कानपूर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ग्रीनपार्क स्टेडियम येथे कसोटी मालिकेचा पहिला सामना सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरू झाला आहे. या सामन्याचा शनिवारी (२७ नोव्हेंबर) तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात ५ षटकात १ बाद १४ धावा केल्या आहेत. दिवसाखेरपर्यंत भारताकडे ६३ धावांची आघाडी आहे.
न्यूझीलंडला पहिल्या डावात २९६ धावांवर रोखल्यानंतर भारताकडून दुसऱ्या डावाची सुरुवात मयंक अगरवाल आणि शुबमन गिलने केली. मात्र, दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच भारताला मोठा धक्का बसला. शुबमन गिल दुसऱ्याच षटकात १ धावांवर बाद झाला. त्याला काईल जेमिसनने त्रिफळाचीत केले. त्यानंतर मयंक अगरवालला साथ देण्यासाठी चेतेश्वर पुजारा उतरला. पण ५ षटके झाल्यानंतर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी भारताने १ बाद १४ धावा केल्या होत्या. अगरवाल ४ धावांवर आणि पुजारा ९ धावांवर नाबाद राहिले.
अक्षर पटेलच्या ५ विकेट्स
न्यूझीलंडचा पहिला डाव १४२.३ षटकांत २९६ धावांवर संपुष्टात आला आहे. भारताकडून अक्षर पटेलने ५ विकेट्स घेतल्या. भारताकडे पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर ४९ धावांची आघाडी आहे.
दुसऱ्या सत्रात चार विकेट्स गमावल्यानंतर तिसऱ्या सत्रातही न्यूझीलंडचे फलंदाज फार खास कामगिरी करु शकले नाहीत. टॉम बंडेल १२४ व्या षटकात अक्षर पटेलविरुद्ध खेळताना त्रिफळाचीत झाला. त्यापाठोपाठ १२८ व्या षटकात टीम साऊथी देखील अक्षरविरुद्धच खेळताना त्रिफळाचीत झाला. बंडेलने १३ धावा आणि साऊथीने ५ धावा केल्या. याबरोबरच अक्षरने त्याच्या डावातील ५ विकेट्स पूर्ण केल्या.
असे असताना एक बाजू काईल जेमिसनने सांभाळली होती. त्याला विल्यम्स सोमरविलने चांगली साथ दिली होती. पण अखेर जेमिसनला आर अश्विनने १३९ व्या षटकात अक्षर पटेलच्या हातून झेलबाद केले. जेमिसनने २३ धावा केल्या. अश्विनने नंतर सोमरविललाही अधिक काळ टिकू न देता १४३ व्या षटकात ६ धावांवर त्रिफळाचीत केले. अजाज पटेल ५ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे न्यूझीलंड १४२.३ षटकांत २९६ धावांवर सर्वबाद झाले.
भारताकडून अक्षर पटेलने ६२ चेंडूत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय आर अश्विनने ८२ चेंडूत ३ विकेट्स घेतल्या. तसेच उमेश यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारताचे फिरकीपटू चमकले.
तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच ९५ व्या षटकात रॉस टेलरला अक्षर पटेलने राखीव यष्टीरक्षक केएस भरतकडे झेल देण्यास भाग पाडले. टेलर ११ धावांवर बाद झाला. पाठोपाठ ९७ व्या षटकात हेन्री निकोल्सला अक्षर पटेलनेच पायचीत केले.
असे असले, तरी एक बाजू टॉम लॅथमने सांभाळलेली होती. मात्र, १०३ व्या षटकात अक्षर पटेलनेच त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढले. त्याच्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात लॅथम ९५ धावांवर यष्टीचीत झाला. त्याचे शतक केवळ ५ धावांनी हुकले. त्याने ही खेळी २८२ चेंडूत १० चौकारांच्या सहाय्याने केली.
तो बाद झाल्यानंतर न्यूझीलंडने १११ व्या षटकात पदार्पणवीर रचिन रविंद्रची देखील विकेट गमावली. मात्र, त्यानंतर टॉम बंडेल आणि काईल जेमिसनने आणखी विकेट जाऊ दिली नाही. त्यामुळे दुसऱ्या सत्राखेर न्यूझीलंडने ११८ षटकांत ६ बाद २४९ धावा केल्या. बंडेल १० धावांवर आणि जेमिसन २ धावांवर नाबाद आहे.
लॅथम शतकाच्या जवळ
शनिवारी न्यूझीलंडने पहिल्या डावातील ५८ व्या षटकापासून आणि बिनबाद १२९ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी दुसऱ्या दिवसाखेर नाबाद परतलेले सलामीवीर विल यंगने ७५ धावांपासून आणि टॉम लॅथमने ५० धावां यांनी फलंदाजीला सुरुवात केली. या दोघांनीही तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला चांगला खेळ करत भारताच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. या दोघांनी पहिल्या डावात न्यूझीलंडला १५० धावांची सलामी दिली. मात्र, ६७ व्या षटकात विल यंग बाद झाला आणि सलामी जोडी तुटली. आर अश्विनच्या गोलंदाजीवर चेंडू बॅटची कड घेत यष्टीरक्षक भरतकडे गेला, त्यामुळे यंगला विकेट गमवावी लागली. त्याने २१४ चेंडूत ८९ धावा केल्या.
त्यानंतरही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विलियम्सनने लॅथमला चांगली साथ दिली. पण या दोघांचीही जोडी जमली, असे वाटत असतानाच विलियम्सन ८६ व्या षटकात उमेश यादवच्या चेंडूवर १८ धावांवर पायचीत झाला. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र तिथेच थांबवण्यात आले.
पहिले सत्र थांबले, तेव्हा न्यूझीलंडने ८५.३ षटकात २ बाद १९७ धावा केल्या होत्या. टॉम लॅथम ८२ धावांवर नाबाद आहे.
तिसऱ्या दिवशी यष्टीरक्षणासाठी भारताकडून वृद्धीमान साहा ऐवजी केएस भरत मैदानात उतरला. साहाला मानेच्या दुखापतीचा त्रास होत आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद ३४५ धावा केल्या.