि कॅरीने 11 स्थानांची झेप घेत कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 28 वे स्थान मिळवले आहे.
गोलंदाजांच्या आयसीसीच्या वनडे क्रमवारीत इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वॉक्स याला सुद्धा फायदा झाला आहे. तीन स्थानांची झेप घेत तो कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.न्यूझीलंड संघाचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि भारतीय संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह हे दोघेही अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी कायम आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड दोन वर्षांत प्रथमच पहिल्या दहामध्ये परतला असून तो 15 व्या स्थानावरुन ८व्या स्थानावर आला आहे. तर ऍडम झम्पा 10 स्थानांची प्रगती करत 21 व्या स्थावावर आला आहे.