आयपीएलमधील बलाढ्य संघांमध्ये एमएस धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचीही गणना होते. मात्र, या संघाची कामगिरी 13 व्या सत्रात अत्यंत खराब होती. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नई संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यास अपयशी ठरला होता. मागील सत्रात धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाला 7 व्या स्थानावरती समाधान मानावे लागले होते. त्याचप्रमाणे या हंगामातही चेन्नई संघ आयपीएलचे विजेतेपद जिंकण्यास अपयशी ठरणार असल्याचे काही दिग्गजांनी मत व्यक्त केले आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी संवाद साधताना गौतम गंभीर, आकाश चोप्रा आणि संजय मांजरेकर या माजी दिग्गज खेळाडूंनी यंदाच्या हंगामातही चेन्नई सुपर किंग्ज संघ प्लेऑफमध्ये पोहोचणार नसल्याचा दावा केला आहे. त्यामध्ये गौतम गंभीरनी म्हटले आहे की, यंदाच्या सत्रात चेन्नई संघ पाचव्या क्रमांकावर राहील, तर आकाश चोप्रा आणि संजय मांजरेकर यांचेही असे मत आहे की, चेन्नई सुपर किंग्ज पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्यास अपयशी ठरू शकतो.
आकाश चोप्राचे म्हणणे आहे की, “चेन्नई सुपर किंग्ज मागील मोसमातील कामगिरीपेक्षा यंदाच्या कामगिरीत निश्चितच सुधारणा करेल, परंतु प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे या संघासाठी अशक्य दिसत आहे.”
परंतु वेस्ट इंडीजचा माजी अनुभवी वेगवान गोलंदाज आणि प्रसिद्ध भाष्यकार इयान बिशप यांना चेन्नई सुपर किंग्ज संघावरती विश्वास आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, चेन्नई सुपर किंग्ज संघ नक्कीच प्लेऑफमध्ये प्रवेश करेल, परंतु तो चौथ्या क्रमांकावर राहू शकतो. यंदाच्या मोसमात चेन्नई संघाने आपल्या ताफ्यात ६ खेळाडूंचा समावेश केला आहे. तसेच सुरेश रैनाही या हंगामात संघात परतला आहे.
14 व्या आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघ-
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रॉबिन उथप्पा, सुरेश रैना, अंबाती रायडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसीस, इम्रान ताहिर, एन जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, आर साई किशोर, मोईन अली, कृष्णाप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी हरी निशांत.
महत्त्वाच्या बातम्या –
सीएसके पुजाराला पहिल्या काही सामन्यांसाठी अंतिम ११ जणांमध्ये स्थान देणार नाही, ‘या’ दिग्गजाचा दावा