जसा चातक पक्षी आतुरतेने पावसाची वाट पाहत असतो, तशीच वाट सध्या जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमी विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यांची पाहत आहेत. यातील पहिला सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने माध्यमांशी संवाद साधला. त्याने म्हटले की, भारताविरुद्ध त्यांना कडवे आव्हान मिळेल.
काय म्हणाला विलियम्सन?
केन विलियम्सन (Kane Williamson) याच्या नेतृत्वातील न्यूझीलंड संघाने 2019च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) हे बलाढ्य संघ आमने-सामने आले आहेत. अशात या सामन्यापूर्वी विलियम्सनने माध्यमांशी बोलताना मोठे विधान केले.
विलियम्सनला यावेळी विचारण्यात आले की, न्यूझीलंडच्या शिबिराची स्थिती कशी आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला, “हो, चांगली स्थिती आहे. या स्टेडिअम आणि या मोठ्या स्तरावर आमच्या अधिकतर खेळाडूंनी सामने खेळले नाहीयेत. आमच्यासाठी हे एक कठीण आव्हान असणार आहे. भारतीय संघ चांगले क्रिकेट खेळत आहे. मात्र, ही फक्त एक दिवसाची गोष्ट आहे. आम्हीही चांगले क्रिकेट खेळले आहे.” तो असेही म्हणाला की, “भारत एक मोठे आव्हान आहे, ते सध्या सर्वोत्तम नसले, तरीही सर्वोत्तम संघांपैकी एक आहेत.”
कीवींनी आयसीसी स्पर्धांमध्ये कायमच दिला भारताला त्रास
खरं तर, न्यूझीलड संघाने भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये नेहमीच त्रास दिला आहे. भारताने आयसीसी स्पर्धांमध्ये 2003 विश्वचषकानंतर 2023च्या साखळी फेरीत न्यूझीलंडला पराभूत करण्यात यश मिळवले होते. यादरम्यानच्या 20 वर्षांमध्ये भारत न्यूझीलंडला आयसीसी स्पर्धांमध्ये एकाही सामन्यात पराभूत करू शकला नव्हता. 2019च्या विश्वचषक उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडला फक्त 239 धावांवर रोखले होते. मात्र, भारतीय संघ फक्त 221 धावाच करू शकला होता. तसेच, 18 धावांनी पराभव पत्करत उपांत्य सामन्यातून बाहेर पडला होता. तो एमएस धोनी याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. धोनी धावबाद झाल्यानंतर सर्व चाहत्यांच्या आशा संपुष्टात आल्या होत्या.
आता भारतीय संघ मागील विश्वचषकाचा हिशोब या विश्वचषकात चुकता करतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (new zealand captain kane williamson statement about IND vs NZ semi final match icc world cup 2023)
हेही वाचा-
‘मान्य करावंच लागेल, सेमीफायनलमध्ये दबाव…’, कोच द्रविडचे न्यूझीलंडशी भिडण्यापूर्वी मोठे विधान
‘शाहीन-हॅरिस चांगली बॉलिंग करत नाहीयेत अन् लोक मलाच शिव्या देतायेत’, माजी क्रिकेटरचे धक्कादायक विधान