चार वर्षांपूर्वीचे एक लाजिरवाणे प्रकरण उघडकीस आल्यानंतर टीम पेनने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आता, कसोटी क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलियाचा ४७ वा कसोटी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. नवा कर्णधार कमिन्सने आता कर्णधारपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानला पाहून, एक वेगवान गोलंदाजही कर्णधारपद सांभाळू शकतो याची मला प्रेरणा मिळाली.
कमिन्स २०१७ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) संघाचा भाग होता. झहीर खान त्या संघाचा कर्णधार होता. झहीर सोबत खेळताना वेगवान गोलंदाज कर्णधार असण्यात काहीही नुकसान नाही, हे त्याला जाणवले. एका वाहिनीशी बोलताना कमिन्सने म्हटले की, “मला त्याचे टी२० मध्ये नेतृत्व खूप आवडले. त्याने उत्कृष्ट पद्धतीने संघाचे नेतृत्व केले. त्याच्याकडे गोलंदाजीच्या खूप कल्पना होत्या आणि तो मला मैदानावर क्षेत्ररक्षणाची मांडणी कशी करावी आणि रणनीती कशी बनवावी याबाबत सांगत असायचा. त्याचा मला खूप फायदा झाला. वेगवान गोलंदाजाचे कर्णधार होण्यात काही नुकसान आहे असे मला वाटत नाही.”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मुलाखतीनंतर कमिन्सची संघाचा कर्णधार आणि स्टीव्ह स्मिथची उपकर्णधार म्हणून निवड केली. या दोघांची ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पाच सदस्यीय पॅनेलने मुलाखत घेतली होती. शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले की, कमिन्स संघाचा कर्णधार असेल तर स्मिथ उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल. स्मिथ याआधी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार राहिला आहे, मात्र, बॉल टेम्परिंगच्या वादानंतर त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. कमिन्सने यापूर्वी केवळ स्थानिक वनडे क्रिकेटमध्ये न्यू साउथ वेल्सचे नेतृत्व केले होते.
टीम पेनने कर्णधारपदाचा राजीनामा का दिला?
टीम पेनवर आपल्या सहकारी महिला कर्मचाऱ्याला आक्षेपार्ह फोटो आणि संदेश पाठवल्याचा आरोप आहे आणि हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. तस्मानिया येथे पत्रकार परिषदेत त्याने आपला निर्णय जाहीर केला.