पुणे। आज(13 ऑक्टोबर) भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवरवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या विजयाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी हा सामना खास ठरला आहे. विराटचा हा कसोटी कर्णधार म्हणून 50 वा सामना होता. तसेच विराटने कर्णधार म्हणून आत्तापर्यंत 30 कसोटी विजय मिळवले आहेत.
त्यामुळे कर्णधार म्हणून पहिल्या 50 कसोटीत सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत विराट तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत विराटच्या पुढे केवळ स्टिव्ह वॉ आणि रिकी पाँटिंग हे माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार आहेत.
वॉ यांनी त्यांच्या कर्णधार म्हणून पहिल्या 50 कसोटी सामन्यात 37 विजय मिळवले होते. तर पाँटिंगने कर्णधार म्हणून पहिल्या 50 कसोटी सामन्यात 35 विजय मिळवले होते.
विराटने या यादीत विव रिचर्ड्स यांना मागे टाकले आहे. रिचर्ड्स यांनी कर्णधार म्हणून पहिल्या 50 कसोटी सामन्यात 27 विजय मिळवले होते.
विराट हा भारताचा 50 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा एमएस धोनीनंतरचा दुसराच कर्णधार आहे. धोनीने भारताचे 60 कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. तसेच धोनीने त्याच्या कर्णधार म्हणून पहिल्या 50 कसोटी सामन्यात 26 विजय मिळवले होते.
कर्णधार म्हणून पहिल्या 50 कसोटी सामन्यांनंतर सर्वाधिक विजय मिळवणारे क्रिकेटपटू-
37 विजय – स्टिव्ह वॉ
35 विजय – रिकी पाँटिंग
30 विजय – विराट कोहली
27 विजय – विव रिचर्ड्स
26 विजय – मायकल वॉर्न
26 विजय – एमएस धोनी
26 विजय – मार्क टेलर