नवी दिल्ली । भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज विरेंद्र सेहवागने भारतीय संघासाठी अनेक मोठ्या खेळी करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. सेहवागला त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जात होते. जेव्हा तो मैदानावर फलंदाजीसाठी उतरत होता, तेव्हा विरोधी संघाचे गोलंदाज चिंतेत पडत होते. कारण सेहवाग आपल्या फलंदाजीने विरोधी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करायचा.
तसंही सेहवागने (Virender Sehwag) कधी सावकाश खेळी केलीच नव्हती. तो केवळ मैदानात येऊन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठविण्याचे काम करत होता. कदाचित यामुळेच त्याला विस्फोटक फलंदाजांपैकी एक मानले जात होते.
सेहवागने भारतीय संघासाठी १०४ कसोटी सामने खेळले होते. ज्यामध्ये त्याने ४९.३४ च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या आहेत. इतकेच नव्हे, तर सेहवाग कसोटीत त्रिशतक ठोकणारा पहिलाच भारतीय फलंदाज आहे. तसेच वनडेत द्विशतक ठोकणारा तो दुसरा भारतीय फलंदाज आहे. त्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar)२०१०मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना वनडेत पहिले द्विशतक ठोकले होते. याबरोबरच सेहवाग २००७ च्या टी२० आणि २०११ च्या वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.
मैदानावर सेहवागच्या आक्रमकतेचा अंदाज या गोष्टीवरून लावला जाऊ शकतो, की तो मैदानावर फलंदाजीला आल्यानंतर पहिल्या चेंडूवर चौकार किंवा षटकार ठोकण्यासाठी ओळखला जात होता. पहिल्या चेंडूवर सीमारेषा पार करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत नेहमीच त्याच्या नावाचा उल्लेख केला जातो.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे, की सेहवाग कोणत्याही क्रिकेट प्रकारात खेळताना सामन्याच्या पहिलाच चेंडू सीमारेषेच्या पार करण्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे हा पहिल्या चेंडूवर चौकार किंवा षटकार ठोकण्याचा अनोखा विक्रम सेहवागच्या नावावर आहे.
सेहवागने आपल्या कारकीर्दीत ५४ सामन्यांमध्ये पहिल्याच चेंडूला सीमारेषेच्या पलीकडचा रस्ता दाखविला आहे. यामध्ये कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांच्या समावेश आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूला २६ वेळा पहिल्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवले, तर कसोटीत हा कारनामा त्याने २५ वेळा केला. तसेच, टी२० त्याने हा कारनामा ३ वेळा करून दाखविला आहे. त्यामुळे चाहते आजही त्याच्या मैदानावरील फलंदाजीची आठवण काढतात.