इंडियन प्रीमियर लीग २०२२चा नववा सामना शनिवारी (०२ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात उभय संघांतील खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले. मात्र राजस्थानच्या गोलंदाजांनी शेवटच्या काही षटकांमध्ये जबरदस्त पुनरागमन करत संघाला २३ धावांनी हा सामना जिंकून दिला. हा राजस्थानचा हंगामातील सलग दुसरा विजय आहे. तर मुंबईने त्यांचे सुरुवातीचे दोन्हीही सामने गमावले आहेत. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईने सुरुवातीचे २ सामने गमावले आहेत.
या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईला २० षटकांमध्ये १७० धावाच करता आल्या. यादरम्यान त्यांनी ८ विकेट्स गमावल्या.
That's that from Match 9. @rajasthanroyals win by 23 runs.
Scorecard – https://t.co/VsJIgyi126 #MIvRR #TATAIPL pic.twitter.com/vlgHbeqmjf
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2022
इशान, तिलकच्या झुंजार खेळी व्यर्थ
राजस्थानच्या १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून सलामीवीर इशान किशन आणि युवा तिलक वर्मा यांनी शानदार खेळी केल्या. इशानने ४३ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५४ धावा फटकावल्या. तर तिलक वर्मा ३३ चेंडूंमध्ये ६१ धावा करून बाद झाला. त्याने त्याच्या खेळीदरम्यान ५ षटकार आणि ३ चौकार मारले. हे त्याचे आयपीएलमधील पहिलेवहिले अर्धशतक होते. परंतु त्यांना इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. मुंबईचे ४ फलंदाज एकेरी धावेवर बाद झाले. त्यामुळे इशान आणि तिलकच्या झुंजार खेळी व्यर्थ गेल्या.
या डावात राजस्थानकडून नवदिप सैनी आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि आर अश्विननेही एका-एका विकेटचे योगदान दिले.
जोस बटलरचे वादळी शतक
तत्पूर्वी राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलरने शानदार शतकी खेळी केली होती. त्याने ६८ चेंडू खेळताना ५ षटकार आणि ११ चौकार ठोकत १०० धावा केल्या. हे त्याचे आयपीएलमधील दुसरे शतक होते. तसेच कर्णधार संजू सॅमसन याने ३० धावा आणि शिमरॉन हेटमायर याने वादळी ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.
या डावात मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि टायमल मिल्स यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. परंतु ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
तोडफोड मंडळाचे नवे अध्यक्ष.! नव्या दमाच्या मुंबईकराचे वादळी अर्धशतक, मोडला इशानचा ‘मोठा’ विक्रम
DC vs GT | नाणेफेकीचा कौल रिषभच्या खात्यात, एका बदलासह असे आहेत दिल्ली आणि गुजरातचे संघ
काटा किर्रर्र..! बटलरचे मुंबईविरुद्ध अविस्मरणीय शतक, पण बुमराहने दिली तितकीच वेदनादायी जखम