बुधवारचा (दि. 15 नोव्हेंबर) दिवस क्रिकेटप्रेमींसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण, विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ आमने-सामने असणार आहेत. भारतीय संघाचा मागील काही आयसीसी स्पर्धांच्या बादफेरीतील प्रदर्शन खूपच निराशाजनक पाहायला मिळाले आहे. तसेच, न्यूझीलंडविरुद्ध 2019च्या विश्वचषक उपांत्य सामन्यातही पराभूत व्हावे लागले होते. अशात पुन्हा एकदा भारत आणि न्यूझीलंड एकमेकांपुढे आले आहेत. याविषयी भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने मोठे विधान केले.
काय म्हणाला द्रविड?
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या उपांत्य सामन्याविषयी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, “मला वाटते, असे म्हणणे योग्य ठरणार नाही की, हा फक्त एक सामना आहे. हा उपांत्य सामना आहे, ज्याचे खूपच महत्त्व आहे. मात्र, आमची पद्धत या सामन्यासाठीही बदलणार नाहीये. आपल्या सर्वांना माहिती आहे की, हा एक बादफेरीतील सामना आहे आणि आम्हाला ही गोष्ट मान्य करावी लागेल की, उपांत्य सामन्याचा थोडा दबाव तर असतोच. तुम्ही जे काही करू शकता, ते सर्वोत्तम तयारी करणे आहे आणि आम्ही असेच करत आहोत.”
श्रेयस अय्यरचे कौतुक
द्रविडने हे विधान नेदरलँड्सविरुद्ध भारताच्या अखेरच्या साखळी सामन्यानंतर केले. यावेळी त्याने श्रेयस अय्यर याचेही कौतुक केले. द्रविड म्हणाला की, “श्रेयस आमचा मधल्या फळीच्या पाठीचा कणा आहे. आपल्या सर्वांना माहितीये की, मागील 10 वर्षांमध्ये आमच्यासाठी चौथ्या क्रमांकावर एक चांगला खेळाडू शोधणे किती कठीण राहिले आहे.”
खरं तर, भारतीय संघाने आतापर्यंत आयसीसीच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 3 वेळा बादफेरीतील सामना खेळला आहे. या सर्व सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (india head coach rahul dravid statement before semifinal match against new zealand in world cup 2023)
हेही वाचा-
‘शाहीन-हॅरिस चांगली बॉलिंग करत नाहीयेत अन् लोक मलाच शिव्या देतायेत’, माजी क्रिकेटरचे धक्कादायक विधान
आख्ख्या वर्ल्डकपमध्ये फक्त रोहितचाच रुबाब! ‘हे’ आहेत वर्ल्डकप 2023मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे 5 धुरंधर