वेस्ट इंडीजचा दिग्गज सलामीवीर व टी२० क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखला जाणारा युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल सध्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा अंतिम टप्प्यात आहे. वयाची चाळिशी पार केलेला गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कधी रामराम करणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जातात. मात्र, माध्यमांतील वृत्तानुसार गेल लवकरच आपला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
नुकताच खेळला अखेरचा विश्वचषक
संयुक्त अरब अमिरात येथे झालेल्या टी२० विश्वचषकात त्याने नुकतेच वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले. मात्र, या विश्वचषकात तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. वेस्ट इंडिज संघ देखील स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला. सुपर सिक्स फेरीमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात बाद झाल्यानंतर तो प्रेक्षकांना अभिवादन करताना तसेच, आपल्या सहकाऱ्यांना आनंदाने भेटत असल्याचे दिसून आले. अनेकांनी तो निवृत्त होत असल्याचे मानले. मात्र, गेलने या सर्व बाबींना नकार दिला होता.
घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळण्याची इच्छा
गेलने टी२० विश्वचषकातील अखेरच्या सामन्यानंतर बोलताना म्हटले होते की,
“मी इतक्यात निवृत्त होणार नाही. मात्र, मला घरच्या मैदानावर अंतिम सामना खेळण्याची संधी दिली गेल्यास अधिक आनंद होईल.”
गेलच्या या मागणीवर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड विचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरिट म्हणाले,
“गेलचा अंतिम सामना त्याच्या घरच्या मैदानावर व्हावा यासाठी आम्ही विचाराधीन आहोत. याबाबतची तारीख किंवा सामन्याचा प्रकार अद्याप ठरलेला नाही.” वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव यांनी गेल आपला अंतिम सामना आयर्लंडविरुद्ध खेळू शकतो याचे संकेत दिले आहेत.
दैदिप्यमान राहिली कारकीर्द
ख्रिस गेल याने आपल्या २३ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १०३ कसोटी, ३०१ वनडे व ७९ टी२० सामने खेळले आहेत. याव्यतिरिक्त जगभरातील सर्व व्यवसायिक टी२० लीगमध्ये तो खेळत असतो. आपल्यात तुफानी फलंदाजीने त्याने जगभरात आपले चाहते बनवले आहे. फलंदाजी व्यतिरिक्त मैदानावर तो आपल्या अनेक गमतीनीं प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिका क्रिकेटला धक्का! कोरोनामुळे ‘या’ संघाने अर्ध्यातच रद्द केली सुरू असलेली वनडे मालिका
शतकवीर अय्यरची तुलना होतेय ‘त्या’ कमनशिबी खेळाडूशी; ‘हे’ आहे कारण