आशिया चषक 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघात खेळला जाणार आहे. नेपाळ पहिल्यांदाच आशिया चषकासाठी क्वालिफाय झाला आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत नेपाळच्या संघाची धुरा वरिष्ठ अनुभवी खेळाडूवर नाही, तर 20 वर्षीय रोहित पौडेल याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. अशात हा रोहित पौडेल कोण आहे, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला असेल. चला तर, तो कोण आहे, आणि त्याची आतापर्यंतची कारदीर्द कशी राहिली आहे, हे जाणून घेऊयात…
कधी मिळालं कर्णधारपद?
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात नेपाळ संघाचा तत्कालीन कर्णधार संदीप लामिछाने याच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई केल्यामुळे संघाच्या कर्णधारपदाची जागा रिकामी होती. अशात, 12 नोव्हेंबर रोजी उपकर्णधार असलेल्या रोहित पौडेल (Rohit Paudel) याच्या खांद्यावर नेपाळ संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली होती.
सर्वाधिक धावा करणारा नेपाळी कर्णधार
रोहित पौडेल 2 सप्टेंबर 2002 रोजी नेपाळच्या नवलपरासी येथे जन्मला होता. रोहितचे वय सध्या 20 वर्षे आणि 361 दिवस इतके आहे. त्याने कमी वयात मोठा पराक्रम गाजवला आहे. तो नेपाळसाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार आहे. तसेच, तो नेपाळसाठी वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावा करणाराही पहिला खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 52 वनडे सामन्यातील 51 डावात 31.93च्या सरासरीने सर्वाधिक 1469 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतकाचा आणि 8 अर्धशतकांचाही समावेश आहे.
विशेष म्हणजे, वनडे मालिकेत नेपाळी खेळाडू म्हणून सर्वाधिक धावा करण्याचाही विक्रम त्याच्याच नावावर आहे. मागील वर्षी 22 मार्च, 2022 रोजी रोहितने पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध खेळताना 107 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 126 धावांचा पाऊस पाडला होता. हा विक्रम नेपाळचा माजी कर्णधार पारस खडकाच्या नावे होता. त्याने 2019मध्ये यूएईविरुद्ध एका सामन्यात 109 चेंडूत 115 धावा केल्या होत्या. खडका वनडेत शतक करणारा पहिला नेपाळी खेळाडूही आहे.
कमी वयात मोठा पराक्रम
नवनियुक्त कर्णधार पौडेल याने 2018मध्ये नेदरलँडविरुद्ध वनडे सामना खेळताना नेपाळच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केले होते. त्याच्या नावावर राष्ट्रीय संघात जागा बनवणाऱ्या कमी वयातील नेपाळी खेळाडूच्या विक्रमाचीही नोंद आहे. पौडेल याने जेव्हा पदार्पण केले होते, तेव्हा त्याचे वय अवघे 15 वर्षे आणि 335 दिवस इतके होते. त्यामुळे त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा दुसरा कमी वयातील आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या हसन राजा याच्या नावावर आहे. त्याने 1996मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या 14 वर्षे आणि 233 दिवसांच्या वयात पदार्पण केले होते.
आशिया चषकासाठी नेपाळ संघ
रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्टेल, आसिफ शेख, भीम शार्की, कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्र सिंग आयरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, प्रतित जीसी, मौसोम ढकल, संदीप जोरा, किशोर महतो, अर्जुन सौद. (20 year old rohit paudel going to lead nepal cricket team in asia cup 2023)
हेही वाचलंच पाहिजे-
Asia Cup 2023ची A To Z माहिती एकाच क्लिकवर, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी लगेच घ्या जाणून
Asia Cup 2023पूर्वी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोलमडला श्रीलंका संघ, चार धुरंधर स्पर्धेतून बाहेर; वाचा यादी