नुकत्याच पार पडलेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी घसघशीत यश संपादन केले होते. मात्र त्यानंतर काही दिवसातच 2022ला बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतुन नेमबाजी क्रिडा प्रकाराला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.
यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात भारताचा ऑलंम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रानेही नेमबाजीला 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतुन वगळणे हा भारतासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे.
भारतीय ऑलम्पिक असोसिएशनने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बिंद्रा बोलत होता. तो म्हणाला, ” नक्कीच भारतासाठी आणि आपल्या नेमबाजांसाठी हा मोठा धक्का आहे.”
“नेमबाजी पर्यायी खेळ आहे. बर्मिंगहॅमच्या आयोजन कर्त्यांनी म्हटले आहे की त्यांच्याकडे नेमबाजी घेण्यासाठी सुविधा नाही. जर डर्बनमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा झाली असती तर कदाचित नेमबाजीचे आयोजन झाले असते.”
सुरवातीला डर्बनमध्ये 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार होते, परंतू अर्थिक समस्यांमुळे त्यांनी यासाठी नकार दिला. त्यामुळे या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन बर्मिंगहॅमकडे देण्यात आले.
भारतीय नेमबाजांनी गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत एकुण 16 पदके मिळवली होती. यात तब्बल 7 सुवर्णपदकांचा समावेश होता.
नेमबाजी पर्यायी खेळ जरी असला तरी त्याचे आयोजन 1970ची राष्ट्रकुल स्पर्धा वगळता 1966 पासुन प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत करण्यात आले आहे.
बिंद्राबरोबरच यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा जीतू रायनेही नेमबाजीला 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतुन वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.